मनुस्मृति आणि स्त्रीविचार – भाग ३

मनुने स्त्री ही फक्त पुरुषांच्या सेवेसाठी आणि त्याच्या उपभोगासाठी जन्माला आली असते हे निरनिराळ्या प्रकारे सांगितले आहे. त्याच्या या वचनांचा आपल्या समाजावर प्रचंड प्रभाव पडलाय. इतका की तो आजही मिटलेला नाही. आजही तो नवीन नवीन पध्दतींनी सामोरा येत असतो. त्यात हेच सांगण्यात येतं की स्त्री ही फक्त पुरुषाची दासीच आहे. त्याच्यासाठीच तिनं आपलं आयुष्य खर्च करायचं. त्याच्याविरोधात बोलायचं नाही. त्याच्यापुढे आपली कर्तबगारी सिध्द करायची नाही. केली तरी ते सांगायचं नाही.
स्त्रीची ही गुलामगिरी तिच्या लग्नापासून सुरू होते. लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये खरं तर समान मैत्रिचं नातं असायला हवं पण त्याऐवजी पती मालक आणि पत्नी दासी असं नातं तयार होतं. याविषयी मनू काय म्हणतो ते आधी बघूयात.
मनू सांगतो की,
१-       नवरा जरी दुराचारी असला, स्वैराचारी असला, त्याच्यात गुणांचा जरी लवलेश नसला तरी सज्जन स्त्रीने नव-याची अगदी देवासारखी आराधना करावी.
२-       (स्वर्ग मिळवण्यासाठी) स्त्रियांनी वेगळा यज्ञयाग, व्रत, वेगळा उपवास करण्याची जरूरी नाही. तिने पतीचा सेवा केली की पुरे. तेवढ्याने तिला स्वर्गात मान मिळतो.
३-       पत्नीने मेल्यावरही पतीच्याच लोकाला जाण्याची इच्छा करावी, व त्यासाठी नवरा जीवंत असताना किंवा मेल्यावरही चांगल्या स्त्रीने त्याच्या आवडीच्या विरूध्द वागू नये.
आता या वरील तिन्ही गोष्टी वाचून झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की मनूने स्त्रियांकडून कोणत्या अपेक्षा केल्या आहेत. त्याचा समाजावर काय परिणाम झाला त्याची काही उदाहरणं आता खाली देतोय.
अ-      लग्न होताच पत्नी नेहमी पतीचा उखाणा घेते. पती कधी घेत नाही. आता त्यात काही अपवाद होताहेत. पण फक्त अपवादच. उखाणा घेण्यामागचं कारण असं आहे की पती हा परमेश्वर असतो. आणि परमेश्वराचं नाव असं उघडपणे घ्यायचं नसतं. आता इथं पत्नीचा काय दर्जा आहे ते लक्षात येईलच.
आ-    लग्नानंतर पत्नी पतीला अहोजाहो करते. तिनं तसं केलं नाही तर तिला लगेच टोमणे बसतात. पती कधी आपल्या पत्नीला आदरानं अहोजाहो करत नाही.
इ-       पत्नीला सौभाग्याची सारी चिन्हं घालावी लागतात. पतीला मात्र ती घालावी लागत नाहीत. विवाहबाह्य संबंधांसाठी मग तो मोकळा. कारण तो जोवर स्वतःहून लग्न झाल्याचं सांगत नाही तोवर समोरच्या स्त्रीला त्याचा अंदाज येत नाही.
ई-       पत्नी आपल्या पतीची सेवा करते. त्याच्या वस्तू आणून देणं, त्याला घरात कोणतंही काम करू न देणं.
उ-       पती कितीही नालायक असला तरी पत्नीला त्याची पत सांभाळावी लागते. बाहेरच्यांसमोर त्याचा मान राखावाच लागतो.
ऊ-      पती कितीही नालायक असली तरी पत्नीला त्याला सोडता येत नाही. सोडलं तर दोष तिच्यावर येतो. तिनं आपल्या पतीशी जुळवून घेतलं नाही, तिच्यातच उणीवा आहेत, तिचं दुसरीकडे लफडं आहे असं अनेक आरोप सहज केले जातात. म्हणजे तो कितीही हरामखोरपणा करो पत्नीनं त्याला कायम सांभाळून घ्यावं अशी घरच्यांची समाजाची अपेक्षा असते. त्याच्या दबावाखाली येऊन कधी घरासाठी, कधी मुलांसाठी पत्नी आपल्या पतीचे सारे अत्याचार सोसत राहते.
ही फक्त काही थोडी उदाहरणं आहेत. अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यावरून पती-पत्नीमधलं असमान नातं सिध्द होतं. आता काही प्रमाणात ही परिस्थिती बदलत आहे पण ती पूर्णपणे बदललेली नाही. सध्या आपल्या वाहिन्यांवर अत्यंत थुकरट मालिका सुरू आहेत. ज्यात पुन्हा एकदा या असल्या वृत्तींचं समर्थन केलं जातंय. यात पुरुष नालायक असले तरीही बायका त्यांना सांभाळून घेताहेत आणि दोष बायकांवरच टाकताहेत. झी मराठीवरची – माझ्या नव-याची बायको – ही मालिका याचं अत्यंत भिकारडं उदाहरण आहे. नव-याचं लफडं सुरू आहे, तो बायकोला हरप्रकारे त्रास देतोय तरीही बायको त्याला काही करत नाही तर त्याचं जिच्यासोबत लफडं सुरू आहे त्या बाईला दोष देत आहे. तिचे सासूसासरेही तेच करताहेत. इतकी निर्बुध्द मालिका ज्या समाजात आज सुरू आहे आणि त्याविरोधात कोणाला आक्षेप घ्यावासा वाटत नाही तो समाज अजूनही मनुच्या मानसिकतेने पछाडलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. तेव्हा निर्णय हा तुम्हाला घ्यायचा आहे. पती-पत्नी एकमेकांचे मित्र असतात, स्नेही असतात. या विश्वासानं जर हे नातं चालवलं तरच संसार सुखाचा ठरेल. अन्यथा ती फक्त एक तडजोड राहील.


Comments