हिंदू धर्म आणि स्त्री-पुरुष विचार



मागील काही लेखांमध्ये आपण बुध्द गौतमाचे स्त्रीविषयक विचार आणि सध्याची परिस्थिती यांच्याविषयी तुलनात्मक चर्चा केली होती. या पुढील काही लेखांमध्ये आपण हिंदू धर्मातील स्त्रियांचे स्थान याविषयी चर्चा करणार आहोत. ही चर्चा प्रामुख्याने मनुस्मृतीच्या आधारेच करणार आहोत. त्यामागची काही कारणं आहेत. मनुस्मृती ही भारतीय समाजाला नियमांनी बध्द करणारी स्मृती मानली जाते. जगातील आद्य कायदेपंडीत म्हणून मनुला मान मिळाला आहे. कोणी कसं वागावं किंवा वागू नये याचे नियम, त्यानुसार वागलं नाही तर काय शिक्षा करावी यासंबंधीच्या बाबी या स्मृतीत आहेत. त्याचा हिंदू धर्मावर दीर्घकालीन प्रभाव राहीला आहे. आज मनू जीवंत नसला, त्याची मनुस्मृती आचरणीय नसली तरीही मनूची मानसिकता मात्र लोकांमध्ये जीवंत आहे. त्यामुळे याची चर्चा गरजेची आहे. मनुची मानसिकता म्हणजे काय हेही इथं स्पष्ट करायला हवं. ती जातीय मानसिकता आहे. त्यात लोकांना त्यांच्या गुणांनुसार नाही तर जातीनुसार मान मिळतो. काहींना तोही मिळत नाही. स्वाभाविकपणे यात ब्राह्मणांना अधिक मान आहे आणि इतरांना तुलनेनं कमी. पण ही जातीव्यवस्था इथल्या लोकांनी स्वीकारली. त्याला मग कोणतीही कारणं असोत. दीर्घकाळ ही व्यवस्था आपल्याकडे उघडपणे नांदत होती. प्रत्येक जातीला आपल्या स्थानाची माहिती होती आणि त्यानुसार त्याचं आचरण होतं. स्वातंत्र्यानंतर ही परिस्थिती बदलत गेली. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्पृष्यतेचा कलंक मिटवण्याचे प्रयत्न आपल्याकडे सुरू झाले. त्यांनीच त्याला कायद्याचं स्वरुपही दिलं. पण म्हणून लोकांच्या मनातली जात गेली असं झालं नाही. उलट आता अशी परिस्थिती आहे की प्रत्येक जातीला आपली अस्मिता महत्त्वाची वाटते, जातीचा अभिमान वाटतो. त्यामुळे ब्राह्मणांची ब्राह्मणी वृत्ती आता प्रत्येकच जातीत उतरली आहे असं खेदानं म्हणावं लागतं.
या सर्वांत स्त्रीला नेहमीप्रमाणे गौण स्थान होतं आणि आजही ते आहेच. या सर्वांची सुरूवात मनुच्या आधीपासूनच झाली होती. मनुनं त्याला नियमांचं कायद्याचं रुप देऊन ही व्यवस्था घट्ट केली. जी आजही नाव बदलून का असेना पण लोकांच्या मनात आहेच. आचार आणि विचारांतही आहेच.
त्यामुळे ही चर्चा करायला हवी. कारण अशी चर्चा करताना आपण काल कुठे होतो आणि आज कुठे आहोत याचा अंदाज घेता येतो. आपण काही चुकीच्या गोष्टी आजही नाव बदलून नव्या स्वरुपात आचरणांत आणत नाही आहोत ना याचाही पडताळा घेता येतो.
मनु एक की अनेक हा वाद निरर्थक आहे. मनुस्मृती आज वापरात नाही किंवा त्यांत स्त्रियांविषयी गौरवोद्गारही काढले, त्यांत अनेक चांगले कायदेही होते याचीही चर्चा करण्याची गरज नाही. मनुस्मृती ही काही आपली गरज नाही. आपल्याला संविधान आहे, कायदे आहेत. मनुची चर्चा यासाठी करायची कारण मनुनं जे केलं ते पुन्हा कोणी आज करू नये व करत असेल तर त्याला अटकाव व्हावा. त्यासाठी ही चर्चा आहे.


Comments