बुध्द
गौतमाची स्त्रियांविषयीची मतं काय होती आणि तिचा आजच्या काळाशी काही संबंध आहे का
याचा विचार आपण करतोय. महापरिनिब्बानसुत्तात एका प्रसंगी आनंद बुध्दाला विचारतो,
“आम्ही स्त्रियांशी कसे
वागावे?”
“स्त्रियांकडे पाहू नये.”
“पण पाहायची वेळ आली तर?”
“त्यांच्याशी बोलू नये.”
“पण बोलावेच लागले तर?”
“तुम्ही तुमची स्मृती
जागृत ठेवावी.”
(बुध्द
हसतो आहे – मंगला आठलेकर)
स्त्रियांशी
कसं वागावं यावरची बुध्दाची ही उत्तरं आहेत. संघात किंवा बाहेर भिक्षा मागण्याच्या
प्रसंगी स्त्रियांशी कसं वागावं यावर बुध्दानं अनेक ठिकाणी अनेक सूचना दिल्या
आहेत. त्या काही फारशा चांगल्या सूचना नाहीत. दुसरं म्हणजे त्या एकांगी आहेत. वर
दिलेल्या सूचना या बुध्दाच्या काळात भिक्षूंनी स्त्रियांशी कसं वागावं यासंबंधी
असल्या तरी त्यामागे पुन्हा एकदा स्त्रियांनाच दोषी ठरवण्यात आलं आहे. हे का
करायचं तर याचं कारणही बुध्द पुढे सांगतो.
“भिक्षूंनो, स्त्री चालत
असते, उभी असते, झोपलेली असते, हसत-बोलत असते इतकेच नव्हे, तर मेलेली असते
तेव्हाही पुरुषाचे चित्त आपल्यात जखडून ठेवत असते. भिक्षूंनो, स्त्री हे माराचे
सर्वमुखी बंधन आहे.”
“भिक्षूंनो, ज्याच्या
हाती तलवार असेल त्याच्याशी बोला, पिशाच्चाबरोबर बोला, विषारी सापाजवळ बसा. परंतु
भिक्षूंनो, एकट्या स्त्रीशी एकान्तात कधीही गप्पा मारू नका. स्त्री आपल्या नजरेने,
शरीर प्रदर्शनाने, मधुर बोलण्याने पुरुषाला गुंतवते. तेव्हा स्त्रीबरोबर एकान्तात
बसणे योग्य नाही.”
बुध्दाच्या
सर्व सूचना स्त्रियांसाठी आहेत. पुरुषांसाठी नाहीत. सर्व दोष स्त्रीवर घातलेला
आहे. पुरुषांवर नाही. बुध्दाच्या काळात तरुण वयात मोठ्या प्रमाणात पुरुष सन्यास
घ्यायचे आणि भिक्षू व्हायचे. पण केवळ सन्यास घेतल्याने शरीर-मनाच्या वासना नष्ट
होतीलच असं नसतं. आपण असं समजूयात की बुध्दानं त्यासाठी या सूचना या भिक्षूंना
केल्यात.
पण
यांतून समाजानं मात्र चूकीचा धडा घेतला ज्याचे परिणाम स्त्रिया तेव्हा पासूनच
भोगतच आहेत. बुध्दाच्या आधीही मनुस्मृतीतून स्त्रियांविषयी अशाच सूचनांचा भडिमार
करण्यात आला होता. पुरुष चळले तर दोष स्त्रियांचा. पुरुषांनी स्त्रीवर बलात्कार
केला तरीही दोष स्त्रीचाच. ती बोलते, ती चालते, तीचे कपडे, तिचं हसणं हे सारं
चूकीचं. त्यामुळे पुरुष चळतो. म्हणून स्त्री दोषी. पुरुषाने स्त्रीवर केलेल्या
सर्व अत्याचाराला पुरुष नाही तर स्त्रीच दोषी असते अशी ही व्यवस्था आहे. जी आजही
टिकून आहे. आपल्या घरीदारी सगळीकडे सूचना या फक्त मुलींना केल्या जातात. मुलांना
सूचना दिल्या जात नाहीत. कारण मुलं म्हणजे गुणांचे पुतळेच असतात. अगदी निर्मळ
मनाचे असतात. या रंगढंग करणा-या, नेहमी शरीरसुखाला चटावलेल्या मुलीच या बिचा-या
मुलांना फसवतात. असा एक घट्ट समज आपल्या समाजात आहे. फक्त पुरुषांमध्येच नाही तर
स्त्रियांमध्येही. बुध्द, मनु याला जबाबदार आहेत असं म्हणून आपण या दोषांतून मुक्त
होऊ शकत नाही. त्यांना जाऊन हजारो वर्षं लोटली आहेत. ते आज नाहीत पण आपण आहोत. मग
आपल्या आजच्या जगण्याला त्यांच्या नियमांचा आधार का घेतो आपण हा खरा प्रश्न आहे.
त्यांच्या हातून काही चुकीच्या गोष्टी लिहिल्या गेल्या असतील, तर त्यांच्यात
सुधारणा करण्याची जबाबदारी आपली आहे. ते न करता त्यांचाच चूकीचा कित्ता गिरवणं हे
काही शहापणानचं लक्षण नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण आता पुढाकार घ्यायला
हवा. तो तुम्ही घ्याल ही आशा आहे.
Comments
Post a Comment