इस्लाम आणि स्त्री-पुरुष विचार – १

गेल्या काही लेखांमध्ये आपण विविध धर्मांमध्ये स्त्री-पुरुष संबंधांबाबत काय म्हटलं आहे आणि त्यांच्या महापुरुषांनी कोणते विचार प्रकट केले आहेत त्याविषयी बोलत आहोत. या पुढच्या लेखांमध्ये इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद यांचे विचार काय आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. इस्लामबाबत आपल्याकडे अनेक समज गैरसमज आहेत. अन्य धर्मियांनाच नाही तर खुद्द मुसलमानांनाही आपल्या धर्माची पूर्ण माहिती नसते. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे ते कुराणाचा अर्थ स्वतःहून समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांचे धार्मिक पुढारी जे सांगतील त्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवतात. ही अर्थातच चांगली पध्दती नाही. आपल्याला विचारबुध्दी आहे आणि त्याचा आपण उपयोग करायलाच हवा. दुसरं म्हणजे कुराणचा काळ हा दीडेक हजार वर्ष जुना आहे. त्याकाळची परिस्थिती आता राहिली नाही. पण काही धार्मिक कट्टरतावादी त्याच काळात अजूनही वावरतात. त्यामुळे त्यांचा आग्रह असतो की कुराणच्या गोष्टी जशाच्या तशा आजही लागू कराव्यात. हे अर्थातच शक्य नसतं. पण तरीही तसा प्रयत्न होत असतो. याचा सर्वांनाच फटका बसतोय. मग तो मुसलमान पुरुष असो वा मुसलमान स्त्री असो. सामान्य मुसलमान धार्मिक बाबतीत त्याच्या धार्मिक पुढा-यावर विश्वास ठेवतात आणि ते पुढारी मात्र काळाबरोबर राहून योग्य तो निर्णय देण्याऐवजी काहीतरी भलतंच सांगत बसतात ज्याचा आजच्या काळाशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे व्यवहारात वागताना मग अडचणी येतात. खरं तर तसं करण्याची काहीही गरज नाही.
दुसरं असं की इस्लाम धार्मिक सुधारणांच्या बाबतीत खूपच कंजूस आहे. त्यात इतर धर्मियांनीच काय त्यांच्या धर्माच्या लोकांनी सुचवलेल्या सुधारणाही त्यांना मान्य होत नाहीत. पण व्यवहारात आपण बघतो की अनेक गोष्टी त्यांनी आपसूकच स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती अगदीच काही वाईट आहे असंही नाही. त्यामुळे इथं आपण फक्त सांगण्याचं काम करायचं. निर्णय शेवटी त्यांनाच घ्यायचा आहे. धार्मिक बाबींमुळे पुरुषांपेक्षाही स्त्रियांचं जगणं कठीण झाल्यामुळे या गोष्टी सांगाव्या लागत आहेत असं नाही तर पुरुषांनाही त्याचा तितकाच त्रास होत असतो. फक्त तो वेगळ्या प्रकारचा आहे. त्यांची विचार करण्याची क्षमताच ते विसरून गेले आहेत. आपल्याला सोयिस्कर अर्थ काढून आपल्या फायद्यासाठी धर्माचा वापर करणं यातच त्यांना धन्यता वाटत आहे. त्यांनाही या वैचारीक मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याची गरज आहे.

आता कोणाला असं वाटेल की आम्हाला हे सारं करण्याची काय गरज आहे व अधिकार आहे? तर गरज यासाठी आहे की मुसलमान हे आमचे मित्रच आहेत, देशबांधव आहेत. त्यांच्या भल्याचा विचार केला तर त्यात वावगं काय आहे? अधिकाराचं म्हणाल तर मी स्वतःला आधी माणूस समजतो आणि इतरांनाही माणूसच समजतो. नंतर बाकीच्या गोष्टी. त्यामुळे माणूसकीच्या अधिकारातून मी या गोष्टी सांगतोय. त्यावर चर्चा करता येईल पण केवळ मी या धर्माचा नाही म्हणून मी काही बोलायचं नाही ही भूमिका मला मान्य नाही. मी तर सर्वांविषयीच बोलणार आहे त्यामुळे मी पक्षपाती आहे असाही आरोप कोणी करणार नाही अशी अपेक्षा आहे. 

Comments