ज्या
स्त्रियांना तलाक दिली गेली असेल त्यांनी तीन ऋतुस्त्रावापर्यंतच्या काळापर्यंत
प्रतिक्षा करावी. आणि त्यांच्यासाठी हे वैध नाही की अल्लाहने त्यांच्या गर्भाशयांत
जे काही घडविले आहे ते त्यांनी लपवावे त्यांनी मुळीच तसे करू नये जर त्या अल्लाह
आणि अंतीम दिनावर विश्वास ठेवीत असतील. त्यांचे पती त्यांच्याशी संबंध सुधारण्यास
तयार असतील तर ते या इद्दतच्या काळात त्यांना आपल्या पत्नी म्हणून परत स्वीकार
करण्याचे हक्कदार आहेत. आणि याबाबतीत स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्क आहे परिचीत
पध्दतीनुसार जसे पुरुषांना आहे. मात्र पुरुषांसाठी स्त्रियांपेक्षा एक दर्जा अधिक
आहे. अल्लाह प्रभुत्वशाली आणि विवेकी आहे.
(ही
आज्ञा केवळ त्याच स्थितीशी संबंधीत आहे जेव्हा पतीने पत्नीला एक किंवा दोन वेळा
तलाक उच्चारला असेल, अशा स्थितीतील तलाक, तलाके रजइ – पुनरपी विवाहास पात्र तलाक,
असते. इदद्तच्या कालावधीच्या आत तो विवाहाविना पुन्हा संबंध प्रस्थापित करू शकतो.)
सूरह
अल् ब़करा – आयत २२८
तलाकच्या
बाबतीत कुराण काय सांगतं याविषयी आपण सध्या चर्चा करतोय. तलाकचा विषय मोठा
असल्यानं वेगवेगळ्या स्वरुपात ही चर्चा होणार आहे. संबंधीत वचनामध्ये याविषयी आणखी
पुढची माहिती देण्यात आली आहे. इथं पतीनं तलाक हा शब्द उच्चारल्यानंतर पती-पत्नी
दोघांनीही काय करावं याची माहिती दिलेली आहे. यात खालील मुद्दे आहेत.
१-
ज्या स्त्रियांना तलाक मिळाला आहे त्यांनी तीन
ऋतुस्त्रावापर्यंत वाट बघावी आणि या दरम्यान त्यांच्या गर्भाशयात काय घडतंय त्याची
माहिती दडवून ठेवू नये असं म्हटलं आहे. तीन ऋतुस्त्राव म्हणजे साधारणपणे तीन
महिन्यांचा अवधी असतो. तलाकच्या आधी जर पती-पत्नीमध्ये शरीरसंबंध घडला असेल तर
शक्यता आहे की पत्नी या पुढच्या तीन महिन्यांच्या काळात गर्भवती राहू शकेल. जर तसं
झालं तर ही बातमी त्यांनी त्यांच्या पतीपासून लपवून ठेवू नये असा एक विचार इथं
आहे. त्याचं एक कारण म्हणजे अनेकदा मुलं झाल्यानंतर पती-पत्नींमधील संबंध सुधारतात
हा एक सामान्य विचार आहे. त्यामुळे तलाक टळण्यास मदत होऊ शकते. मुल न होणं हीच
गोष्ट जर तलाकमागे असेल तर तोही मुद्दा इथं निकालात निघतो. त्यामुळे या तलाकच्या
काळानंतर ते एकत्र येऊ शकतात. फक्त ही परवानगी पहिल्या दोन तलाक उच्चारण्यापूरतीच
आहे. तिस-यांदा जर तलाक उच्चारला तर ही परत एकत्र येण्याची संधी दोघांनाही नाही.
हा मुद्दा थोडा विस्तारानं समजून घ्यायला हवा. पण त्याआधी वरील वचनातला दुसरा
महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊयात.
२-
स्त्रियांना देखील पुरुषांप्रमाणेच तलाकच्या बाबतीत हक्क
आहे असं यात म्हटलेलं आहे. फक्त पुरुषांसाठी यात एक दर्जा अधिक आहे.
आता
या दोन्ही मुद्द्यांचा एकत्रित विचार करूयात. आधी म्हटल्याप्रमाणे दोनदा तलाक
उच्चारला आणि त्यानंतरही पती-पत्नीला एकत्र यावसं वाटलं तर ते एकत्र येऊ शकतात.
