भेदभावरहीत समाजासाठी

पुरुषी वर्चस्वाचे पारंपरीक संस्कार इतके गडद आहेत की ते सहजी मिटणार नाहीत. पण हा त्याचा दोष नाही. मी इथल्या परंपरेला दोषी मानते त्यासाठी. आजवर हेच सांगण्यात आलंय की स्त्री म्हणजे सर्व दुःखांचं मूळ. त्यामुळे तिला प्रत्येक गोष्टींत आडकाठी करायची, पण त्याचवेळी संस्कृती, परंपरा, धर्म जपण्याची जबाबदारी जणू काय तिच एकटीचीच आहे अशा पध्दतीने तिच्या जगण्याची चिकित्सा करायची. त्यासाठीच तिच्या जगण्यावर बंधनं घातली जातात, ज्याला संस्कार म्हणून गौरवलं जातं. देवी म्हणून तिचा गौरव होतो ते तिच्या मातृत्वशक्तिसाठी कारण ती वारस देते म्हणून. एरव्ही त्याच्याआधी आणि त्याच्यानंतर तिच्या जगण्याचा निव्वळ पसारा माजवला जातो. कोणताही धर्म असो स्त्री ही कायम अध्यात्म मार्गातली धोंड मानली जाते. कोणताही महापुरुष असो त्यानं स्त्रीचा निखळ मनानं गौरव केलाय असं दिसत नाही. हाच कित्ता त्यांचे भक्तही मिरवतात. म्हणूनच जगात अजूनही महापुरुष होते, होतील यावरच लोकांचा विश्वास असतो. महास्त्रिया होत्या किंवा होतील याचा कोणी विचारही करत नाही. अनेक धर्म अशी फुशारकी नक्कीच मारतील की आम्ही स्त्रियांना खूप स्वातंत्र्य दिलंय म्हणून पण स्त्री ही शेवटी पुरुषाच्या खालीच असते हेच ते दाखवून देतात त्यांच्या कृतींमधून. म्हणूनच बौध्द धर्मांत कोणतीही स्त्री बुध्द जन्माला येत नाही. हिंदू धर्मात कोणतीही स्त्री शंकराचार्य होऊ शकत नाही. ख्रिश्चन धर्मात पोप हा पुरुषच असतो. मुसलमानांमध्ये कोणताही प्रेषित महिला असत नाही. स्त्रिला मान्यता न देणारे हे धर्म आणि त्यांचे महापुरुष यांच्याविषयी माझ्या मनांत काहीही आदर नाही. ज्यांनी मानवी समुहातली अर्धी लोकसंख्या कायम गृहीत धरली, अपमानीत केली, जिच्या पोटातून जन्म घेतला तिलाच जीवंतपणी नरकयातना भोगायला भाग पाडलं आणि मृत्यूनंतरही तिला नरकच मिळेल अशा घोषणा दिल्या त्यांच्याविषयी कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीला आदर वाटू शकत नाही. हे सारं अगदी हजारो वर्षांपासून आपल्याकडे सुरू आहे. स्त्रीचं जगणं हे कायम पुरुषाच्या सापेक्ष तपासलं जातं, प्रशंसिलं जातं. तिच्या वैयक्तिक आवडी-निवडीचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. बुध्द, राम, कृष्ण, मोहम्मद जाऊन आता अडीच हजार वर्षं लोटली आहे तरीही त्या काळातली परिस्थिती मात्र अजूनही बदललेली नाही. पण याला हे महापुरुष तेवढे जबाबदार नाही जेवढा जबाबदार आहे आपला समाज. कारण या महापुरुषांनी आणि त्यांच्या धर्मानं जे सांगितलं त्यावर कसलाही विचार न करता आम्ही विश्वास ठेवला. स्वतःचा मेंदू ना आम्ही तेव्हा वापरला ना आता वापरत आहोत. मग यात दोष त्या महापुरुषांचा कसा असेल? दोष आपला आहे. काय चांगलं आहे काय वाईट आहे याची निवड करण्याची जबाबदारी आपली आहे. आपण ही निवड कायम चुकीचीच करत आलोय. त्यात आता बदल व्हायला हवा. हे आपलं जगणं आहे. त्यात शेकडो वर्षांपूर्वीचे नियम लावण्याची काही एक गरज नाही. आजच्या जगण्याला आजच्या जगण्याचेच नियम लावायला हवेत. आजच्या काळात आजच्या गरजेनुसारच विचार करावा लागेल. तरच आपण एक सुसंगत आयुष्य जगू शकू. व्यक्तिशः मला तर हे धर्मही नकोत आणि त्यांचे ते प्रेषितही नको. स्त्री-पुरुषांना व्यक्ति म्हणून समान मान देणारा समाज मला हवा आहे. 

Comments