मनुस्मृति आणि स्त्रीविचार – भाग २

मनुस्मृतित स्त्रियांविषयक कोणती मतं आहेत आणि त्याचा आजच्या समाजजीवनातही समावेश आहे की नाही याचा विचार आपण करत आहोत. मनुने स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य दिलेलं नाही. तो म्हणतो, अनेक जण घरात असताना स्त्रियांनी पैशांचा साठा करू नये. अगदी स्वतःच्या हक्काच्या संपत्तीतूनही पैशांचा साठा तिने आपल्या नव-याच्या आज्ञेशिवाय करू नये.”
आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत आपल्याकडे मोठी विचित्र परिस्थिती सध्या आहे. पूर्वी, स्त्रियांनी काम करू नये, पैसा मिळवू नये ही विचारसरणी मोठ्या प्रमाणात होती. तथाकथित उच्चवर्णियांमध्ये तर तो घराच्या इज्जतीचा वगैरे प्रश्न समजला जायचा. आजही समजला जातो. आमच्या घरातल्या बायका बाहेर कामं करत नाहीत हे मोठ्या अभिमानानं सांगितलं जातं. पण आज काय आणि पूर्वी काय बाया काम करतच नव्हत्या असं नाही. पूर्वीही कामं करायच्या पण त्या तथाकथित खालच्या जातीतल्या बाया होत्या. पोटापाण्यासाठी घर चालवण्यासाठी त्यांना काम करणं ही व्यावहारीक निकड होती. आज ही निकड सर्वांनाच आहे. कारण पैशाचं सोंग आणता येत नाही. असं असलं तरीही लोकांचा ताठा काही जात नाही. दुसरी जी गोष्ट जात नाही ती म्हणजे ज्या स्त्रिया बाहेर काम करतात त्यांना अन्य बायकाच हिनवत असतात की तुमचे नवरे कमावू शकत नाहीत म्हणून तुम्हाला काम करावं लागतं. कमावत्या बाईला योग्य तो सन्मान मिळत नाही. तिच्या कामाची दखल घेतली जात नाही. तिच्या नव-याला तिचं काम मनातून आवडत नाही. त्यात तिला त्याच्यापेक्षा जास्त पगार असेल तर भांडणं सुरूच झाली समजा. आपल्या कष्टाच्या कमाईवर बाईचा अधिकार असत नाही. ही आजच्या काळातली परिस्थिती आहे.
मनुनं काय वेगळं सांगितलंय मग? तोही हेच सांगतो.
-    मनु सांगतो की घरात अनेक जण असताना बाईनं पैशांचा साठा करू नये. याचा अर्थ हा की तिला घरी येणा-या पैशाचा विनियोग कसा करायचा याचं स्वातंत्र्य नाही. घरातला कर्ता पुरुष पैशाचे व्यवहार बघणार.
-    मनु मग सांगतो की बाईनं स्वतःच्या हक्काच्या संपत्तीतूनही पैशांचा साठा करू नये. याचा अर्थ हा की तिनं जरी कमाई केली तरी त्यावर तिचा अधिकार नाही. तो अधिकार तिच्या पतीचा.
वरील दोन्ही गोष्टी आजही आपल्या समाजात दिसतात. विशेषतः अशिक्षित कुटुंबात कमावत्या बाईचा पैसा तिच्या नव-याच्या हातात जातो जो व्यसनाधीन असतो. पण सुशिक्षित कुटुंबातही कमावत्या बाईला आर्थिक स्वातंत्र्य नसतं. तिचा पैसा कसा खर्च करायचा हे स्वातंत्र्य तिला नसतं. अर्थात पती-पत्नीनं आपला पैसा कुटुंबासाठीच खर्च करणं अपेक्षित असलं तरीही पती अशा आर्थिक बाबतीत पत्नीचं मत विचारात घेत नाही हे ब-याचदा दिसून येतं. हे होऊ नये ही अपेक्षा आहे. कमावत्या बाईला तिच्या पैशाचा उपयोग कसा केला जावा यावर बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. तिचं मत याबाबतीत विचारात घ्यायलाच हवं. कोणतीही सुजाण स्त्री घरात आपली कमाई द्यायला विरोध करत नाही. पण तिला याबाबतीत गृहीत धरण्यात येता कामा नये. लग्नात तिच्या माहेरातून तिला मिळालेलं स्त्री-धन हे फक्त तिच्याच नावावर असलं पाहिजे हेही जाता जाता सांगून जातो.

स्त्री ही आर्थिकदृष्ट्या सबळ असायलाच पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. दुसरं म्हणजे परिस्थिती कधी बदलेल ते सांगता येत नाही. लग्न तुटलं तर त्या बाईला जसं सासर तुटतं तसंच माहेरही तुटतं. हा शेवटी व्य़वहार असतो. अशा वेळी बाई जर कमावती असेल तर तिचा त्रास सुसह्य होतो. अन्यथा तिला इतरांच्या दयेवरच जगावं लागतं. त्यामुळे मुलींनी शिकायलाच हवं, काहीतरी व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे आणि नोकरी काम करायलाच पाहिजे. किंवा निदान तशी वेळ आली तर ती करता येईल हा विश्वास येण्याइतपत तिची तयारी असायलाच पाहिजे. तेच तिच्यासाठी चांगलं राहिल. 

Comments