वरील आकड्याचा काय अर्थ होतो ते सांगण्याआधी
त्यामागची थोडी भूमिका स्पष्ट करणं मला गरजेचं वाटतं. या ब्लॉगमधून मी कायम
स्त्री-पुरुष संबंधातील लेखन करतोय आणि यापुढेही करत राहणार आहे. हे लिखाण करताना
समाज, संस्कृती आणि धर्म या तिन्ही गोष्टींचा वारंवार उल्लेख करण्यात येईल. कारण
या तिघांशिवाय भारतीय समाजातील स्त्री-पुरुष संबंधाची चिकित्सा करणं अशक्य आहे.
याचं कारण म्हणजे आपल्या इथे व्यक्तीपेक्षा समाजाला जास्त महत्त्व देण्यात येतं.
त्यामुळे व्यक्तिपेक्षा कुटुंब, व्यक्तिपेक्षा समाज अशीच रचना आपल्या इथे दिसते.
असं जर आहे तर संस्कृती आणि धर्म यांच्या संबंधानेच स्त्री-पुरुषांविषयी कोणताही
विचार करणं भाग पडतं. त्यामुळे धर्म सोडून या गोष्टींचा विचार होणार नाही. कारण
अजूनही धर्माचा अत्यंत भयानक असा पगडा आपल्या इथं प्रत्येकावरच आहे. भारतीय
माणसाच्या अंगात हे धार्मिक संस्कार इतके भिनलेत की त्यात काही वावगं असू शकतं
याचा विचारही त्याच्या मनात येत नाही. बरं हे चांगल्यासाठी असतं तर चिंतेची बाब
नव्हती. पण धर्मांत अनेक चांगल्या गोष्टी असतानाही दूर्दैवानं त्यांचा प्रसार झाला
नाही पण वाईट गोष्टींची मात्र प्रसार झाला. त्यात अर्थातच स्त्रियांना मोठा फटका
बसला आणि पुरुषांनाही. पण त्याचं स्वरुप असं आहे की ना स्त्रियांना ना पुरुषांनाही
आपण काही चुकीचं वागतोय असं वाटत नाही. याला कारण धर्म. धर्मात सांगितलं आहे,
संस्कृती आहे, परंपरा आहे, असं म्हटलं की झालं, त्यापुढे मग कोणताच तर्क चालत
नाही. पण याचाच आधार घेत पुरुषांनी स्त्रियांनी फसवलं, स्त्रियांनी स्त्रियांचा
घात केला, समर्थ पुरुषांनी अन्य पुरुषांवर सत्ता बळकट केली आणि असंच काही करत करत
आजचा समाज निर्माण झालाय. एकूणातच थोडे अपवाद वगळले तर धर्माचा इतिहास हा मानवी
शोषणाचा इतिहास आहे यात शंका नाही. त्यावर बोलणं सुरू राहिलच तर त्यात या आकड्याची
भर.
१६२२ चा अर्थ काय असा विचार तुम्ही एव्हाना केला
असेलच. पण तुमचे सारे अंदाज चुकतील असा माझा आपला एक अंदाज आहे. १६२२ हे काही साल
नाही, हा कोणता जादूई आकडा नाही. तर ही आहे आपल्या हिंदू धर्मांतील एकूण व्रतांची
संख्या. आपल्या धर्मानं कोणत्या ना कोणत्या कारणासाठी करायला सांगितलेली ही व्रतं
आहेत. उपवास, वैकल्यं आहेत. म्हणजे एका वर्षांत दर दिवशी साडेचार व्रतं येतात.
यातली ९९ टक्के व्रतं ही स्त्रियांनी करायची आहेत. तर उरलेल्या १ टक्का
व्रतांमध्येही पुरुषाला तिनं व्रतांची तयारी करून द्यायची आहे. धर्मशास्त्रांचा
इतिहास असं सांगतो की ब्राह्मण पुरोहितांनी समाजातलं आपलं स्थान बळकट करण्यासाठी
आणि आपली आर्थिक व सामाजिक सत्ता टिकवण्यासाठी व्रतांचं हे जाळं तयार केलं ज्यात
अडकून सारा हिंदू समाज रसातळाला गेला. यात स्त्रिया अगदी तळाला होत्या हे सांगायला
नकोच. यातली बहुतांश व्रतं ही पतीच्या सुखासाठी पत्नीनं करायची आहेत. पण पत्नीच्या
सुखासाठी पतीनं करायचं एकही व्रत यात नाही. असल्यास कोणी मला ते नक्की सांगावं.
उरलेली व्रतंही कुटुंबाच्या सुखासाठी आहेत जी पुन्हा घरातल्या स्त्रिनेच करायची
आहेत. आणि जी काही थोडीफार पुरुषांनी करायची व्रतं असतील त्यातही त्यांची तयारी
स्त्रिनेच करायची आहे. म्हणजे इथूनतिथून तिनं देवघरातच अडकून राहावं असा हा पुरता
बंदोबस्त आहे. ज्यात हिंदू स्त्रिचं किती नुकसान झालं त्याची कल्पना करणं केवळ
अशक्य आहे. खेदाची बाब ही का आजच्या काळातही व्रतांचा हा ओझा आपण भिरकावलेला नाही.
आठवड्यातले दोनतीन उपवास तरी आपण करतोच. शनिवारी शनिला तेल वाहतोच. गणपती मारूतीचं
मंदिर दिसलं की हात जोडतोच. आपल्याला सारं काही फुकटात आणि काही कष्ट न करता
मिळवायचं असतं. त्यामुळे व्रतांची ही दुकानदारी आजवर कोणत्याही अडचणींशिवाय सुरू
राहिली आहे. पण यात आपली किती क्रयशक्ति खर्च होते, त्याचा आपल्या स्त्रियांच्या
मानसिकतेवर आणि शरीरावर काय परिणाम होतो याचा कोणी विचार करत नाहीत. त्यांना आपण
मानसिकदृष्ट्या कमकुवत करतोय याचीही कल्पना आपल्याला येत नाही. त्यांना
पुरुषांच्या गुलामगिरीला जुंपलं जातं हेही कळत नाही. मुख्य म्हणजे या
स्त्रियांनाही यात काही वावगं वाटू नये इतकी ही भयानक परिस्थिती आहे. आता तर
सर्वांनीच याचा पद्धतशीर मार्केटींगच सुरू केलं आहे. वर्तमानपत्रांतून, न्यूज
वाहिन्यांवर, मासिकांमधून, सतत हे व्रत करा आणि धनवान व्हा, ते व्रत करा आणि
कुटुंबाचं सुख मिळवा याचा चोविस तास मारा सुरू असतो. धर्मांचं अत्यंत गलिच्छ,
निर्लज्ज, धंदेवाईक स्वरूप आता तयार झालं आहे. आपण आतातरी या मूर्खपणातून स्वतःची
सुटका करून घ्यायलाच हवी.

Comments
Post a Comment