मी विद यू...नेहमीसाठी








आजची ही पोस्ट सर्व स्त्रियांसाठी आहे. आजची ही पोस्ट सर्व पुरुषांकडून आहे. तुमच्या प्रत्येक सुख-दुःखात – मी तुमच्यासोबत - आहे हे सांगण्यासाठी.
गेल्या काही महिन्यांत महिलांविषयक काही अतिशय दूरगामी परिणाम करणारे निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यांतील एक होता तिहेरी तलाकच्या संदर्भात. न्यायालयानं तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवला आणि आता सरकारनंही त्यावर कायदा केला आहे. तिहेरी तलाकमुळे मुस्लिम महिलांना ज्या अपमानास्पद यातनांना सामोरं जावं लागायचं त्याविरुद्ध दाद मागण्याची सोय आणि संधी त्यांना आता मिळू शकणार आहे. नेहमीप्रमाणेच मुस्लिम राजकीय पक्षांनी आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं याला विरोध केला असला तरी जोवर मुस्लिम महिला या निर्णयामुळे आनंदी आहेत तोवर या विरोधाला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. या कायद्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे असं त्यांचं मत आहे, त्यांतील शिक्षा ही ज्यादा आहे असं त्यांना वाटतं, पण तसं असेल तर त्याविरोधात न्यायालयात तुम्हाला दाद मागता येतेच. पण केवळ इथंही धर्माचा मुद्दा उपस्थित करून विरोधासाठी विरोध असेल तर त्याला आता कोणाचंही समर्थन मिळणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. यापुढे अन्य कोणाचं सरकार सत्तेत आलं तरीही ते या कायद्याला मागे घेणार नाहीत तर पुढच्या सुधारणेसाठीच प्रयत्न करतील अशी आशा करूयात. हा कायदा धर्मविरोधी नसून व्यक्तिहितवादी आहे अशी भूमिका घेतली, हा कायदा मुस्लिम महिलांना माणुसकी देणारा आहे असं मानलं तर हा विरोधही मावळेल अशी आशा करूयात. आम्ही सर्व पुरुष, ते मग कोणत्याही जाती-धर्माचे असोत यावेळी या मुस्लिम महिल्यांच्या सोबत आहोत हे आम्ही सांगू इच्छितो.
आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे, लैंगिक अत्याचाराविरोधी आवाज उठवत जगभरातल्या अनेक महिलांनी आपल्या भावना सर्व विरोध दूर सारत जाहिर केल्या. - मी टू - या शीर्षकाखाली आपल्यावरील लैंगिक अत्याचाराची माहिती देण्याचं धाडस या महिलांनी दाखवलं. अत्याचार झाल्याची कबुली देणं म्हणजे त्याविरोधात आवाज उठवण्याची पहिली पायरी असते. अशा गोष्टींची वाच्यता करणं अवघड असतं. कारण आपल्यावर आणि विशेषतः महिलांवर तर अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव असतात. त्यामुळे पुढे येऊन या गोष्टींची माहिती लोकांना देण्याचं धाडस करणा-या सर्व महिलांना सलाम. तुमच्यावर झालेल्या अत्याचाराला आमचाही विरोध आहे आणि तुमच्या या लढ्यात आम्हीही सहभागी आहोत याची खात्री बाळगा. पुरुष चुकीचेच असतात असं नाही. ते तुम्हालाही माहित आहे. पण जे चुकीचे वागतात अशांची संख्या कमी करण्यासाठी तुमच्याप्रमाणेच किंवा कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त मेहनत आम्हा पुरुषांनाच घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच काम करतोय आणि करत राहू. तुमच्या या लढ्यात तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. आम्ही सदैव व्यक्तिगत व सार्वजनिक, भावनिक आणि मानसिक पातळीवर तुमच्यासोबत कायम असणार आहोत याचा तुम्ही विश्वास बाळगा. ही केवळ तात्कालिक चळवळ नाही, ही प्रदीर्घ आणि सातत्यानं करावी लागणारी गोष्ट आहे आणि ती होत राहिल यावर विश्वास ठेवा.
आपण सर्व या सर्वांच्या पाठीशी उभं राहण्याचा संकल्प करूयात. माणसामाणसांतील सर्व भेदभाव संपवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहूयात अशी शपथ घेऊयात.


#mewithyouforever

Comments