१-
“मुक्त स्त्री होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे
स्वतःच्या जननेंद्रियांबाबतची लाज व संकोच काढून टाकून त्यांच्याबद्दल आपुलकी व
प्रेम वाटणं. स्वतःच्या शरीराशी प्रत्येकाने मैत्री करायला हवी. स्वतःच्या शरीराला
हवे तसे स्पर्श करण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तिला आहे.”
आपल्यापैकी कितीजण
नग्न होऊन आंघोळ करतात? किती जणांनी एरव्ही घरात नग्न वावर केला आहे? आपलं शरीर आरशात न्याहाळलं आहे? इथपासून सुरूवात करता येईल. नग्नतेच्या बाबतीत
स्त्रीच काय पुरुष देखील बावचळतच असतात. अगदी लहान मुलांनाही आणि मुलींना विशेषतः
आपण नग्न राहू देत नाही. आणि जसं जसं वय वाढत जातं अंगावरचे कपडेही वाढतच जातात.
मनावरची संस्काराची आवरणंही वाढत जातात. भारतात नग्नतेला धार्मिकतेत स्थान आहे.
इतरत्र नाही. एरव्ही नग्न राहणारे ते वेडेच मानले जातात. नग्नता ही तशी लाजीरवाणी
किंवा धोकादायक मानलं जाणं हे स्त्रीयांच्या बाबतीत खरंच आहे. पण याचा अर्थ आपल्या
खासगी आयुष्यातही आपल्या शरीराचं कौतुक करू नये, त्याची ओळख करू नये असा होत नाही.
आपल्या शरीराची, जे आहे त्याची, ओळख असणं, व त्याच्याविषयी कृतज्ञ असणं आवश्यक
आहे. त्याच्या आधारेच आपल्याला जगता येतं असतं शेवटी. आता इथे जननेद्रिंयांविषयी
बोलूयात. हा देखिल आपल्या शरीराचा अन्य अवयवांसारखा एक अवयव आहे हे जोवर आपण मान्य
करीत नाही तोवर त्याविषयीची अवघडलेपणाची भावना मनातून जाणार नाही. हात, पाय, नाक,
योनी, कान, बोटं, लिंग, मांडी, डोळे, डोकं हे सारे फक्त अवयव आहेत. प्रत्येकाला
त्याचं एक ठराविक काम आहे आणि त्यावरून त्याला विशेष महत्त्व देणं किंवा त्याचं
महत्त्व नाकारणं चूकीचं ठरेल. त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांच्या बाबतीत कृतज्ञ व
सहज असणं गरजेचं आहे. ते आपल्यासाठी काम करतात, आपल्या कामासाठी ते आहेत, याची
जाणीव ठेवून त्यांच्याकडे बघणं, त्यांची काळजी घेणं, यातूनच स्वतःच्या
शरीराविषयीचं अवघडलेपण दूर होऊ शकतं. प्रत्येकानं निदान आंघोळ करताना तरी पूर्णपणे
नग्न होऊन स्वतःच्या शरीरालाही मोकळा श्वास घेऊ देणं फार गरजेचं आहे. त्याची
वारंवारता वाढली तर त्याच्याविषयीचं अवघडलेपण दूर होईल. अर्थात तुमचं शरीर बेढब
असेल तर व्यायाम करण्याची प्रेरणाही मिळेल. आणि तो व्यायाम हा आवश्यकच आहे. कारणं त्यामुळेच
त्यांचं सौष्ठव टिकून राहतं आणि त्यांचं काम करण्याची ताकद, क्षमता वाढते आणि
टिकून राहते. जे जसं सर्व अवयवांसाठी तसेच ते आपल्या जननेंद्रियांसाठीही खरंच आहे.
त्यांचा व्यायाम आहे हस्तमैथुन. डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या हस्तमैथुन...आरोग्यकारक? (साकेत
प्रकाशन) या ई-पुस्तिकेत त्यांनी किन्से व किन्से अँड हाईट अहवालाच्या आधारे स्त्री-पुरुषांमधील
हस्तमैथुनासंबंधी निरिक्षणे नोंदवली आहेत. किन्से अँड हाईटच्या अहवालातील स्त्री
हस्तमैथुनाविषयी काही नोंदी पुढील प्रमाणे आहेत.
१-
स्त्रियांतील
हस्तमैथुनाचे प्रमाण पुरुषांइतके नाही.