दोन तलाकमध्ये किमान आठ महिन्यांचा वेळ जातो. शिवाय कोणी उठसूठ तलाक देणार नाहीत
हा विचार यात आहे. जो दूर्दैव्यानं व्यवहारात सापडत नाही. याला कारण धार्मिक
पुढा-यांनी मुस्लिम पुरुषांचं न केलेलं प्रबोधन हे आहे. तेही मूळात पुरुषच आहेत
याचा प्रभाव नाहीतरी पडतोच. असो. पण एरव्ही तुम्ही संयमानं वागावं असंच कुराणात
अभिप्रेत आहे. विवाह विच्छेद ही गंभीर बाब आहे व ती त्याच गांभीर्यानं घ्यायला हवी
असा अर्थ याचा आहे. मुस्लिम पुरुषांनी मात्र यातला विचार करण्याचा हा भाग कायम
टाळलाच आहे व त्यामुळे त्याचा मुस्लिम महिलांना अतोनात त्रास सोसावा लागला आहे.
तलाकसंबंधी निर्णय पुरुषांवर असल्यानं तो आपला विशेषाधिकार असल्याप्रमाणे पुरुष
त्याच्या वापर करत आले आहेत. ज्याचा त्यांनाही फटका बसलेला आहे.
दोनदा
तलाक उच्चारल्यानंतर तिस-यांदा तलाक जेव्हा उच्चारला जातो तेव्हा विवाह विच्छेद
होतोच. मूळात तुमचं जर पटतच नसेल तर पहिल्याच वेळी तुम्ही एकत्र येण्याची शक्यता
नसते. तरीही दुसरी संधी दिलेली आहे. कारण विवाह विच्छेद हा गंभीर विषय आहे. पण
दुस-यांदाही पटत नसेल तर मात्र दोघांनीही विभक्त होणंच चांगलं असतं. आता यात
पत्नीची काय बाजू आहे हे समजून घेऊयात. वर सांगितलेला दुसरा मुद्दा असं म्हणतो की
पत्नीलाही पुरुषांप्रमाणेच अधिकार आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तलाकच्या
बाबतीत पत्नीला आपण म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार यात आहे. हा तलाक केवळ पतीच्या
इच्छेनुसार होणार नाही हा याचा अर्थ होतो. पत्नी बहुधा आपला संसार टिकवून
ठेवण्यासाठी आग्रही असतात त्यामुळे त्या तलाकला तयार नसतात. पण पती जर तलाकवर अडून
बसला असेल तर तिलाही आपला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हे आहेच. दोघांनाही तलाकच
हवा असेल तर अडचण नाही. पण एकालाही जर तो नको असेल तर दुस-याची समजूत घालण्यासाठी
तलाकची मुद्दत दिली गेली आहे असं मला वाटतं. या काळात परिचीत, घरची मोठी माणसं,
समाजातली प्रतिष्ठीत मंडळी यांनी त्या माणसाची समजूत काढावी, त्या दोघांचंही
म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यांच्या या निर्णयाचे होणारे बरेवाईट परिणाम यांची
माहिती त्यांना द्यावी हे इथं अपेक्षित आहे. आणि सहसा असं जेव्हा घडतं तेव्हा
बरेचसे तलाक हे पहिल्याच फेरीत बाद होतात. पण असं झालं नाही आणि पती जर तलाकवर
अडून राहिला तर अशावेळी पत्नीनं ते मान्य करणं कधीही चांगलं. कारण दोघांपैकी एकाला
जरी हे नातं मान्य नसेल तर अशा बळजबरीच्या नात्यात न राहणं कधीही चांगलं. फक्त आता
ही पतीची जबाबदारी असेल की त्यानं आपल्या पत्नीची जबाबदारी घ्यावी कारण ती
अल्लाहची इच्छा आहे. पत्नीची काळजी घेता येत नसेल तर मात्र पतीनं आपल्या निर्णयाचा
पुनर्विचार करणं कधीही चांगलं. अर्थात आता काळ बदलत आहे. त्यामुळे मुस्लिम
मुलींनीही शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं यातच शहाणपणा आहे. त्यांच्या
आईवडीलांनीही ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या मुलींना शिकण्यासाठी व नोकरीसाठी
प्रोत्साहन द्यायला हवं. हीच काळाची गरज आहे.
दुसरं
म्हणजे तलाकमधील काही समजूतीच्या गोष्टी व्यवहारातून हळूहळू बाद होत गेल्या. विवाह
करणं हा पैसे मिळवण्याचं एक माध्यम झालं, मुलांसाठी पत्नीवर दबाव येऊ लागला, आपल्याला
कधीही तलाक देऊ शकता येतो, चार बायका करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे अशा
गैरसमजूतींनी मुसलमान पुरुष घेरला गेला. मूळ गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न त्यानं
केला नाही आणि त्याच्या धार्मिक पुढा-यांनीही त्याला हे समजावून सांगितलं नाही.
तलाकसंबंधी यापुढच्या चर्चेतून याही गोष्टींचा विचार आपण करणार आहोत.
Comments
Post a Comment