मनुस्मृति आणि स्त्रीविचार – भाग ६

सदर लेखांत आपण मुलगाच जन्माला येण्याबाबतची आपल्या समाजाची मानसिकता याविषयी बोलणार आहोत. वंशाचा दिवा, घराण्याचा वारस म्हणून मुलगा हवाच ही मानसिकता फार प्राचीन आहे. या मुलाला जन्म देणारी मुलगी मात्र हवीच असं मात्र कोणाला वाटत नाही. मला इथं शेखचिल्लीची आठवण येतेय. तो एकदा लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला. तिथं एका झाडावर चढून तो फांदी तोडू लागला. पण तोही त्याच्या फांदीवर बसला होता हे मात्र तो विसरला. त्यामुळे पुढे काय झालं ते सांगायला नकोच. आपला समाज शेखचिल्ली सारखा आहे. ज्या मुलीमुळे वंशाचा विस्तार होण्यात समान भागिदारी आहे तिलाच तो सातत्यानं नाकारत आलाय. हा मूर्खपणा इतका प्रखर आहे की त्यावर हसताही येत नाही. तरीही हजारो वर्षांपासून तो अव्याहतपणे सुरू आहे. मनुच्या काळातही हा मूर्खपणा सुरूच होता. त्यानं म्हटलंय की,
मुलगा झाला म्हणजे बाप स्वर्ग वगैरे परलोकावर ताबा मिळवतो, नातू झाला म्हणजे त्या परलोकात तो चिरकाल टिकून राहतो, आणि मुलाला नातू झाला म्हणजे हा पणजोबा आदित्यलोकाला जातो.
एकदा नाही, दोनदा नाही तर तीनदा एकच गोष्ट इथं सांगितली आहे की मुलगा झाला तरच पितरांना स्वर्गात जागा मिळते, ती टिकून राहते. मुलगी झाली तर काय यावर मात्र काही भाष्य नाही. मुलीला आपल्या समाजात काय स्थान होतं त्यावर या वचनातून प्रकाश पडतो.
आता आपल्या समाजानं यातनं जो धडा घेतला त्यानुसार मुलीला नाकारण्याचं काम आपल्या समाजानं चोख केलं आहे. त्यांतून मुलाचे जे लाडकोड झालेत त्याविषयी काही बोलायला नको. माणसं इतक्या मुर्खाप्रमाणे का वागतात ते माझ्या समजेपलीकडचं आहे. मुलगा-मुलगी दोन्ही प्रजोत्पादनासाठी आवश्यक असतात. त्यामुळे कोणालाही कमी-जास्त महत्व देणं चूकीचं आहे. निसर्ग समतोल राखण्याचं काम करत असतो. पण त्याचवेळी आपणही त्याला हा समतोल राखण्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. कारण इतरत्र आपण निसर्गावर नियंत्रण मिळवलं असल्यानं पूर्वीसारखे जन्म-मृत्यू दर आता निसर्गाच्या हाती राहिले नाहीत. त्यामुळे आपण मानवी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यात या मुलगाच पाहिजे या हव्यासामुळे अडथळे येत आहेत.
आपण हे थोपवण्यासाठी काय करू शकतो याचा आता विचार करायला हवा.
-    मुलगा मुलगी हे समान असतात.
-    एक किंवा दोन मुलं जी हवी असतील ती निसर्गाच्या इच्छेनं होऊ द्या. तुमची इच्छा तिथं नको. निसर्गाला समतोल कसा राखायचा ते आपल्यापेक्षा चांगलं कळतं.
-    मुलामुळे जसा वंशविस्तार होतो तसाच मुलीमुळेही होतोच.
-    कोणत्याही धार्मिक कामांत मुलांइतकीच मुलगीही महत्त्वाची असते. अन्यथा तो धर्म नसून अधर्म ठरतो.
-    मुलाच्या नादात मुली जन्माला घालणं हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. कारण पुढे आयुष्यभर त्यांना त्याचा मानसिक शारिरीक त्रास भोगावा लागतो.

मनुची मानसिकता नाकारून एका सभ्य सुसंस्कृत समाजासाठी आपल्याला बदलायची गरज आहे आता. मुलावर किंवा मुलीवर मेहेरबानी नाही तर त्यांना त्यांचे नैसर्गिक हक्क तेवढे देऊन आपलं कर्तव्य बजावणं योग्य राहिल.

Comments