२-
पुरुषापेक्षा
स्त्रीला प्रेम व प्रणय यात अधिक रस असल्यामुळे तिला एकटीने केलेले मैथुन म्हणजेच
हस्तमैथुन तितकेसे पसंत नसते.
३-
जननेंद्रियात
निर्माण होणारा ताण मोकळा व्हावा यासाठीही ती हस्तमैथुन करते. संभोगासाठी पर्याय
म्हणून नव्हे. स्त्री-पुरुषांतील हा एक महत्त्वाचा फरक होय.
४-
पुरुष
कामपूर्तीसाठी हस्तमैथुन करतो तसे स्त्री कामपूर्तीसाठी हस्तमैथुन करीलच असे नाही.
बरेचदा हस्तमैथुनात किंवा संभोगात कामपूर्ती झाली नाही तरी ती तृप्त असते.
५-
स्त्रियांतील
हस्तमैथुनाचे प्रमाण अतिशय कमी म्हणजे तीन आठवड्यांतून एकदा इतके कमी असते.
६-
हस्तमैथुनावेळी
पुरुष संभोगाचे चित्र रेखाटतो तसे स्त्री करीत नाही.
जोशींच्या पुस्तकात डॉडसन यांची हस्तमैथुनाविषयीची मतं वरील मतांशी
विसंगत आहेत. पण यात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. किन्से आणि व्हाईटचा
अहवाल साधारण १९५० सालातील आहे. तो जगभरातील स्त्री-पुरुषांवर आधारीत आहे, त्यातील
सँपल्सची संख्या ४००० व ८००० इतकी आहे. त्यामुळे त्यावर आधीच ब-याच तात्कालीक,
सामाजिक, सांस्कृतिक मर्यादा आहेत. आणि आपण इथे त्याचा भारताशी संबंध जोडला तर हे
सहज लक्षात येईल. डॉडसन यांची मते जी जोशींच्या पुस्तकात आहे त्याविषयी शंका न
घेण्याचं कारण म्हणजे त्यांच्या सोबतीला त्यांच्यासारख्या विचार करणा-या अनेक
स्त्रिया होत्या व स्वतः डॉडसन यांनी अगदी उन्मुक्तपणे आपली मतं आपल्या ओळखिच्या
तसेच अनोळखी स्त्रियांसमवेत तपासून घेतलेली आहेत. व्यक्तिशः मी डॉडसन यांच्याशी
सहमत आहे. मी स्वतः स्त्री-पुरुषांना व्यक्ति म्हणून जास्त मानतो. सिमॉन बोव्हा
यांच्या गाजलेल्या पुस्तकात, द सेकंड सेक्स, त्यांनी स्त्रीत्वाविषयी म्हटलं आहे
की स्त्रीत्व वगैरे नैसर्गिकपणे काहीही नसतं. या सर्व गोष्टी पुरुषप्रधान
संस्कृतीनं स्त्रियांवर लादलेल्या आहेत. नंतरच्या काळात स्त्रियांनाही त्याच
गोष्टी ख-या वाटत गेल्या. पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही गुणदोष युक्त असतात आणि
त्यांच्यात कमी अधिक प्रमाणात सारख्याच शारिरीक, मानसिक, बौद्धिक आणि लैंगिक
भावना, उर्मी व मुख्य म्हणजे गरजा असतात. पण त्यांना मुक्तपणे पाहता येत नसल्यानं
सारी अडचण निर्माण झालेली आहे. आणि हे स्त्री-पुरुष दोन्हींच्या बाबतीत खरं आहे.
लैंगिक कोंडमारा जितका स्त्रियांचा होतो तितकाच तो पुरुषांचाही होत असतो.
त्याविषयी नंतर. दुसरा मुद्दा म्हणजे आपण जर या गोष्टी स्विकारल्या, तथ्ये म्हणून
तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात. कामभावना शमवण्याचा, दमन करण्याचा नव्हे,
हस्तमैथुन हा उपयुक्त मार्ग आहे. याला जगभरच्या डॉक्टरांनी, सामाजिक
कार्यकर्त्यांनी मान्यता दिली आहे. त्याच्याकडे तिरस्काराने बघणं, त्याला कमी
लेखणं, चूकीचं मानणं सारंच अयोग्य आहे.
