सेक्स आणि धर्म आणि स्त्री

सेक्स आणि धर्म आणि स्त्रियांचा फार पूर्वीपासून जवळचा संबंध आहे. इथं लक्षात घेतलं पाहिजे की काही गोष्टी जगातील अपवाद वगळता सर्वंच धर्मांत सारख्या दिसतात. त्या म्हणजे,

-    १- सेक्सचा जवळपास सर्वंच धर्मांनी निषेध केला आहे.
-    २- सेक्ससाठी स्त्री कारणीभूत असते व ती पुरुषाला चूकीच्या मार्गावर नेते हा सर्वंच धर्मियांचा लाडका सिद्धांत आहे. त्यामुळे स्त्रियांचा निषेध केलेला आढळतो.
-    ३- धर्माच्या आधार घेऊन छुप्या पद्धतीनं स्त्रियांचं लैंगिक शोषण.

पूर्वीच्या काळी जेव्हा समाज मुक्त होता त्यावेळी सेक्स ही एक नैसर्गिक गोष्ट मानली जायची आणि त्याविषयी घृणेची भावना नव्हती. समाजात आणि धर्मांतही सेक्सला महत्वाचं स्थान होतं. जे प्राचीन धर्म आहेत त्यात ही बाब उल्लेखनीय आहे. मानवाची प्रगती जशी होत गेली आणि नंतरच्या काळात जसे नवीन धर्म उदयास आले तसे सेक्सला त्यांच्यात स्थान मिळालं नाही, पर्यायानं स्त्रियांनाही स्थान मिळालं नाही. पण त्याचवेळी धर्माचाच आधार घेत स्त्रियांचं लैंगिक शोषण करण्यात धार्मिक पुरोहित वर्ग आघाडीवर होता. त्यांना तत्कालीन राज सत्तेची आणि समाजातील प्रतिष्ठित वर्गाची साथ लाभली त्यामुळे त्यांनीही या शोषणात आपला वाटा उचलला.


मानवी प्रगती होत असताना, विज्ञानाचा उदय होत गेला तसं धर्माला मागे जावं लागलं. सुधारकांनी धर्मांतील अनेक वाईट चालीरितींवर कडाडून टीका केली त्यामुळे मोठ्या प्रमाणात धर्मातील लैंगिक शोषणाला आळा बसला. आपल्या इथं पूर्वी गणिका होत्या, देव दासी होत्या, मंदिरातील नृत्यांगणा होत्या, ज्यांचा देवाधर्माच्या नावाखाली पुजारी वर्ग आणि समाजातील सबळ वर्ग उपभोगच घेत होता. हे प्रमाण आता कमी झालंय तर काही ठिकाणी पूर्णपणे नष्ट झालंय. पण या सर्वांचा स्त्रियांवर जो परिणाम झाला आणि समाजात स्त्रियांची जी प्रतिष्ठा खालावली, त्यांच्यावर जी नैतिकतेची बंधनं आली ती मात्र यामुळे कमी झाली नाहीत. उलट त्यांचं आता वेगळ्या पद्धतीनं लैंगिक शोषण होऊ लागलं. स्त्रियांनी लैंगिक भावना नसतात, त्या पुरुषांना चांगल्या मार्गावरून मागे ओढतात, त्यांचं वर्तनच अनैतिक असतं, सर्व दुःखाचं मूळ स्त्रीजातच आहे असे गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरवले गेले. सोबतीला त्यांच्या सामाजिक संचारावर बंधनं आली. पूर्वी स्त्रियांचं पुरुषांकडून लैंगिक शोषण होत होतं आणि मग त्याचं दुसरं टोक गाठलं गेलं जिथं स्त्रियांनाच लैंगिक अधिकार नाकारण्यात आले. लैंगिक सुख घेण्यात त्यांच्यावर बंधनं टाकण्यात आली. वेगवेगळ्या कारणांवरून त्यांच्या लैंगिक भावना चिरडण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. बहुपत्नीत्व, नियोग पद्धती, बालविवाह, विधवापन या सर्वांतून त्यांच्या लैंगिक भावनांचा अनादर करण्यात आला. ही कोंडी फुटण्यासाठी बराच कालावधी लागला पण आजही ती पूर्णपणे सुटलेली नाही. कारण या सर्वांसोबतच नैतिकतेचं आणि अब्रुचं एक नवं जोखड स्त्रियांच्या मानेवर टाकण्यात आलं ज्यांतून आजही ती सुटलेली नाही. 

Comments