“तुम्हांपैकी जे लोक मरण
पावतील आणि पाठीमागे पत्नीं सोडतील त्यांना हे आवश्यक आहे की त्यांनी आपल्या
पत्नींसाठी असे मृत्युपत्र करून जावे की एक वर्षापर्यंत त्यांना उदरनिर्वाहाची
सामुग्री देण्यात यावी व त्यांना घराबाहेर काढले जाऊ नये. नंतर जर त्या स्वतः
निघून गेल्या तर स्वतःसंबंधी प्रचलित पध्दतीनुसार त्या जे काही करतील त्याची
कोणतीही जबाबदारी तुमच्यावर नाही, अल्लाह प्रभुत्वसंपन्न आणि बुध्दिमान व विवेकशील
आहे.”
“अशाच तर्हेने ज्या
स्त्रियांना घटस्फोट देण्यात आला असेल त्यांना देखील योग्य प्रकारे काहीना काही
देऊन निरोप देण्यात यावा. हा हक्क आहे अल्लाहचे भय बाळगणा-या लोकांवर.”
सूरह
अल् ब़करा – आयत २४० व २४१
विधवा
व घटस्फोटीत स्त्रियांसंबंधीत या दोन महत्त्वाच्या आयती आहेत. पहिली आहे ती विधवा
महिलेची काळजी घेण्यासंबंधी. त्यात आपल्या मृत्युनंतर आपल्या पत्नीची काळजी
घेण्याची सोय महत्त्वाची आहे. पतीच्या मृत्युनंतर किमान एक वर्ष तरी तिच्या
उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च पतीने तिच्या नावें करणे इथं अपेक्षित आहे. दुसरा
मुद्दा आहे तिला घराबाहेर काढले न जाऊ देण्यासंबंधी.
मी
वारंवार सांगतोय की कोणत्याही गोष्टीची कालसुसंगत चर्चा होणे महत्त्वाचे असते.
त्या गोष्टीचा मूळ अर्थ काय आहे यापेक्षा सध्याच्या परिस्थितीत त्याचा काय अर्थ
लावायचा याकडे लक्ष देणं महत्त्वाचे असते. कुराणातही वारंवार हेच सांगण्यात आलं
आहे. वरील आयत ज्या काळातली आहे त्या काळात पतीच्या मृत्युनंतर विधवेचा सांभाळ कसा
करायचा यावरून भांडणं होत असतील, संपत्तीत हिस्सेदारी नको म्हणून त्यांना घरातून
बाहेर काढलं जात असेल त्यामुळे ही आयत आली असेल. नंतर परिस्थिती बदलली आहे. पती
मेला तरी मुलं असतात आणि ते काही आपल्या आयांना घराबाहेर काढत नाहीत. आयांचाही
दबदबा असतो कारण पतीमाघारी आपल्या मुलांना त्यांनी कष्टानं सांभाळलेलं असतं. या
गोष्टींचाही इथं विचार अपेक्षित आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ज्या स्त्रिया
आर्थिकदृष्ट्या दूर्बळ आहेत त्यांना काहीतरी आधार मिळावा आणि त्यांना लगेच
घराबाहेर काढण्यात येऊ नये हा मानवतावादी विचार यामागे आहे. घटस्फोटाच्या बाबतीतही
कुराण स्त्रियांची काळजी घेण्यासंबंधी सांगतो आणि त्यांना योग्य तो मोबदला
देण्याविषयी सांगतो त्यासाठी अल्लाहचं भय दाखवतो.
पण
हा झाला कुराणचा भाग. कुराणाव्यतिरीक्त आपल्या इथं घटनात्मक कायदाही आहे त्यानुसार
तर स्त्रियांना अनेक अधिकार दिले गेले आहेत. त्यांचा इथं वापर व्हायला हवा.
शरीअतचा जर मुसलमान आदर करत असतील तर देशाच्या कायद्याचाही आदर त्यांनी करायलाच
हवा. पण केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, आपला पैसा खर्च होऊ नये म्हणून, संपत्तीत
हिस्सेदारी नको म्हणून, मुसलमान पुरुषांनी या शरीअतचा वापर करून स्वतःचा स्वार्थ
तेवढा साधला. एरव्ही शरीअतचे सारेच कायदे मुसलमान पाळत नाहीत हे त्यांना आणि
सर्वांनाच माहित आहे. पण धार्मिक मुसलमान पुढारी इस्लाम खतरे में है च्या आरोळ्या
ठोकत आपल्या बुरसटलेल्या विचारांना धरून ठेवतात. त्यासाठी कुराणाचाच आधार घेतात
ज्यामुळे कुराण गैरमुसलमानांमध्ये बदनाम होतं आहे. सामान्य मुसलमानही स्वतःच्या
स्वार्थासाठी याला पाठींबा देतो आणि आधुनिक भूमिका घेण्यापासून लांब राहतो. हे
त्याच्या भल्याचं नाही. त्यालाही आया-मुली-बहिणी असतातच. त्यांचे जे हाल होतात
त्याकडे तो डोळे बंद करून पाठ सारून कसा राहू शकतो?
त्याला आज ना उद्या या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. पण आपला
नाकर्तेपणा, आपली स्वार्थी वृत्ती साधण्यासाठी कुराणचा आधार त्यानं घेऊ नये. आपल्या
चूकीच्या वागण्यामुळे त्यानं कुराण बदनाम करू नये ही अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment