बुध्दाचे
स्त्रियांसंबंधीचे विचार काय होते यावरचा हा शेवटचा लेख आहे.
बुध्द
म्हणतो, “भिक्षूंनो, जर स्त्री
रूपबलाने, धन-बलाने, ज्ञाति-बलाने आणि पुत्र-बलाने संपन्न असेल, पण शील-बलाने
संपन्न नसेल, तर लोक तिला कुळातून बाहेर काढीत असतात, परत बोलवत नाहीत.”
“भिक्षूंनो, जर स्त्री
शील-बलाने संपन्न असेल पण रूप-बलाने, धन-बलाने, ज्ञाति-बलाने, पुत्र-बलाने संपन्न
नसेल तर लोक तिला कुळातून बाहेर काढत नाहीत.”
“भिक्षूंनो, स्त्रीचे हे
पाच बल आहेत.”
“भिक्षूंनो, स्त्री ना
रूप-बलाने, ना धन-बलाने, ना ज्ञाति-बलाने, आणि ना पुत्र-बलाने, मरणानंतर स्वर्गात
उत्पन्न होऊन सुगतीला प्राप्त होत असते.”
“भिक्षूंनो, शील-बलानेच
स्त्री मरणानंतर स्वर्गात उत्पन्न होऊन सुगतीला प्राप्त होत असते.”
(बुध्द
हसतो आहे – मंगला आठलेकर)
शील
म्हणजे चारित्र्य. हे चारित्र्य दोन प्रकारचे आहे. एक मनाचं आणि दुसरं शरीराचं. पण
यांतील नवलाची बाब म्हणजे ही की स्त्रीच्या बाबतीतलं हे चारित्र्य तिच्यासाठी नाही
तर तिच्या कुटुंबाच्या दृष्टीनं पडताळून पाहिलं जातं. म्हणजे स्त्रीचं मनाचं
चारित्र्य उत्तम असायला हवं म्हणजे तिनं तिच्या घरात राहताना चांगलं वागावं. मान-मर्यादा
सांभाळावी. घरच्यांची मर्जी राखावी. पतीघरी गेल्यानंतर पतीची सेवा करायची. पतीच्या
घरच्यांची सेवा करायची. कोणी काहीही बोललं तरीही उलटून बोलू नये. कोणी कितीही
त्रास दिला तरीही काही करू नये. आपला छळ होतोय हे बाहेर सांगून सासरची अब्रू घालवू
नये. म्हणजे थोडक्यात त्या बाईनं स्वतःचं स्वत्व विसरून जावं. हे असं ती वागली की तिचं
चारित्र्य उत्तम.
दुसरं
चारित्र्य शरीराशी संबंधीत आहे. म्हणजे तिनं आपलं शरीर शुध्द ठेवावं. पण तिच्यावर
काही शारिरीक अत्याचार झालेच तर त्याचा दोष त्या पुरुषावर नाही तर तिच्यावरच येतो.
कारण ती स्त्री आहे. पुरुषानं तिच्यावर अत्याचार केले तरीही हा दोष त्या पुरुषाचा
नसतो. एखाद्या स्त्रीवर झालाच अत्याचार तर त्यानं त्या स्त्रीचं काय होतं
याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. पण त्यामुळे त्या स्त्रीच्या घराची मात्र अब्रू जाते.
हे
सारं अगदी हजारो वर्षांपासून आपल्याकडे सुरू आहे. स्त्रीचं चारित्र्य हे असं
इतरांच्या सापेक्ष तपासलं जातं, प्रशंसिलं जातं. तिच्या वैयक्तिक आवडी-निवडीचा
त्याच्याशी काहीही संबंध नसतो. ही परिस्थिती आजही बदललेली नाही. बुध्द जाऊन आता
अडीच हजार वर्षं लोटली आहेत. बुध्दाच्या काळातली परिस्थिती मात्र अजूनही बदललेली
नाही. पण याला बुध्द जबाबदार नाही. जबाबदार आहे आपला समाज. तुम्ही आम्ही सारेच.
कारण बुध्दानं जे सांगितलं त्यावर कसलाही विचार न करता आम्ही विश्वास ठेवला. बुध्दानंच
कशाला, इतरही महापुरुषांनी ज्या काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या त्यावरही आम्ही
असाच डोळे झाकून विश्वास ठेवला. स्वतःचा मेंदू ना आम्ही तेव्हा वापरला ना आता
वापरत आहोत. मग यात दोष त्या महापुरुषांचा कसा असेल?
दोष आपला आहे. काय चांगलं आहे काय वाईट आहे याची निवड करण्याची जबाबदारी आपली आहे.
आपण ही निवड कायम चुकीचीच करत आलोय. त्यात आता बदल व्हायला हवा. हे आपलं जगणं आहे.
त्यात शेकडो वर्षांपूर्वीचे नियम लावण्याची काही एक गरज नाही. आजच्या जगण्याला
आजच्या जगण्याचेच नियम लावायला हवेत. आजच्या काळात आजच्या गरजेनुसारच विचार करावा
लागेल. तरच आपण एक सुसंगत आयुष्य जगू शकू.
Comments
Post a Comment