इस्लाम
समजून घ्यायचा असेल तर कुराण समजून घ्यायला हवा. यातली प्रमुख अडचण अशी आहे की
कुराणचा नेमका अर्थ काय लावायचा. कुराणचा अर्थ लावण्यावरून यात वेगवेगळे गट पडले
आहेत त्यामुळे तर ही गोष्ट आणखीच गुंतागूंतीची झाली आहे. कुराणातील एकाच आयतचा
म्हणजे वचनाचा वेगवेगळा अर्थ लावलेला आपल्याला दिसून येतो. हा अर्थ काय असेल हे
त्या त्या माणसाच्या वृत्तीवर अवलंबून असतं. त्याची बौध्दीक क्षमता, त्याची विचार
करण्याची पध्दत, त्याचा समजंसपणा, त्याच्या भोवतीचं वातावरण, त्याचा निर्भयपणा या
सगळ्यांवर हे अर्थ अवलंबून असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यानं कुराणचे अनेक
अर्थ प्रचलीत आहेत. मग कोणता अर्थ खरा मानायचा हे सामान्य मुसलमानाला कळत नाही. तो
मग त्याच्या स्थानिक धार्मिक माणसाकडे जातो आणि तो जे सांगेल ते प्रमाण मानतो. आता
ह्या धार्मिक माणसालाही स्वतःचा विचार असा असत नाही. तोही इतरांनी लावलेल्या
अर्थामधून त्याला जो भावेल तोच अर्थ सांगतो. दूर्दैव्यानं हे सारे अर्थ बहुशः
पुरुषांच्या बाजूचे असतात, स्त्रीच्या विरोधातले असतात. किंवा असे असतात ज्यात
पुरुषांना नको त्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि व्यवहारांत वावरताना त्याला
त्रास होतो. त्यामुळे खरं पाहता सामान्य मुसलमान असो की त्याचा धार्मिक पुढारी असो
यांना थेट दोष देण्यांत काही अर्थ नाही. कमी जास्त प्रमाणात असा प्रकार सर्वंच
धर्मांत घडत असतो.
कुराणचा
खरा अर्थ मग काय घ्यायचा? त्याला काय अटी असाव्यात?
कुराणचा
अर्थ लावताना आपण कोणत्या काळात वावरतोय याचा विचार करणं सर्वांत गरजेचं आहे.
ब-याचशा गोष्टी या काळानुरुप सांगितलेल्या असतात आणि काळ बदलला की त्याचे अर्थही
बदलत असतात. तुम्ही जर शब्दशः अर्थ घेतला तर मग तुमची फसवणूक होण्याची शक्यता
जास्त असते. त्यामुळे काळाचा विचार करून, काय सांगितलं आहे त्याचा अर्थ लावणं
गरजेचं असतं. दुसरं म्हणजे तुमच्या आजच्या जगण्याला, तुमच्या व्यावहारीक जगण्याला
बाध येऊ नये हे बघणंही महत्त्वाचं असतं. तिसरं म्हणजे कोणत्याही प्रकारे माणुसकीला
कलंक लागू नये हे बघायला हवं. या तीन कसोटीवर कोणत्याही धार्मिक ग्रंथाचं वाचन,
निरिक्षण, मूल्यांकन करणं महत्त्वाचं असतं. त्याचा अर्थही याच तीन कसोटींवर
लावायचा असतो.
यासाठीच
वेळोवेळी या धर्म ग्रंथांची चिकित्सा करावी लागते. तीही डोळे उघडे ठेवून. नाहीतर
केवळ वरवरच्या शब्दांकडे लक्ष दिलं तर लवकरच लक्षात येईल की ग्रंथात जे सांगितलं
आहे त्याचा वर्तमानाशी काहीही संबंध जुळत नाहीय. त्यामुळेच विद्वान, जाणते लोक
योग्य तो अर्थ काढण्यासाठी धडपडत असतात. वरील तिन कसोटीत जर तो अर्थ बसत नसेल तर
त्या गोष्टी टाळणं हिताचं राहतं. हा सर्वंच ग्रंथांसाठी नियम असायला हवा. हे होत
नाही आणि मग संघर्षाची स्थिती जन्माला येते.
मी
स्वतः वर्तमान काळाचा संदर्भ घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला तो अधिकार
आहे की नाही असा प्रश्न विचारला जाईलच. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे, मी माणूस आहे
आणि त्याच नात्यानं मी हे सारं करणार आहे. त्यावर चर्चा झालीच तर उत्तमच आहे. जे
चांगलं आहे ते स्वीकारण्याचा उमदेपणा आणि जे चूकीचं आहे ते नाकारण्याचा निर्भयपणा
आपल्यांत असायलाच हवा. जगणं मग सोपं होतं.
Comments
Post a Comment