आता वरील संदर्भात भारताचा विचार केला तर प्राचीन भारतानं एक समृद्ध
लैंगिक स्वातंत्र्य अनुभवलं होतं यावर आजच्या काळातील भारताचा विचार करता विश्वास
बसणं कठीण आहे. पण वात्सायनाचं कामशास्त्र आणि अन्य अनेक कामविषयक पुस्तके
पाहिल्यानंतर याचा प्रत्यय येतो. आपल्या देशात पूर्वी मातृसत्ता होती. त्या काळात
स्त्रिया लैंगिकदृष्ट्या मुक्त होत्या. नंतर हे सारं चित्र बदललं. पुरुषी
संस्कृतीत जशी स्त्रियांची लैंगिक मुक्ती गेली तशीच ती पुरुषांचीही गेली. हे मत
पटायला अवघड आहे पण ते खरंच आहे. कारण स्त्री किंवा पुरुष यांची लैंगिक मुक्ती
दुस-याच्या मुक्तीशिवाय अपूर्ण आहे. स्त्रिया जर आपल्या लैंगिक प्रश्नांविषयी
उघडपणे बोलू शकत नसतील तर पुरुषांचेही तेच असते. आम्हाला देखील आमच्या पालकांनी
काही शिकवलं नाही. पिवळी पुस्तकं वाचत, पॉर्न बघत, थोराड मित्रांच्या ख-या कमी व
खोट्या जास्त गोष्टी ऐकूणच आमची लैंगिक समज वाढत गेली. ती आजही पूर्णपणे आली आहे
असं म्हणणं नाही पण डॉ. विठ्ठल प्रभू, इंटरनेट व स्वतःचे अनुभव व बौद्धिक क्षमता
यामुळे ती ब-यापैकी निरोगी आहे इतकं मात्र निश्चितपणे सांगता येईल. पण याबाबतीत
भारतीय कुटुंबाचा विचार केला तरी हे जाणवतेच की केवळ वैयक्तिकच नव्हे तर
कुटुंबाचीही लैंगिक मुक्ती होणं गरजेचं आहे. शाळेत जे लैंगिक शिक्षण दिलं जातं
त्यावर डॉडसन यांचा आक्षेप आहे. आता एखाद्या शिक्षकांना त्याविषयी विचारावं लागेल
पण एकदंरीत ते काही फारसं उपयुक्त असेल असं वाटत नाही. या पुस्तकाच्या निमित्ताने
कुठेतरी सर्वांसाठीच लैंगिक मुक्तीची चळवळ सुरू झाली तर फार बरं होईल.
लैंगिक मुक्ती म्हणजे काय याविषयी डॉडसनची काही मते आपल्याला पटतील,
काही पटणार नाहीत. पण आपल्या शरीरावर आपला हक्क आहे, हस्तमैथुन योग्य आहे, या
गोष्टी पटण्यासारख्या आहेत. पण लैंगिक मुक्ती आणि स्वैराचार यांतील सीमारेषा क्षिण
आहे. पण त्याची मर्यादा ही व्यक्तिनुसार बदलते. आणि हा कळीचा व चिंतेचा मुद्दा होऊ
शकतो. त्यामुळे मला वाटतं की याची जबाबदारी त्या त्या व्यक्तिवरच आहे. असायलाही
हवी. उदा. सांगायचं तर मी माझंच देईन. मी वेश्येकडे जाण्याचा विचारही करू शकत
नाही. पैसा असला तरी. आणि अगदी सोफिस्टेकेटेड कॉलगर्ल्स मिळवता येत असल्या तरीही.
कारण जिच्यावर माझं प्रेम नाही आणि जिचं माझ्यावर प्रेम नाही त्या व्यक्तिचा मला
स्पर्शही सहन होत नाही. मला अनोळखी पुरुषांचाही स्पर्श आवडत नाही. अगदी माझ्या
मित्रांनीही माझे हात हातात धरून फिरणे वगैरे मला फार अवघडल्यासारखं वाटतं. मी
कोणावर बलात्कार करू शकेल असं वाटत नाही. कारण ती माझी मानसिकता नाही. अशावेळी
माझ्या नैसर्गिक लैंगिक प्रेरणेसाठी मला हस्तमैथुन उत्तम उपाय वाटतो. त्यात
कोणालाही अपाय नाही. मला धरून. प्रत्येकानं आपले विचार अशा पद्धतीनं तपासून
घेण्याची गरज आहे. पण सरतेशेवटी मला ही ज्याचीत्याची वैयक्तिक बाब वाटते.
माझ्यापुरतं म्हणायचं तर जोवर समोरची व्यक्ति माझ्याशी आणि इतरांशीही माणुसकीनं
वागते तोवर मला तिच्या लैंगिक व्यवहारांविषयी काही देणंघेणं नाही.
Comments
Post a Comment