ऑक्टोबर हा जगभरात स्तनांच्या कर्करोगासंबंधीच्या जागृतीसाठी ओळखला
जातो. स्तन आणि स्त्री हे नातं असलं तरी स्तन आणि पुरुष हेही एक नातं आहे. कारण हा
कर्करोग पुरुषांमध्येही आढळतो फक्त त्याचं प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत कमी असतं.
स्त्रियांच्या बाबतीत ते केवळ जास्तच नाही तर त्याचे अन्य परिणामही होतात.
स्त्रिचे स्तन हे तिच्या सौंदर्याचं एक प्रमुख लक्षण असतं. मातृत्व मिळाल्यानंतर
मुलाच्या भरणपोषणाचं स्थान त्याला मिळतं. लैंगिक जीवनातलाही तो एक महत्त्वाचा घटक
असतो त्यामुळे पुरुषांनाही स्त्रिच्या स्तनांचं कायम आकर्षण असतं. हेच स्तन जेव्हा
कर्करोगानं ग्रासले जातात त्यावेळी एका स्त्रीवर त्याचे केवळ शारिरीक परिणामच होत
नाहीत तर मानसिक परिणामही होतात. अगदी लहान वयापासून सर्वंच स्त्रियांना हा
कर्करोग होण्याची शक्यता असली तरीही साधारण चाळीशीनंतर स्त्रिला स्तनांचा कर्करोग
होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणीही याकडे दूर्लक्ष करू नये हे उत्तम.
स्तनांमध्ये तयार झालेल्या लहान गाठी या कर्करोगाच्या असू शकतात त्यामुळे
त्यांच्याकडे दूर्लक्ष करणं परवडत नाही. पण स्त्रियांमध्ये एक स्वाभाविक संकोच आणि
स्वतःकडे दूर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे त्या आपल्या स्तनांविषयी काळजी
घेत नाहीत. स्वतःच्या स्तनांची हातानं वेळोवेळी चाचपणी करणं हा एक सोपा व साधा
उपाय असतो की ज्यामुळे या गाठींचं अस्तित्त्व वेळेत लक्षात येऊ शकेल. पण
प्रत्यक्षात पुरुष जितक्या वेळा या स्तनांना हात लावतात तितक्या स्त्रिया मात्र
स्वतःच्याच स्तनांना हाताळत नाहीत. दुसरं म्हणजे या गाठी लक्षात आल्यानंतरही
स्त्रिया त्याकडे दूर्लक्ष करतात. त्या दुधाच्या गाठी असल्याचं सांगून स्वतःची
समजूत काढतात. ब-याच जणींना या गाठी कर्करोगाच्या असू शकतात याचीच मूळात माहिती
नसते. गाठींशिवाय स्तनांच्या बोंडीतून (निप्पल) रक्त
येणं, स्तनांच्या आकारात, रंगात, त्वचेत फरक येणं ही कर्करोगाची लक्षणं असू शकतात.
त्यामुळे त्याकडे दूर्लक्ष करू नये. अन्यथा ही माहिती होईपर्यंत वेळ गेलेली असते. स्तनांचा
सौंदर्याशी संबंध असल्यानं, स्त्रीत्वाशी संबंध असल्यानं, कर्करोग झाल्याचं लक्षात
येतात अनेकींना त्याचा मानसिक धक्का बसतो. जर ते स्तन काढण्याची गरज निर्माण झाली
तर हा धक्का फारच भयानक असतो. त्यांच्या पुरुषांनाही तो सहजी पचवता येत नाही.
स्तनांच्या कर्करोगासंबंधीची ही अवस्था आपल्या इथे अगदी सगळीकडे
एकसमानच असते. यांतून वाचायचं असेल तर स्त्रियांनीच नव्हे तर त्यांच्या
पुरुषांनीही त्यांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. असा कर्करोग झाल्याचं
कळल्यावर त्या स्त्रीची मानसिक तयारी करण्यासाठी तिला पाठींबा द्यायला हवं.
स्त्रिचे स्तन तिच्या सौंदर्याचं लक्षण असलं तरीही ते तिच्या जीवापेक्षा नक्कीच
मोठे नसतात. ते तिच्या स्त्रित्वाचंही खरं लक्षण नसतं. त्यामुळे तिच्या
कर्तृत्वाला उणेपण येत नाही. हे आपण लक्षात घ्यायला हवं. अशा कठीण परिस्थितीत तिचा
आत्मसन्मान कायम ठेवण्यासाठी आणि मान जपण्यासाठी पुरुषांनी विशेष प्रयत्न करायला
हवेत आणि मुख्य म्हणजे अन्य स्त्रियांनी देखिल. कारण ब-याचदा असं होतं की पुरुष ही
गोष्ट समजून घेतात पण स्त्रिया मात्र याची हेटाळणीच करताना दिसतात. हे चित्र
बदलावं ही अपेक्षा.
ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोगाच्या जागृतीसंदर्भात आहे त्यामुळे त्याची
माहिती आपल्या घरातील स्त्रियांना द्या. स्त्रियांनी देखिल, ज्या विशेषतः चाळीशीच्या
पुढच्या आहेत, ज्यांच्या स्तनांत गाठी आहेत, त्यांनी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
करून घ्यावी.

Comments
Post a Comment