पाटा आणि वरवंटा



सायली मठाधिकारी दिग्दर्शीत आणि रवींद्र मठाधिकारी यांची कथा असलेल्या वरवंटाशॉर्टफिल्मला नुक्ताच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आयोजित स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला. आज या लघु चित्रपटाबद्दल सांगण्याचं कारण म्हणजे त्याचा विषय. त्याची कथा. चित्रपटाची सुरूवात होते एका नुक्तच लग्न झालेल्या उत्साही तरुणीच्या सेल्फी घेण्यानं. त्यानंतर तिला तिच्या सासरच्या घरातील एक जेष्ठा एका पाटा-वरवंट्यापाशी बसवते. तो एक विधी असतो. अशा लहान सहान विधी लग्नात होत असतात. अंगठी शोधा, उखाणा घ्या वगैरे. तसाच हाही असेल असं त्या तरुणीला वाटतं. तीही आनंदानं बसते. पण त्यानंतर त्या विधीमागची कल्पना जेव्हा ती जेष्ठा तिला ऐकवते तेव्हा त्या विवाहितेचा सारा उत्साह मावळतो. ती म्हातारी म्हणते, हा वरवंटा म्हणजे तुझा नवरा आहे. हा पाटा म्हणजे तू आहेस. आता या वरवंट्याखाली तू तुझी ओळख, तुझा स्वाभीमान, तुझी स्वप्नं, तुझ्या आकांक्षा सारं सारं वाटून टाकायचं. तुझं अस्तित्व आणि सरते शेवटी तुझं आयुष्यही त्याखाली वाटून टाकायचं.
हा एक प्रतिकात्मक विधी आहे पण त्यातला पारंपरिक अर्थ उघड आहे. दूर्दैव्य म्हणजे तो आजही आपल्यापैकी बहुसंख्यांच्या मनात आहे. सगळीकडे हा विधी होत नसेल, पण त्यातला आशय मात्र या ना त्या मार्गानं सांगितलाच जातो. कधी सासू सांगते, कधी सासरे सांगतात, कधी नणंदा, कधी नवरा, कधी नातेवाईक तर कधी शेजारचेही अक्कल पाजळतात. मुख्य म्हणजे मुलीच्या घरचेच लोक यात जास्त पुढाकार घेतात. यांतूनच माहेरातून तुझी वरात निघाली, सासरहून तुझी प्रेतयात्रा निघू दे, असं तिला सांगणं. मुलगी परक्याचं धन, सासरी गेल्यावर काही झालं तरी सोसायचं पण माहेरचं नाक कापायचं नाही असले सल्ले यांतूनच दिले जातात. मुलींवरही इतकं दडपण असतं की त्या शब्दशः याचं पालन करतात. नवरा आणि सासरची मंडळी म्हणतील तशाच त्या वागतात. यात सुधारणा नक्कीच होत आहे पण अजूनही बराच टप्पा गाठायचा आहे. लग्न हा एक गुंतागुंतीचा व्यवहार आहे आणि हा गुंता समंजसपणानंच सोडवता येतो. समंजसपणा नसेल तर तो आणखी वाढतच जातो.
मला आशा आहे की आपल्यापैकी असं कोणी करणार नाही. मुलीला तिची स्पेस द्याल. केवळ तिचं लग्न झालं म्हणून तिनं आपल्या आशाआकांक्षांना तिलांजली देऊन मिठ जसं पाण्यात विरघळतं तसं तुमच्या संसारात विरघळून जावं, स्वतःचं अस्तित्त्व मिटवून टाकावं अशी अपेक्षा ठेवणार नाही अशी आशा आहे. मुलींनाही तेच सांगणं आहे की त्यांनीही असला मूर्खपणा करू नये आणि लग्नाआधी सर्व गोष्टी नाही पण महत्त्वाच्या गोष्टींबाबत मुलाकडून त्याच्या घरच्यांकडून स्पष्टीकरण मागावं. मुलींनी पाटा होऊ नये आणि मुलांनीही वरवंटा होऊ नये. तरंच त्यांचं सहजीवन सुखाचं ठरेल.


Comments