आपल्या
समाजात विवाहितेला जो मान मिळतो तो विधवेला कधीच मिळत नाही. तिचं वय जितकं कमी
तितक्या तिच्या यातना जास्त. यात सामाजिक व कौटुंबिक हेटाळणी, तुच्छतेची वागणूक,
दोषारोप हे कायमचे असतात. बायकोनं नवरा खाल्ला व ती पांढ-या पायाची आहे हे तर
सर्रास बोललं जातं. आता मनुच्या काळात हे सारं होतं का? तर अर्थातच होता. मनू म्हणतो की,
“विधवा स्त्रीने पुण्यकारक फुले,
मुळे, फळे खाऊन जरूर आपला देह झिजवावा, पण परपुरुषाचे नावसुध्दा घेऊ नये. विधवेने
मरेपर्यंत सहनशील, नियमबध्द राहून ब्रह्मचर्य पाळावे. पतिव्रतांचा जो श्रेष्ठ धर्म
आहे, त्याचीच आराधना करावी.”
वरील
वचनावरून दोन गोष्टी लक्षात येतात. पहिली म्हणजे विधवा स्त्रीचं जीवन पूर्वीपासूनच
हलाखिचं होतं. त्याचा दुसरा अर्थ हा होतो की स्त्रीच्या जीवनाला जो काही मानसन्मान
आहे अर्थ आहे तो फक्त तिच्या नव-यामुळेच असतो. तिच्या स्वकर्तृत्त्वाचा काही उपयोग
होत नाही. दुसरं म्हणजे पतीव्रतेचा धर्म म्हणून म्हणून बायकांची गुलामगिरी
कायमस्वरुपी करण्याचा प्रयत्न. आपल्या समाजात पतीव्रता धर्म आहे पण पत्नीव्रत धर्म
काही निर्माण झाला नाही. पती म्हणजेच पुरुष हा सर्वगुणसंपन्नच असतो असं गृहीतच
धरलेलं असतं. पत्नी म्हणजेच स्त्री ही नीच, हलक्या वृत्तीची असते हेही गृहीतच
धरलेलं आहे.
आजच्या
काळात तरी हे बदललेलं आहे का असा विचार केला तर लक्षात येतं की हे सारं बदललेलं
नाही. विधवेबाबत अजूनही समाजात त्याच पूर्वापार धारणा आहेत. विधवेला कोणत्याही
मंगलकार्यात सहभागी होता येत नाही. सहभागी होऊ देण्याचा उदारपणा दाखवण्यात आला तरी
ती सर्वांच्या मागे राहिल याची काळजी घेण्यात येत होते. विधवा स्त्री तरुण असेल,
तिला मुलं असतील नसतील तर तिच्या अब्रूचे धिंडवडे निघालेच म्हणून समजा.
तिच्याबाबतीत पुरुषांना अचानक जास्त काळजी वाटू लागते तर स्त्रिया तिच्यापासून
आपल्या पुरुषांना जपण्याचा प्रयत्न करतात. यात पुन्हा काही झालं तरी दोष स्त्रीवरच
जातो त्या पुरुषावर जात नाही. विधवा बाईला सासर तुटतं आणि तिला माहेरी परत जावं
लागतं हे तर अजूनही घडतं. म्हणजे तिला फक्त तिच्या पतीमुळेच मान असतो हे खरंच. पण
ती जर कमावती असेल तर मात्र सासरचे माहेरचे दोन्ही तिच्यावर ज्यादा अधिकार गाजवू
लागतात आणि ती आपल्याकडेच यावी यासाठी प्रयत्न करतात. त्याचं कारण आर्थिक असतं हे
उघडच आहे. विधवा स्त्रीला मुलं असली आणि ती जर कमावती नसली तर तिची आणि तिच्या
मुलांची मात्र भयंकर परवड होते. तिला सारा मान गुंडाळून इतरांच्या मर्जीनुसार, मुलांसाठी
जगावं लागतं. विधवेचा पुनर्विवाह होण्यात आजही अडचणी येतात. तो झालाच तर तिच्या
मागील विवाहाशी, नव-याशी तिची वारंवार तुलना होते. तिचं जगणं फारसं सुखाचं होत
नाही. तिची शारिरीक मानसिक स्थिती समजून तिच्याशी कोणी वागत नाही ज्यामुळे
पती-पत्नी दोघांनाही त्रासच होतो. विधवेला तिच्या इच्छेनुसार, योग्यतेनुसार नवरा
मिळेल याची कोणतीही खात्री नसते. बिजवर, वयस्कर, विधूर लोकांशीची तिचा विवाह होतो.
आणि.. असो. तिच्या अडचणी संपत नाही हे सांगितलं तरी पुरेसं आहे. यात अपवाद असतीलच
पण ते फार कमी आहेत हेही खरंच.
या
सर्व गोष्टी आजही सगळीकडेच घडतात. यात सुधारणा व्हायची असेल तर आपली मानसिकता आधी
बदलावी लागेल. विधवा होणं म्हणजे वाईट गोष्ट असेल पण तो काही अपशकुन नसतो. यात
त्या स्त्रीचा दोष नसतो. चांगली वागणूक आणि सौभाग्याचा संबंध नसतो. आपण या गोष्टी
ध्यानात ठेवून समंजसपणानं वागण्यातच खरा आधुनिकपणा असतो.
Comments
Post a Comment