वरील वाक्य किंवा आदेशवजा संदेश कोणत्या पुस्तकात आहे हे सांगण्याआधी
एक प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा की तुमच्यापैकी किती जणांना हे मान्य आहे. मी
आशा करतो की आपल्यापैकी एकालाही हे विधान मान्य होणार नाही. पण तरीही या गोष्टीवर
विश्वास असणारे हजारो लाखो लोक आजही आपल्या देशात आहेत याविषयीही माझ्या मनात शंका
नाही. कारण आपल्या तथाकथित थोर भारतीय संस्कृतीनं आजवर आपल्याला हेच सांगतिलं आहे.
पुरुषांनी हा आपला अधिकार मानला आणि स्त्रियांनी मुकाटपणे त्याला दुजोरा दिला. हे
चित्र आज काही प्रमाणात बदलण्याची चिन्हं दिसत आहेत पण अद्याप बरंच काही व्हायचं
बाकी आहे. त्यामुळे हे लिखाण.
तर वरील थोर संदेश ज्यात आहे तो एक धर्मग्रंथ मानण्यात येतो आणि
महाराष्ट्रातील हजारो घरांमध्ये त्याचं पठण होत असतं. गुरुचरित्र या दत्त
संप्रदायातील ग्रंथात हे विधान आहे. दत्त संप्रदाय हा महाराष्ट्रात एक महत्त्वाचा
संप्रदाय आहे आणि त्याचे काही लाख तरी अनुयायी नक्कीच महाराष्ट्रांत असतील. या
अनुयायांना गुरुचरित्र हा आदरणीय ग्रंथ आहे. पण आपल्याकडे जे इतर धर्मग्रंथांच्या
बाबतीत घडतं तेच इथंही घडलेलं आहे. आपण निव्वळ पारायणं करतो पण कधी आपण जे वाचतो
त्याची चिकित्सा करत नाही. आपल्या वर्तमान जगण्याशी हा ग्रंथ विरोधी आहे, त्यात
चूकीच्या धारणा आहेत याचाही कधी विचार करत नाहीत. आपण श्रद्धेच्या नावाखाली अनेक
गोष्टी खपवून घेतो. किंवा समोरच्याला खपवून घ्यायला भाग पाडतो. धर्मग्रंथांच्या
बाबतीत हे हमखास घडतं. आपण श्रद्धेच्या नावाखाली त्यांतील वाट्टेल त्या गोष्टी
चालवून घेतो. पण असं करताना त्या चूकीच्या गोष्टी आपल्या मनावर नकळत ठसत जातात
याचा विचार आपण करत नाही. मला कोणाच्या धार्मिक श्रद्धेच्या बाबतीत काही बोलायचं
नाही. तो काही इथला विषय नाही. पण आपण ज्या काळात वावरतो तिथं स्त्री-पुरुषांच्या
समानतेबाबत काही विपरीत धारणा असतील तर त्याचा आपण निषेध करायला हवा असं मला
वाटतं. गुरुचरित्र तुम्ही वाचत असलात तर वाचा पण त्यात काय आहे त्याचीही एकदा
उघड्या डोळ्यांनी शहानिशा करा. त्यांतील चुकीच्या गोष्टींना आपल्या जीवनात थारा
देणार नाही याचाही निश्चय करा. हे जमलं तर ते खरं पारायण होईल. कारण जे आहे ते
बदलता येणार नाही पण आपल्याहातून त्याच चूकीची पुनरावृत्ती होणार नाही इतकं तर
आपल्या नक्कीच हातात आहे. आता ज्या गुरुचरित्राविषयी मी इतकं बोलतोय त्यात असं काय
आहे याचाही विचार करू.
“शूद्रांच्या प्रमाणे
ब्राह्मणांनी खुद्द आपल्याच समाजातील स्त्रियांची केवढी विलक्षण दुरवस्था करून
टाकली ते याच कालखंडात लिहिले गेलेले गुरूचरित्र वाचावे म्हणजे लक्षात येते.
आजसुद्धा अनेक घरांतून या ग्रंथाची पारायणे होतात. विवाहित स्त्रीचा जो आचारधर्म
गुरूचरित्राने सांगितला आहे तो वरवर चाळला तरी स्त्रीचे व्यक्तित्त्व कसे
पद्धतशीरपणे मारले जात असे याची कल्पना येईल. अखंड पतिसेवा हाच तिचा परमधर्म,
पतीचे उच्छिष्टभोजन हेच तिचे भोजन. गावात एखादा उत्सव चाललेला असेल तर तिने तिकडे
जावयाचे नाही. तिला तीर्थयात्रा नाही. पती घरात असला म्हणजे तिने दुश्चित्त
रहावयाचे नाही आणि पती दुश्चित्त असला तर तिने आनंदाची छटा सुद्धा दाखवायची नाही.
पतीचे पादोदक हे स्त्रीने तीर्थ मानावे. पती हा प्रत्यक्ष शंकर आहे असे निरंतर
मानावे. पती दुराचरणी झाला तरी त्याची निंदा करू नये. तो कसाही असला तरी त्याची
स्तुतीच करावी...इत्यादी इत्यादी अध्याय ३० ते ३२ मध्ये स्त्रीधर्म सांगून
झाल्यावर इहपराची जोडी देता। पुरूष नारीचा देव जाणा। असा उपसंहार केला आहे. (धर्म, संत व स्त्री – डॉ. शारदा देशपांडे
(देशमुख) – पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन)”
आता हे वाचून ज्यानं त्यानं निर्णय घ्यायचा आहे. आपण उघड डोळ्यांनी
भक्ति करायची की बंद डोळ्यांनी चूकीच्या परंपरा यापुढेही चालवत न्यायच्या.
Comments
Post a Comment