मनुस्मृति आणि स्त्रीविचार – भाग १

मनुस्मृतीतील व्यक्त केलेल्या विषमतेविषयी बरंच काही बोलून झालं आहे. या पुढील काही लेखांत मात्र आपण फक्त मनुच्या स्त्रीविषयक विचारांबाबतच चर्चा करणार आहोत.
१-       स्त्रीने मग ती लहान मुलगी असो, तरुणी असो वा म्हातारी असो – कुठलेही काम – अगदी घरातले काम देखील – स्वतःच्या अधिकारात करू नये.
२-       लहानपणी स्त्रीने वडिलांच्या ताब्यात राहावे, तरुणपणात नव-याच्या ताब्यात राहावे, नवरा मेल्यावर मुलांच्या ताब्यात राहावे. स्त्रीने स्वतःच्या तंत्राने राहू नये.
(विषमतेचा पूरस्कर्ता मनू – डॉ. प्रदीप गोखले)

या दोन्ही श्लोकांचा अर्थ थोडक्यात सांगायचा तर स्त्रीने स्वमर्जीनं कोणतंही काम करू नये आणि स्वतंत्र राहू नये असा आहे. मनुच्या काळातील परिस्थिती वेगळी होती असं म्हणून अनेक लोक मनुचं समर्थन करतात. मला त्याविषयी काही म्हणायचं नाही. पण आजची परिस्थिती वेगळी असूनही या प्रकारेच वागणारे लोक आहेत त्यांचं काय करायचं हा आपला प्रश्न आहे. यासाठी मनुने नेमून दिलेली परंपरा जबाबदार आहे. हजारो वर्षांचा हा संस्कार अजूनही मिटत नाही याबद्दल मी मनूला दोष देणार नाही. हा दोष आपल्या लोकांचा आहे. यांतून त्यांना मोकळं होता येणार नाही.
हे संस्कार इतके गडद आहेत की आजही मुलगा काय करतो, कुठे जातो, याविषयी घरी तितकी चर्चा होत नाही जितकी मुलीविषयी होत असते. ती कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते, यावर हजार प्रश्न घरून विचारले जातात. सातच्या आत घरात ही परिस्थिती अजूनही सगळीकडे सर्रास सुरू आहे. घरीही मुलीनं एखाद्या गोष्टीत स्वतंत्र निर्णय घेण्याला आक्षेप येतात. अंतिम निर्णय हा पुरुषाचा असतो कारण तो कमावता असतो. पण कमावती स्त्री असली तरीही या निर्णयात पुरुषांनाच महत्त्व असतं. ही परिस्थिती काही प्रमाणात बदलली असली तरीही पूर्णपणे बदलली नाही. म्हणूनच हे लिहावं लागतंय.
स्त्री स्वतंत्र नाही हा दुसरा विचार आहे. बाईनं एकटं राहता कामा नये हा संस्कार त्यामागे आहे. त्यामुळेच आपल्या समाजात आजही एकट्या स्त्रीला अतोनात त्रास होतो. बाईच्या जातीला पुरुषाची सोबत हवीच असं बायकांचंच म्हणनं असतं. कशासाठी तर इतर पुरुषांपासून तिचं रक्षण व्हावं म्हणून. एकटी स्त्री एवेलेबल असते असं बहुतेक पुरुषांना वाटतं. एकटी स्त्री आपल्या मुलांना योग्य रीतीनं वाढवू शकत नाही असंही अनेकांना वाटतं. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या आईलाही आपली मुलं वाढवताना समाजाच्या या टीकेला सामोरं जावंच लागतं. हा विचार इतका व्यापक आहे.
हेच म्हणनं पुरुषाच्या बाबतीतही आपण लावू शकतो. पुरुष एकटा राहू शकत नाही किंवा आपल्या मुलांचं पालन करू शकत नाही ही मानसिकताही अशीच आहे. फक्त इथं त्याच्या चारित्र्यावर कधी प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. कारण तो पुरुष असतो म्हणून.
काळाबरोबर आपण बदलायला हवं. त्यामुळे स्त्री-पुरुषांनी कसं वागावं यातही बदल हा व्हायलाच हवा. हा बदल विचारांत व्हायला हवा आणि कृतीतून तो दिसायला हवा. मग मनु असो किंवा आणखीही कोणी असो त्यांनी जे सांगितलं त्याचं दडपण मनावर वागवण्याची काही गरज उरणार नाही. त्यांना नाकारल्यानं काही तुमचा धर्म बुडणार नाही. तेवढी खात्री मी नक्कीच देऊ शकतो.


Comments