इस्लाम आणि स्त्री-पुरुष विचार (तलाक संबंधीत) - ४

जे लोक आपल्या पत्नीशी संबंध न ठेवण्याची शपथ घेतात त्यांच्यासाठी चार महिन्यांचा अवधी आहे. जर त्यांनी पुन्हा संबंध प्रस्थापित केले तर अल्लाह क्षमावंत व कृपावंत आहे.
(शरीअत-इस्लामी कायदेशास्त्राच्या परिभाषेत या गोष्टीला ईला असे म्हणतात. पती व पत्नी यांच्यातील संबंध नेहमी आनंददायकच असू शकतील असे नाही, तर त्यांच्यात बिघाड येण्याची कारणे उद्भवतात. परंतु त्यांच्यातील असे बिघाड, की त्या उभयतांची कायद्यात्मक रीतीने तर एकमेकांशी बांधीलकी असेल. व्यवहारतः ते दोघे एकमेकांपासून असे विभक्त असतील जणू ते पती व पत्नी नाहीच. हे अल्लाह कायद्याच्या (शरीयत) विरूध्द कृत्य आहे. पती व पत्नी संबंधातील अशा बिघाडासाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने चार महिन्यांची मुदत ठरवून दिलेली आहे. एकतर या कालावधीत त्यांनी आपले संबंध नीट करावेत नाहीपेक्षा वैवाहिक संबंध तोडून टाकावेत. जेणेकरून ते दोघे एकमेकांपासून मुक्त होऊन इतर ज्या कोणाशी निभाव शक्य असेल त्याच्याशी त्यांनी विवाह करावा.)
सूरह अल् बकरा – आयत २२६
तलाक हा मुद्दा नेहमी विवादास्पद राहिलेला आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयातही या विषयावर निकाल देण्यात आला आहे. आणि तो आता घटनात्मक कक्षेत आणला गेला आहे. यावर आता काही मुस्लिम संघटनांनी हा आमच्या धर्मांत हस्तक्षेप आहे अशी ओरड सुरू केलीच आहे. त्यामुळे कुराणात याविषयी नेमकं काय सांगितलं आहे आणि दुसरं म्हणजे सध्याच्या काळात त्याचा अर्थ काय घ्यावा याचा विचार इथं करायचा आहे. वरील वचनात शब्दशः दोन मुद्दे आहेत.
१-       ज्या पतींना आपल्या पत्नींशी संबंध ठेवायचा नाही त्यांच्यासाठी ४ महिन्यांचा अवधी आहे यावर विचार करण्यासाठी.
२-       जर या काळात पुन्हा दोघांतले संबंध प्रस्थापित झाले तर त्यानं अल्लाह आनंदीच होतो.
जे मुद्दे या वचनात अंतर्भूत आहे ते म्हणजे
१-       यात पत्नीला तलाक घेण्याचा अधिकार नाही.
२-       पतीला पुन्हा संबंध ठेवायचे असतील तर त्यात पत्नीचं म्हणणं काय आहे ते यात समाविष्ट नाही.
आता या चारही मुद्द्यांचा विचार करूयात. त्याआधी हे लक्षात ठेवा की तलाकसंबंधी हे फक्त एक वचन आहे व अशी अनेक वचनं आहेत ज्यांचा आपण यानंतरही विचार करणार आहोत. त्यामुळे या एका वचनावरून तलाकसंबंधी आपली मतं ठरवण्याची घाई करणं चुकीचं होईल. आता वरील वचनाचा विचार करूयात.
या वचनात तलाकसाठी पतीला अधिकार देण्यात आला आहे असं दिसतं. पण पत्नीलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे ज्यासंबंधी आपण नंतर विचार करणार आहोत. वरील वचनाचा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तलाकची इच्छा प्रदर्शित केली तरी तो तडकाफडकी होत नाही. तर त्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी ४ महिन्यांचा अवधी देण्यांत आला आहे. ही महत्त्वाची बाब आहे. कायद्यानुसारही ६ महिन्यांचा अवधी घटस्फोटासाठी अर्ज देणा-या दांपत्याला देण्यात येतो. त्यामागचा विचारही हा की रागाच्या भरात जो निर्णय घेतला आहे त्यावर या काळात दोघेही शांतपणे विचार करतील. राग शांत झाल्यावर अनेकांना आपली चूक कळून येते त्यामुळे हा अवधी महत्त्वाचा ठरतो. कुराणही ४ महिन्यांचा अवधी देतोय. रागाच्या भरात जर पतीनं तलाकची मागणी केली तरीही त्याला तो एकदम मिळत नाही. चार महिन्यांच्या अवधीत जर पती-पत्नीचं पटलं तर तलाकची वेळ येतच नाही.

आधी सांगितल्याप्रमाणे पत्नीला तलाक घेण्याचा अधिकार या वचनात तरी दिसून येत नाही. इथं पतीची बाजू मांडली आहे. दुसरं म्हणजे पतीची इच्छा असली तरीही पत्नीचं म्हणणं काय आहे हे वरवर दिसत नसलं तरीही त्याचा समावेश आहे. कारण ४ महिन्यांच्या काळात पतीची इच्छा बदलली पण पत्नीची बदलली नाही तर तलाक पक्का होतो. पण होता होईतो असं होऊ नये, त्यांनी असं करू नये अशीच कुराणची इच्छा आहे. जी अल्लाहची इच्छा आहे. त्यामुळे समजंस जोडप्यानं याचा विचार करायला हवा. राग हा वाईट असतो आणि रागाच्या भरात ज्या गोष्टी केल्या जातात त्यांचा पुढे पश्चाताप होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांतून वाचण्यासाठी व एक संधी मिळण्याची सोय या वचनातून ४ महिन्यांचा अवधी देऊन केली आहे. आपल्याला हीच बाब लक्षात ठेवायची आहे की राग वाईट असतो व त्यामुळे रागाच्या भरात म्हटलेल्या गोष्टी खरोखर करायच्या नसतात. त्यात तुमचं व इतर सर्वांचं नुकसान असतं. ते टाळायलाच हवं. 

Comments