हा
मनुस्मृति आणि स्त्रीविचार यांच्यातील शेवटचा लेख आहे. आजचा विषय धर्माशी जातीशी
संबंधीत आहे. विवाहाशी संबंधीत आहे. आपल्याकडे आंतरजातीय विवाह आणि आंतरधर्मिय
विवाह होण्याचं प्रमाण कमी असलं तरीही ते आहे. त्यांतून उद्भवणा-या अनेक अडचणी
असतात. त्यांतली एक अडचण म्हणजे लग्नानंतर पत्नीचा धर्म काय असेल आणि मुलांचा धर्म
काय राहिलं.
काही ठिकाणी लग्नानंतर पत्नीचा धर्म बदलण्यात
येतो. हिंदू मुसलमान विवाहात हे ब-याचदा घडतं. अलीकडे तसं फारसं घडत नाही. धर्म
बदलण्यासाठी कोणावर दबाव आणला जात नाही. पण हे समजंस घरांमध्ये घडतं. एरव्ही नाही.
लग्नानंतर मुलांचा धर्म आणि जात ही पतीच्या जातीधर्मानुसार ठरत असते. यात अपवाद
असतीलही पण त्यानं नियमाला बाध येत नाही त्यामुळे आपण नक्कीच असं म्हणू शकतो की
लग्नानंतर पतीचा जो धर्म असेल तोच पत्नीचा असतो आणि मुलांचाही तोच असतो. आता यात
मनू कुठं येतो तर त्यानं हे आधीच सांगून ठेवलं आहे. तो म्हणतो,
“आर्य पुरुषापासून अनार्य स्त्रीला
झालेला मुलगा गुणवत्तेनं आर्य ठरेल, तर अनार्य पुरुषापासून आर्य स्त्रीला झालेला
मुलगा गुणवत्तेनं अनार्य ठरेल हे अगदी पक्के आहे.”
वरील
वचनांत अनेक बाबी आहेत.
१-
स्त्री आर्य असो की अनार्य असो तिला काहीच महत्त्व नाही. सारं
महत्त्व हे पुरुषाला आहे. पती उच्चवर्णीय असेल तर पत्नी कोणतीही असो तिही
उच्चवर्णीय ठरते. पण पती उच्चवर्णीय नसेल तर स्त्रीलाही सन्मान मिळत नाही.
स्त्रीचं महत्त्व हे पुन्हा पुरुष सापेक्षच असतं.
२-
मुलांची गुणवत्ता ही त्यांच्या जन्मावरून ठरली जाते. त्यात पुन्हा
पुरुषच प्रमुख असतो. त्याची जात जशी असेल त्याप्रमाणे मुलांचीही जात ठरते.
३-
धर्माच्या बाबतीतही हेच घडतं. पतीचा धर्म तोच मुलांचा धर्म ठरतो.
पत्नीचा धर्म गौण ठरतो.
व्यवहारात
हे सगळीकडे दिसून येतं. मणी रत्नम यांचा बॉम्बे चित्रपट ज्यांनी पाहिला असेल
त्यांना वरील गोष्टींचा अर्थ लवकर कळेल. ज्यांनी तो पाहिला नसेल त्यांनी तो नक्की
पहा. यात हिंदू मुलगा आणि मुसलमान मुलगी यांचा विवाह होतो. हे जरा सेफ उदाहरण आहे.
याच्या उलट दाखवलं तर तो लव्ह जिहादचा प्रकार ठरतो असं हिंदू कट्टरवाद्यांना
वाटतं. मुस्लीम कट्टरवाद्यांना दोन्ही प्रकार आवडत नाहीत. पण त्यात पुन्हा मुलगी
हिंदू असली तर ते खपवून घेतात. तिचा धर्म बदलतात. मुस्लिम मुलगी असेल तर तिचा धर्म
सहसा बदलत नाही. पूर्वी ते व्हायचं आता असं सहसा घडत नाही. पण मुलांचा धर्म मात्र
पतीच्याच धर्मावरून ठरतो. आता काही ठिकाणी दोन्ही धर्मांची शिकवण मुलांना दिली
जाते हेही खरंय पण त्याचं प्रमाण कमीच आहे. म्हणजे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करून
या जातीधर्माच्या चौकटी तोडायच्या तर त्या पुन्हा आणखी घट्ट बसल्या जातात. एकाऐवजी
दोन चौकटीत मुले वाढतात. असो.
जातीचा
मुद्दा आणखी थोडा लवचीक आहे. आरक्षण आल्यापासून आंतरजातीय विवाहात जर पत्नी मागास
जातीतली असली आणि पती मागासवर्गीय नसला तर मुलांना आरक्षणाचे फायदे देण्यासाठी
आईचा जाती दाखला पुढे केला जातो. प्रत्यक्षात हे कितपत घडतं माहित नाही पण ते घडत
असावं. घडत नसेल तर येत्या काळात त्यावरून वाद होऊ शकतो. कारण आईचं नाव आता
दाखल्यावर आलं आहे तर तिची जात का येऊ नये असा समान पुरोगामी विचार काही लोक
नक्कीच करतील. जातीचं मूळ हे असं घट्ट होत राहतं. पुन्हा असो.
मनुस्मृतिच्या
निमित्तानं तेव्हाच्या आणि आजच्या काळाचा थोडा विचार आपण केलाय. यापुढच्या
लेखांमध्ये आपण कुराण आणि स्त्रीपुरुष विचार यांविषयी बोलणार आहोत.
Comments
Post a Comment