“तलाक फक्त दोन वेळा आहे
नंतर त्यांना एकतर सर्वसंमत पध्दतीने आपल्याजवळ ठेवून घ्या किंवा सन्मानपूर्वक
त्यांना निरोप द्या.
आणि
तुमच्यासाठी हे वैध नाही की जे काही तुम्ही त्यांना दिले आहे त्यातून काहीही परत
घ्यावे. अपवाद फक्त जर त्या दोघांना भय वाटत असेल की अल्लाहने घालून दिलेल्या
मर्यादांचे ते पालन करू शकत नाहीत.
नंतर
जर तुम्हाला भय वाटत असेल की ते दोघे अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांवर कायम
राहू शकत नसतील तर त्यांच्यामध्ये असा समेट घडविण्यामध्ये कोणताही अपराध नाही की
पत्नीने आपल्या पतीला प्रतिदान देऊन स्वतःला मुक्त करून घ्यावे.* ह्या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत त्याचे
उल्लंघन करू नका आणि जे ह्या मर्यादांचे उल्लंघन करतील ते निःसंशय अत्याचारी आहेत.”
सूरह
अल् बकरा – आयत २२९
(* इस्लामी कायदे शास्त्राच्या (शरीअत) परिभाषेत याला ‘खुला’ म्हणतात. म्हणजे एका
स्त्रीने आपल्या पतीला काही मोबदला देऊन त्याच्याकडून तलाक मिळवणे. अशा स्थितीत
पुरुषाने, दिलेली संपत्ती किंवा तिचा काही भाग, ज्यावर परस्परांत सहमत झाले असेल,
स्त्रीकडून परत घ्यावे हे त्यांच्यासाठी वैध ठरते. परंतु पुरुषाने जर स्वतःच
स्त्रीला तलाक दिली असेल तर तो तिच्याकडून आपण दिलेली संपत्ती परत घेऊ शकत नाही.)
वरील
वचनातून जे मुद्दे निघतात ते असे आहेत,
१-
दोनदा तलाकची मागणी केल्यानंतर एकतर पतीनं आपल्या
पत्नीला सन्मानपूर्वक वागवावं किंवा जर त्यानं तिस-यांदा तलाकची मागणी केली तर
आपल्या पत्नीला सन्मानपूर्वक निरोप द्यावा. तिस-या तलाकनंतर मात्र पतीला पुन्हा
आपल्या पत्नीला स्वीकारता येणार जी सोय पहिल्या दोन वेळेस होती. याचा दुसरा अर्थ
हा की लग्न म्हणजे काही खेळ नाही आणि त्याचं गांभीर्य त्यांना समजायला हवं म्हणून
ही मर्यादा घालून देण्यात आली आहे.
२-
दुसरा मुद्दा असा आहे की एकदा पतीच्या बाजूनं तलाक पक्का
झाल्यानंतर त्यानं आपल्या पत्नीला दिलेली कोणतीही संपत्ती परत मागू नये.
तिच्याकडून काही त्याला मिळाले असल्यास तेही त्यानं तिला परत करावे. इथं अपवादाचं
उदाहरण दिलेलं आहे. त्याचा अर्थ हा की काही कारणांनी पती जर हे करण्यास असमर्थ
असला (जर तो गरीब असेल वगैरे) तर त्याला असं करण्यातून सवलत मिळू शकते. पण या
गोष्टीचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो हे इथं ध्यानात ठेवायला हवं.
३-
तिसरा मुद्दा स्त्रियांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.
आपण पाहिलं आहे की कुराणातले आदेश पतीला उद्देशून आहेत. पण इथं मात्र पत्नीलाही एक
संधी देण्यात आली आहे. ती जर विवाहात सुखी नसेल आणि पतीची इच्छा असली तरीही तिची
मात्र हा संबंध ठेवण्याची इच्छा नसेल तर तिला या संबंधातून मुक्तता मिळू शकते
ज्याला खुला पध्दत म्हणतात. यात पत्नीला आपल्या पतीकडून मिळालेली संपत्ती परत
करावी लागते. शिवाय त्याला आणखी काही संपत्ती यासाठी हवी असल्यास तो ती मागू शकतो.
म्हणजे इथं दोघांपैकी एकाला जर लग्न टिकवून ठेवण्यात स्वारस्य नसेल तर तो काही
अटींवर दुस-याला तलाकची सहमती देऊ शकतो.
हिंदू
धर्माशी तुलना करताना कुराणमध्ये विवाहाच्या बाबतीत पत्नी-पती यांना जे अधिकार
आहेत व मोकळेपणा आहे तो हिंदू धर्मानं स्त्रियांना दिलेला आढळत नाही.
मनुस्मृतिमध्ये मनूनं तर स्त्रियांना पक्कं गुलाम करून टाकलेलं दिसतं ज्याविषयी
आपण आधीच्या लेखांत चर्चा केलेली आहे. कुराणात त्यामानानं बरीच आधुनिक व समान
वागणूक स्त्री-पुरुषांना दिलेली आहे. आता प्रश्न हा आहे की जर ते तसं आहे तर
व्यवहारात त्याचं प्रतिबिंब का दिसत नाही हा. हाच प्रश्न आपण हिदूं धर्माच्या
बाबतीतही विचारू शकतो. आजची हिंदू स्त्री ही काही गुलाम नाही. ती स्वतंत्र आहे.
तिच्यापाठीमागे हिंदू पुरुषही उभे असतात तिला मदत करण्यासाठी. मुसलमान स्त्री
मात्र अजूनही परंपरेची गुलाम आहे व मुसलमान पुरुष तिच्या हक्कांसाठी लढतोय असं
चित्र दिसत नाही. याचं कारण हेच आहे की धार्मिक तरतूदींचा स्वतःच्या स्वार्थासाठी
उपयोग करणे. मुसलमान धार्मिक पुढा-यांनी आपलं स्वतःचं महत्त्वं टिकवून ठेवण्यासाठी
आणि मुसलमान पुरुषांनी स्वतःचं मोठेपण जपण्यासाठी कुराणातील मूळ विचारांचा
विपर्यास करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचं तेवढं काम केलं. आणि आजही कुराणचाच आधार
घेऊन ते आपल्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करत आहेत. तसं करताना आपण कोणत्या काळात
वावरतोय याचाही ते विचार करत नाहीत म्हणूनच हिंदूंच्या तुलनेत ते फार मागासलेले
दिसतात.
कोणत्याही
परंपरेची, धार्मिक विचारांची चिकित्सा ही काळाच्या अनुषंगानेच करायची असते. अन्यथा
त्याचे चुकीचे अर्थ लावले जाऊ शकतात. काही गोष्टी ज्या पूर्वीच्या काळी बरोबर
होत्या त्या आजही तशाच बरोबर असतील असं नसतं. अशी सुधारण करण्यात त्या धर्माचा
अनादर होत नसतो हेही आपण लक्षात घ्यायला हवं. तलाकच्या बाबतीत गैरमुसलमानांमध्ये
जितके गैरसमज नसतील त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गैरसमज मुसलमानांमध्येच आहे हे
खेदानं म्हणावं लागतं. आता तरी ते दूर करण्यासाठी मुसलमान पुढे येतील अशी अपेक्षा
आहे.
Comments
Post a Comment