वरील
शीर्षकात एक प्रश्नचिन्ह दिलं आहे. त्याला कारण आहे. लग्न हे केवळ मुलगा आणि मुलगी
यांच्यातच होत असतं का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. लग्न हे या दोघांत होत
असलं तरीही ते फक्त त्यांच्यातच कधीच होत नाही. ते दोन कुटुंबांमध्येही होत असतं.
त्या दोघांच्याही मित्र-मैत्रिणींमध्येही ते लग्न होत असतं. फक्त भौतिक पातळीवरच
नाही तर अभौतिक पातळीवर म्हणजे मानसिक भावनिक पातळीवरही हे लग्न होत असतं. लग्न हा
शब्द सलग्न यापासून आला आहे. लग्न म्हणजे जोडलं जाणं. आपण कोणाशी तरी जोडले जातो
म्हणून लग्न.
हे
जोडलं जाणं अनेक पातळ्यांवर घडतं. यातली एकही पातळी हुकली, चुकली की समस्या तयार
होऊ लागतात. प्रेमात सारं काही गोडगोजीरं असतं मग लग्न होताच तो गोडवा कुठे जातो
असा प्रश्न सर्वांनाच सर्वकाळ पडत आला आहे. त्यामागचं कारण हेच आहे की प्रेम ही
वैयक्तिक बाब असते. ती तुम्ही जाहिर करणं न करणं ही तुमची निवड असते. लग्नाच्या
बाबतीत असं नसतं. ती सार्वजनिक बाब असते. कौटुंबिक बाब असते. तुम्हाला वैयक्तिक
काही संधी मिळावी म्हणून समाज तुम्हाला काही अधिकार बहाल करत असतो. प्रेमात पूर्ण
स्वातंत्र्य असतं पण लग्नात ते नसतं. तिथं असते जबाबदारी, उत्तरदायीत्व. कारण
तुम्ही जे काही कराल त्याचे परिणाम फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या पूर्ण
कुटुंबाला भोगावे लागतात. तुमच्याशी संबंधीत अनेकांना त्याचा त्रास होऊ शकतो.
महत्त्वाचं म्हणजे ही बाब सार्वजनिक होते. असं होण्याचं कारण म्हणजे लग्न हा
व्यवहार आहे. एक व्यावहारीक करार आहे तो. प्रेमात तसं नसतं. ती आत्यंतिक वैयक्तिक
गोष्ट आहे. तिथला आनंद जसा वैयक्तिक तसा त्रासही वैयक्तिकच असतो.
लग्न
करताना म्हणूनच आपण सारी चौकशी करतो आधी. प्रेम करताना कोणी तशी चौकशी करत नाही.
म्हणून आपण म्हणतो की मी ‘लग्न करतोय.’ प्रेमाच्या बाबतीत मात्र मी तिच्या ‘प्रेमात पडलोय’ असं म्हणतो. कारण तिथं
खरंच आपण मागचापुढचा काहीही विचार न करता ती कृती केलेली असते. पडताना आपण कधी
विचार करत नसतो. की चला आपण आज रस्त्यावरून चालताना मस्तपैकी पडूयात म्हणून. ते
आपल्या डोक्यातही नसतं. तशी इच्छाही नसते. प्रेमाचं तसंच आहे. ते कधी होईल
कोणासोबत होईल ते सांगता येत नाही. विचारांना इथं स्थान नाही. लग्नात ते असतं.
जेव्हा
विचार असतात तेव्हा व्यवहारही सुचतो आपल्याला. म्हणून लग्न ही तडजोडीची प्रक्रिया
आहे कृती आहे. तिथं तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सर्वांना सुखी ठेवणं अशक्य.
तेव्हा तो नादही करायचा नाही. प्रेम असेल तर लग्न केल्यावरही ते टिकून राहिल याची
काळजी घ्या. प्रेम नसेल तर ज्याच्याशी लग्न झालंय त्याच्यावर प्रेम करा. शेवटी
नवरा बायकोच एकमेकांच्या सोबत असतात. बाकी लोक सोबत असले तरीही त्यांच्या मर्यादा
असतात. काळजी ही घ्यायची की त्यांना त्यांच्या मर्यादा ओलांडू द्यायच्या नाहीत आणि
तुम्हीही तुमच्या मर्यादा ओलांडून त्यांना त्रास होईल असं वागायचं नाही. ही म्हटलं
तर तारेवरची कसरत आहे आणि म्हटलं तर त्यात मजाही आहे. तुमचं तुमच्या जोडीदारावर
प्रेम असेल, विश्वास असेल, तर हे सोपं होतं. नसेल तर मात्र मग कठीण आहे. तेव्हा जे
काही करायचं ते विचारपूर्वक करा.

Comments
Post a Comment