इस्लाम आणि स्त्री-पुरुष विचार – ३

तुमच्या पत्नी तुमच्यासाठी शेती (तुमचा वंशवृध्दी करणा-या जननी) आहेत. तेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा (वंशवृध्दीच्या भावनेने) तिच्याकडे जा. परंतु भविष्याची काळजी घ्या आणि ईश्वरी कोपाचे भय बाळगा. आणि जाणून असा की तुमची भेट होणार आहे. आणि हे प्रेषित मुहम्मद (स.), जे तुमच्या आदेशांना मानतील त्यांना (सफलता आणि सौभाग्याची) शुभवार्ता सांगा.
सूरह – अल् ब़करा - आयत २२३
दिव्य कुरआन – मराठी भाषांतर – सय्यद अबुल आला मौदूदी – इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट

कुराण हा इस्लामचा एकमेव पवित्र धार्मिक ग्रंथ आहे आणि त्यानुसारच मुस्लिम लोकांच्या धार्मिक परंपरा सुरू असतात. कुराण हा मुस्लिम माणसाला त्याच्या व्यावहारीक बाबींमध्येही मदत करतो त्यामुळे त्याचं महत्त्व वेगळं आहे. इस्लाम आणि कुराण हे दोन्ही समानार्थी शब्द म्हटले तरी ते चूकीचं ठरणार नाही. त्यामुळे इस्लाम आणि स्त्री-पुरुष विचार असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात कुराणात याविषयी काय म्हटलं आहे त्यासंबंधीच मी बोलणार आहे.
कुराणचं महत्त्व व्यवहारातही आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे प्रेषित मुहम्मद यांना एक नवीन राज्य स्थापन करायचं होतं आणि ते करताना त्यांच्या पुढे जे अनेक व्यावहारीक प्रश्न येत गेले त्यावर त्यांना अल्लाहच्या कृपेनं सुचलेली उत्तरं यात दिली गेली आहेत. त्यामुळे जीवनाच्या अनेक बाजू यात समाविष्ट झालेल्या दिसतात. त्यांत स्त्री-पुरुषांचे परस्पर संबंध हाही महत्त्वाचा विषय आहे. यापुढच्या लेखांमध्येही आपण जे बोलणार आहोत त्याचा आधार वर सांगितलेली कुराणाची आवृत्ती असणार आहे. त्यामुळे मी वारंवार त्याचा उल्लेख करणार नाही. यातले विचार देखील माझेच आहेत हे सांगायला नकोच.
आता या पहिल्या वचनासंबंधी. यातील पत्नीसाठी शेतीची जी उपमा वापरली गेली आहे तशीच उपमा हिंदूंनी वेदांमध्ये वापरली आहे. शिवाय क्षेत्र म्हणजेच स्त्री आणि बीज म्हणजे पुरुष ही संकल्पनाही वेदांमध्ये वापरलेली आहे. प्रस्तुत वचनामध्ये ज्या गोष्टी वरवर दिसतात त्या म्हणजे
१-       पत्नी ही पतीची खासगी शेती असते जिचा तो वंशवृध्दीसाठी उपयोग करत असतो.
२-       जेव्हा त्याची इच्छा होईल (वंशवृध्दीची) तेव्हा त्यानं तिच्याकडे जायला हवं.
३-       फक्त हे करताना भविष्याची काळजी घ्या आणि ईश्वरी कोपाचे भय बाळगा.
४-       हा पै. मुहम्मद यांचा आदेश जे मानतील त्यांना शुभवार्ता सांगण्यात येईल.
वरील वचनाचा हा शब्दशः अर्थ आहे. कुराणचा अर्थ लावतानाच नाही तर कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना केवळ वरच्या अर्थाकडे लक्ष दिलं तर अनेकदा चुकीचा अर्थ हाती लागतो आणि विशेषतः धार्मिक बाबतीत हे बहुधा घडतं. इतर धर्म ग्रंथांच्या बाबतीत फार बोलण्याचं कारण नाही. कारण एकतर तो आपला विषय नाही. दुसरं म्हणजे कुराणचा जितका प्रभाव आजही मुसलमानांवर आहे तितका अन्य धर्म ग्रंथांचा नाही. त्यांचं आजही पठण पुजन होतं पण व्यवहारात काही त्यांची ढवळाढवळ होत नाही. कुराण त्याला अपवाद आहे. त्यामुळे या वचनांचा सुयोग्य अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत
१)       पहिल्या मुद्द्यात पत्नी ही शेती आहे याचा उल्लेख करण्यात आला आहे ज्याचा अर्थ हा होतो की पती हा शेतकरी आहे. दोघांनी एकमेकांच्या सहाय्यानं ही वंशवृध्दी करावी असा अर्थ इथं अभिप्रेत आहे. इथं पती-पत्नी दोहोंकडून व्यभिचाराला स्थान नाही.
२)       दुसरा मुद्दा हा संततीसाठी कधी पत्नीशी संबंध करावा यासंबंधी आहे. यात जेव्हा वंशवृध्दीची इच्छा होईल तेव्हा हा संबंध करावा असा एक अर्थ आहे. पण याचा अर्थ एरव्ही त्यांनी शरीर संबंध करू नये असा नाही, तर अपत्यासाठी एकमेकांचा विशेषतः पत्नीची संमती आवश्यक आहे असा होतो. त्यामुळे पत्नीवर गर्भारपण लादण्याआधी विचार करावा हा एक अर्थ आपल्याला घेता येईल. गर्भारपण टाळून शरीरसंबंध करावा त्यामुळे संतती नियमनाचा वापर आजच्या काळाच्या संदर्भात करायला हरकत नाही.
३)       तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. यात भविष्याची काळजी व ईश्वरी कोपाचे भय बाळगण्याबद्दल सांगितलं आहे. भविष्याची काळजी घ्यायची आहे ती आधी म्हटल्याप्रमाणे पत्नीवर किती गर्भारपणं लादायची हा एक भाग. दुसरा म्हणजे आपण किती मुलांचं पालनपोषण करू शकतो याचा विचार करणं हाही आहे. कारण भारंभार मुलं पैदा करून त्यांचं योग्य ते पालन पोषण करता आलं नाही आणि पत्नीचाही यात बळी गेला तर ते ईश्वराला खचितच आवडणारं नसेल. त्यामुळे त्याचा कोप होण्यापासून वाचायचं असेल तर मुलांसंबंधी योग्य तो निर्णय घेणं योग्य ठरेल. त्यामुळे परिस्थितीचा काळाचा विचार करणं इथं फार गरजेचं आहे. नव्हे ती पूर्वअट आहे.
४)       शेवटचा मुद्दा हा की आपलं कुटुंब जर सीमीत असेल, सुखी असेल तर त्या घरावर प्रेषितांचे आशीर्वाद कायमच राहतील.
वरील वचनाचा हा अर्थ मला अभिप्रेत आहे. तो मानवतेच्या विरूध्द जाणारा नाही आणि त्यानं कोणाचीही धार्मिकता संकटात येण्याचाही धोका नाही. आजच्या एकविसाव्या शतकातला सुजाण मुसलमान पुरुष आणि स्त्री याचा विचार करून वागतील तर ते त्यांच्याच नव्हे तर सर्वांच्याच हिताचं ठरेल. केवळ त्यांच्यासाठीच नाही तर इतरांसाठीही या गोष्टी मार्गदर्शक ठरू शकतात.


Comments