आणि
जर त्यांनी तलाकचाच विचार केला असेल तर लक्षांत ठेवा, अल्लाह सर्वकाही ऐकणारा व
जाणणारा आहे.
(म्हणजे
तुम्ही जर अयोग्य गोष्टीसाठी पत्नीला सोडले आहे तर अल्लाहकडून स्वतःला निर्भय समजू
नका. तो तुमच्या अत्याचारापासून गाफील नाही.)
सूरह
अल् ब़करा – आयत २२७
मला
वाटते की तलाकच्या संबंधाने ही आयत अत्यंत महत्त्वाची आहे. यात संबंधीत व्यक्तीने
आपल्या विवेकाशी प्रामाणिक राहून आहे त्या परिस्थितीचा योग्य तो विचार करून पूर्ण
जबाबदारीनं निर्णय घ्यायचा आहे असा अर्थ अंतर्भूत आहे. कारण तलाक ही काही आनंदाची
बाब नाही. ना त्या पतीसाठी ना त्या पत्नीसाठी ना त्या कुटुंबासाठी ना अन्य
कोणासाठीही ज्यांच्याशी ते संबंधीत आहेत. तलाकची जबाबदारी पतीवर जास्त असल्यानं
त्यानं ती लहर म्हणून करायची गोष्ट नाही तर आपल्या या कृत्याचे परिणाम काय घडतील
याचा पूर्ण विचार करून हा निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतरही त्याला चार महिन्यांचा
वेळ दिला गेला आहे. या सर्वांचा अर्थ हाच होतो की मूळातच तलाक ही गोष्ट कुराणात
मान्य नाही. ती कशी लांबवता येईल, टाळता येईल याचाच विचार यात जास्त करून केला
गेलेला दिसतो आहे.
दूर्दैव्यानं ही गोष्ट सारेच विसरलेले दिसतात. हे असं का झालं असावं याचा
विचार करताना या आयतचं महत्त्व किंवा त्याचा खरा अर्थ समजावून देण्यासाठी धार्मिक
पुढारी कमी पडले आहेत हे स्पष्टच आहे. दुसरं कारण म्हणजे सामान्य मुसलमान व्यक्ति
स्वतः कुराणची चिकित्सा करत नाही, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी विचार करत नाही हेही
आहे. कुराणातच अल्लाहनं सांगितलं आहे की प्रत्येकानं आपले डोळे उघडे ठेवून नीट
विचार करून कुराणचा अर्थ ध्यानात घेण्यासाठी व अल्लाहची खरी मर्जी त्याची इच्छा
काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा असं म्हटलेलं आहे. ही बाब विशेषतः
व्यावहारीक गोष्टींसंबंधात लक्षात ठेवण्यासारखी आहे. धार्मिक बाबतीत काही अर्थांचे
मतभेद झाले तर ते चालू शकतं त्यानं फार गंभीर धोके होत नाहीत. पण व्यावहारीक
बाबतीत चूकीचे अर्थ लावले गेले तर मात्र संबंधीत व्यक्तिंना त्याचा कमालीचा त्रास
सोसावा लागतो. तलाकच्या बाबतीत मुस्लिम स्त्रियांना हा त्रास ब-याचदा भोगावा
लागतो. पुरुषांनाही असं वाटतं की अल्लाहने त्यांनाच तलाकचा निर्णय घेण्याची
जबाबदारी सोपवली आहे. ते खरं असलं तरीही त्यात अटी लावलेल्या आहेत याचा त्यांना
विसर पडतो व केवळ स्वतःच्या लहरीखातर कधीही कुठेही तलाक घेण्याचा जो सपाटा लावला
त्यामुळे त्यांच्या स्त्रियांवर अन्याय तर होतोच पण त्यांच्यावर आणि मुलांवरही
होतोच हे त्यांनी विसरायला नको. हे सारं बदलावं. मुसलमान लोक या आयतचा विचार करून
यापुढे आपल्या निर्णयाचा सखोल विचार करतील ही अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment