श्याम मनोहर, मी आणि मोघ पुरुस...




मराठी साहित्य परीघातच नाही तर एकूणच भारतीय साहित्यात श्याम मनोहर या नावाचा चांगल्या अर्थानं दबदबा आहे. त्यांचं लिखाण हे पठडीबाहेरचं आणि वाचकाला विचार करायला भाग पाडणारं आहे. मनोरंजन, करमणुक, वेळ घालवण्याचा उद्देश म्हणून तुम्ही श्याम मनोहर वाचू शकत नाही. तुमच्या मेंदूला गदागदा हलवण्यासाठीच हे लिखाण असतं. त्यामुळे त्यांचा वाचकवर्ग कमी आहे पण तो एकनिष्ठ आहे. श्याम मनोहर हे त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातही काहीसे असेच मेंदूला ताप देणारे आहेत. त्यांच्याजवळ तुम्ही वायफळ गप्पा मारू शकत नाहीत. त्यांना पटलं नाही तर तोंडावर थेट तसं तुम्हाला सांगण्याचा परखडपणा त्यांच्यात आहे. त्यांची ही ओळख त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याआधी माझ्या कानावर आली होती. त्यांच्या पुस्तकातून तर त्यांची याहूनही भयंकर अशी प्रतिमा तयार झाली होती. पण त्यांना प्रथम भेटलो तेव्हा मात्र त्यांचा वाटणारा धाक मनातून सहजपणे पुसला गेला. बाकी त्यांचं बौद्धिक वैचारिक दडपण मनावर जाणवत असलं तरीही हा माणूस दिलखुलास गप्पा मारू शकतो, हसू शकतो, कोणत्याही विषयावर आपल्याशी कोणताही आव न आणता बोलू शकतो आणि मुख्य म्हणजे तुला काय वाटतं यावरअसं सतत विचारून आपल्याला बोलण्यासाठी प्रेरीत करतो, या गोष्टी त्यांच्याशी जोडून ठेवतात. साधारण तीन वर्षांपूर्वी एका कामानिमित्तानं मी त्यांची भेट घेतली. ते काम झालं नाही पण आमचं मैत्र जुळलं. त्यांच्याशी गप्पा मारताना नेहमीच नवं काही ऐकायला शिकायला मिळतं. विचार करणं आणि शोध घेणं ही गोष्ट आमच्या गप्पांमध्ये कायम असते. एकमेकांच्या लिखाणाविषयी तसंच इतरांच्या लिखाणाविषयीही आम्ही बोलतो. ते सोशल मीडियावर नसले तरीही मी अधनं मधनं त्यांना इथं काय चालू असतं त्याची माहिती देत असतो. त्यांना अनेक गोष्टींचं कुतुहल आहे, उत्सुकता आहे आणि त्यांच्या बोलण्यांतून आणि लिखाणांतून ते जाणवतं. 
मोघ पुरुस या माझ्या कादंबरीचे ते पहिल्या काही वाचकांपैकी एक आहेत. मोघ पुरुस त्यांना वाचायला दिल्यानंतर मनात प्रचंड भिती होती की त्यांचं काय मत होईल. पण सुदैवानं त्यांनी कादंबरी, चांगली लिहिली आहे आणि विचार चांगले मांडले आहेत असं म्हटल्यावर मला हायसं वाटलं. पण त्यानंतर त्यांनी अनेक गोष्टींवर माझी मतं विचारली आणि मी काय लिहिलं आहे ते मनापासून विचार करून अभ्यास करून लिहिलं आहे की नाही याची कसून परीक्षा घेतली आणि स्वतःची मतंही मांडली. श्याम सर आणि त्यांच्या पत्नी, चित्रा मनोहर या दोघांनीही ही कादंबरी वाचली आहे. दोघांचंही वाचन आजही उत्तम आहे. नवीन निवडक जे येतं ते मला त्यांच्या घरात गेल्यावर नेहमी दिसतं. त्यामुळे दोघांच्याही प्रतिक्रिया माझ्यासाठी मोलाच्या आहेत. 
प्रवाहाविरूद्ध जे पोहतात त्यांना आजच्या काळात मोघ पुरुस मानलं जातं. एका ध्येयानं झपाटलेली माणसं समाजाच्या दृष्टीनं कायमच वेडी माणसं असतात. पण अशीच माणसं जग समाज माणसं बदलत असतात. श्याम मनोहर हे असेच एक मोघ पुरुस आहेत. त्यांच्या वैचारिक लिखाणानं ते काही एक सांगू पाहतात. ते लिखाण अनेकांना डोईजड वाटतं पण त्यात मनोहरांचा नाही तर वाचक म्हणून आपला दोष आहे. कारण आपण विचार करणं सोडून दिलं आहे. आपल्याकडे वेळ नसतो असं आपण अनेकदा म्हणतो. ते खोटं आहे. आपल्याकडे भरपूर वेळ असतो पण तो आपण निव्वळ फालतू गोष्टींमध्ये वाया घालवत असतो ज्यानं आपलं काही एक भलं होणार नसतं. त्यातलाच थोडा वेळ काढून आपण मनोहरांना वाचलं तर आपल्या जगण्याचा समाजाचा विचार करायला आपण नक्कीच सुरूवात करू शकू. मोघ पुरुस ही कादंबरी देव-धर्म-माणुसकी यांचा प्रेम, श्रद्धा आणि मृत्यु या तीन वैश्विक सत्याच्या आधारे वेध घेण्याचा प्रयत्न करते. ज्यांना आज देव मानलं जातं ती मूळ माणसंच होती आणि आपलं त्यांच्याशी माणुसकीचंच नातं असायला हवं असा विचार या कादंबरीत मांडला आहे. देव ही संकल्पना स्पष्टपणे मोडीत काढत, देवाच्या नावावर चाललेला धर्माधिष्ठित स्वार्थाचा हिंसाचार आणि द्वेषाचार थांबवण्याचं आव्हान आजच्या माणसाला कसं पेलता येईल यावर यात विचार केला आहे.
 मोघ पुरुसला सरांची यथार्थ टीका लाभली आहे. आपण वाचकही तिला समंजस आश्रय द्याल असा विश्वास आहे.
मोघ पुरुस
लेखक – प्रतिक पुरी
प्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशन, पुणे

Comments