एकदा
जाणुस्सोणि ब्राह्मण बुध्दाकडे जातो व सारे क्षेमकुशल विचारून झाल्यावर तो
क्षत्रिय, ब्राह्मण, गृहपती, स्त्री, चोर आणि श्रमण (संन्यासी) यांच्या संदर्भात
बुध्दाला पाच प्रश्न विचारतो. स्त्रियांसाठीचे प्रश्न असे –
१-
हे गौतम, स्त्रियांच्या जीवनाचा उद्देश काय असतो?
२-
त्यांचा मुख्य विचार काय असतो?
३-
त्यांची प्रतिष्ठा कोणत्या गोष्टीत असते?
४-
त्यांची दृष्टी कोणत्या गोष्टीवर असते?
५-
त्यांना संतोष कोणत्या गोष्टीने होतो?
बुध्द
म्हणतो, “स्त्रियांच्या जीवनाचा
उद्देश पुरुषाची प्राप्ती करणे हा असतो. मुख्य विचार दागदागिने मिळवणे हा असतो.
मुलगा होण्यात त्यांना प्रतिष्ठा वाटत असते. व ती मिळतही असते. त्यांची दृष्टी
आपल्यावर सवत येता नये यावर असते आणि त्यांना संतोष धन-ऐश्वर्याच्या प्राप्तीने
होत असतो.”
अडीच
हजार वर्षांपूर्वी जी सामाजिक स्थिती होती, स्त्री-पुरुषांना या समाजात जे स्थान
होतं, त्यानुसार बुध्दानं ही उत्तरं दिली आहेत. एरव्हीचा बंडखोर बुध्द इथं
पारंपरीक उत्तरं देण्यातच धन्यता मानतो. पण आपण बुध्दाचा विसरूयात. आज तरी
परिस्थिती बदलली आहे का याचा विचार केला तर काय दिसतं?
अजूनही
घरोघरी मुलींना परक्याचं धन मानलं जातं आणि तिच्यावर पैसा खर्च करणं म्हणजे अपव्यय
आहे असं मानलं जातं. कारण तिचं पुढं लग्न होणार असतं म्हणून. मुलीचं लग्नातच
तिच्या आयुष्याची कृतार्थता आहे यावर आजही आपल्या समाजाचा ठाम विश्वास आहे.
त्यामुळे तिला शिकवणं, तिच्या पायावर तिला उभं होऊ देणं, तिला स्वतंत्र विचार करू
देणं या गोष्टींना आपल्याकडे ठाम नकार असतो. लग्न करून तिनं सासरी जायचं आणि पतीची
सेवा करायची याच्यातच तिला मोठेपण आहे असं आपला समाज मानतो. तिला मुलगा झाला की
तिला घरीदारी प्रतिष्ठा मिळते. ज्यांनी मुलगा नाही त्या बायांची हेटाळणी होते.
मुलच नसेल तर वांझ म्हणून त्यांचा छळ केला जातो. त्यांची लग्नंही मोडतात. किंवा
नवरा सवत आणून उरावर बसवतो. मुल नाही म्हणून नव-याची हेटाळणी होत नाही. त्याचं
लग्न मोडत नाही. कारण तो पुरुष असतो. दोष त्याचा नसतो. स्त्रीचा असतो. या गोष्टी
अजूनही आपल्या इथं सुरू आहेत. आपण इतक्या वर्षांत काय शिकलो, आपली काय प्रगती झाली
याचा विचार केला जे दिसतं ते चित्र खिन्न करणारं असतं. ही परिस्थिती बदलण्यासाठी
आपण अजूनही प्रयत्न करणार आहोत की नाहीत हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःलाच विचारायला
हवा.
Comments
Post a Comment