आणि
जर तुम्हाला भय असेल की तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही तर ज्या स्त्रिया
तुम्हाला पसंत पडतील त्यांच्यापैकी दोन-दोन, तीन-तीन, चार-चारशी विवाह करा. परंतु
जर तुम्हाला भय असेल की तुम्ही त्यांच्याशी न्याय करू शकणार नाही तर मग एकच पत्नी
करा. किंवा त्या स्त्रियांना आपल्या दांपत्य जीवनात आणा ज्या तुमच्या ताब्यात
आल्या आहेत, अन्यायापासून वाचण्यासाठी हे औचित्याच्या अधिक निकटचे आहे.
सूरह
अल् निसा – आयत ३
मुसलमानांमध्ये
आणि गैरमुसलमानांमध्ये ज्या एका गोष्टीवरून प्रचंड गैरसमज आहे ती गोष्ट म्हणजे
बहुपत्नीत्वाची पध्दत. किंवा आणखी स्पष्ट सांगायचं म्हणजे चार विवाह करण्याची
परवानगी. एखाद्या गोष्टीचा आपल्या स्वार्थासाठी पुरुषांनी कसा लाभ करून घेतला
त्याचं हे उत्तम उदाहरण आहे.
मुसलमान
असं समजतात की कुराण त्यांना चार विवाह करण्याची परवानगी देतो. काही लोक तर
याहीपुढे जातात आणि असं समजतात की चार विवाह करणं ही सच्चा मुसलमान असण्याची
आवश्यक बाब आहे. त्यामुळे परवडत नसूनही ते चार विवाह करतात. या चार विवाहाच्या
मुद्द्यावरून बरेच वादंग निर्माण होत असतात.
वरील
आयत काय सांगते त्याचा अर्थ कळण्यासाठी ती कोणत्या काळात सांगितली गेली आहे व का
सांगितली गेली आहे ते बघायला हवं. मी ही गोष्ट वारंवार सांगत असतो की कोणतीही
परंपरा ही काळाच्या कसोटीवर पारखून घ्यायला हवी. काळाची कसोटी लावली तर असं दिसतं
की पैगंबरांच्या काळात मोठ्या प्रमाणात युध्दे लढली जात होती. त्यात पुरुष मोठ्या
प्रमाणावर मारले जात व त्यामुळे त्यांच्या बायका विधवा व्हायच्या आणि मुले अनाथ
व्हायच्या. शिवाय ज्यांच्याविरोधात या लढाया लढल्या जायच्या त्यांच्याही विधवा आणि
अनाश मुलं असायचीच ज्यांची लूट म्हणून गणणा व्हायची व त्यांचं काय करायचं हा
प्रश्न होताच. विशेषतः त्यात तरुण सुंदर मुली स्त्रिया असतील तर विचारायलाच नको. पैगंबरांनी
यावर हा निर्णय दिला आहे की जर या अनाथ मुलांची जर योग्य काळजी घेता येत नसेल तर
सरळ त्यांच्या आयांशी लग्न करा आणि त्यांच्या मुलांना स्वतःची मुलं समजून त्यांचा
सांभाळ करा. पराभूत बायका ज्या दासी म्हणून आल्या असतील त्यांच्याबाबतीतही हाच
न्याय लागू केला आहे. इथं उदाहरण म्हणून एक-दोन-तीन-चार विवाह करा असं म्हटलं आहे.
इतकेच विवाह करा असं नाही. पण पोथीबध्द लोकांनी चार हीच विवाहाची मर्यादा स्वतःवर
घालून घेतली. तेही नशिबच म्हणायला हवं. पण ही परिस्थिती युध्दकाळासाठी होती.
मानवतेच्या दृष्टीकोनातून ही बाब योग्यही होती. पण शांततेच्या काळात याची गरज
नसतानाही मुसलमानांनी याचा त्याग केला नाही उलट तलाकच्या अधिकाराचा गैरवापर करून
अनेकांशी विवाह करण्याचा सपाटा लावला. हे विवाह कधी एकाचवेळी किंवा कधी एकामागोमाग
एक होत गेले. एकावेळेस चारची मर्यादा ओलांडायची नाही एवढं फक्त पाहिलं. पण या
दरम्यान किती स्त्रियांशी विवाह झाले असतील त्याची कल्पना करता येत नाही. ही
निश्चितच चूकीची गोष्ट होती. याच आयतीत हे स्पष्टपणे म्हटलं आहे की तुमची ऐपत असेल
तरच हे विवाह करा. त्याकडे मात्र मुसलमान पुरुषांनी दूर्लक्ष केलं.
आता
बहुपत्नीत्न ही प्रथा चूकीची आहे आणि तिला कुराण मर्यादित करतं असा अर्थ
गैरमुसलमान काढतात पण तो आम्हाला मान्य नाही असं मुस्लिम धार्मिक पुढारी सांगतात.
ते असंही म्हणतात की पैंगंबरांच्या पूर्वीही ही प्रथा अस्तित्वात होती. हा मुद्दा
मान्यच आहे. इतकंच काय तर अन्य सर्व धर्माचे लोकही बहुपत्नीत्व पाळतच होते. पण ‘पाळत होते’ हे लक्षात घ्यायला
हवं. त्यांनी ही प्रथा कधीच टाकून दिली आहे. पण मुसलमान मात्र ही प्रथा सोडायला
तयार नाही. आधुनिक सुशिक्षित मुसलमान याच्या विरोधात आहे पण तो या प्रथेला उघडपणे
विरोध मात्र करत नाही. तो स्वतः एका वेळी एकच विवाह करतो. ही प्रथा आज बहुसंख्येने
आहे असंही नाही. व्यवहारात ते शक्यही नसतं. पण ज्या काही थोड्या प्रमाणात आहे तिथं
कुराणचा आधार घेऊन तिचं समर्थन केलं जातं. मुख्य म्हणजे काळाच्या ओघात ही प्रथा
चूकीची आहे, तिची गरज नाही त्यामुळे त्याबरोबर वागण्याची आवश्यकता नाही हे
सांगण्याची हिम्मत मुस्लिम धार्मिक पुढारी करत नाही. ते उलट त्याच शब्दांना धरून
बसतात ज्यांना सध्याच्या काळात काहीही महत्त्व नाही. हा हटवादीपणाच त्यांच्याबाबत,
कुराणबाबत, पैगंबरांबाबत, इस्लामबाबत गैरसमज पसरवतो. ही गोष्ट त्यांच्या लक्षात
येत नाही की आली तरी आपलं पुढारीपण धोक्यात येईल म्हणून ते त्याचा स्वीकार करायला
तयार नाहीत. याच गोष्टीमुळे मुसलमान आधुनिक प्रवाहात येऊ शकत नाही व अन्य
धर्मियांमध्ये त्यांच्याबाबतीत गैरसमज वाढत जातात.
बहुपत्नीत्व
वैध असो की अवैध असो सध्या ते व्यवहारतः शक्य नाही आणि कायद्यानंही त्याला मान्यता
नाही. या देशात भारताचा कायदा चालतो, शरीअतचा नाही. त्यामुळे या प्रथेला
व्यावहारीक, धार्मिक, कायदेशीर आधार नाही. ती मानवतेच्या विरोधातही जाते सबब तिचं
समर्थन कोणत्याही आधारे होऊ शकत नाही. हा केवळ मुस्लिम पुरुषांचा अनुदारपणा आहे व
धर्माच्या आड लपून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा निर्लज्ज् प्रकार आहे ज्याला विरोध
व्हायलाच हवा.
Comments
Post a Comment