बुद्ध आणि स्त्रिया – भाग ३

एकदा भद्दियमधील जातियवनात बुध्द विहार करीत असताना मेण्डकाचा नातू उग्गहने बुध्दाला जेवणासाठी आमंत्रित केलं. भोजन झाल्यावर तो बुध्दाला म्हणाला, भन्ते, या माझ्या मुली पतीच्या कुळात जातील. भगवान, यांना उपदेश द्यावा. भगवान, यांचे अनुशासन करावे, जे दीर्घकाळपर्यंत त्यांच्या हित आणि सुखाचे होईल.
बुध्द त्या कुमारिकांना म्हणाला, कुमारिकांनो, तुमचे कल्याण करणारे तुमचे आईवडील तुम्हांला ज्या पतीच्या स्वाधीन करतील त्याच्या अगोदर उठणे, त्याच्या नंतर झोपणे, त्याच्या आज्ञेत राहणे, अनुकूल आचरण करणे, मधुर बोलणे, पतीचा गौरव करणारे असतील त्यांचा सत्कार करणे, पतीच्या कामात सहभागी असणे, पतीच्या घरातील नोकर-चाकर यांच्या कामाची माहिती ठेवणे, पतीने जमवलेल्या धनधान्याचे रक्षण करणे, लबाडी न करणे, मद्यपान न करणे ही शिकवण तुम्ही आत्मसात केली पाहिजे. ज्या स्त्रीमध्ये हे गुण असतात ती स्त्री शरीर सोडल्यानंतर, मृत्यूनंतर मनापकायिक देवांच्यामध्ये जन्म घेते.
(बुध्द हसतो आहे – मंगला आठलेकर)

बुध्दाचे स्त्रियांबद्दल काय विचार होते आणि त्या विचारांचा समाजावर काय परिणाम झाला याचा विचार आपण करतोय.

स्त्रीनं पत्नी म्हणून पतीची कशी सेवा करायची आणि त्यांतच तिचं हित कसं आहे हे बुध्दाच्या वरील उद्गारांतून स्पष्ट होतं. आपण आजच्या काळाचा विचार केला तर ही परिस्थिती आजही आहे का याचा विचार करावा लागेल. कारण बुध्दाच्या काळातली स्त्री ही घरात राहणारी होती. पण आता ती घराबाहेर पडून काम करते आहे. मग अशावेळी पुरुषांच्या तिच्याविषयी असलेल्या अपेक्षा बदलल्या आहेत का? तर नाही. स्त्रीनं अजूनही पतीच्या आज्ञेतच राहावं. तिनं बाहेर काम केलं तरीही घरातली कामंही तिनंच करावीत असं घरातल्या पुरुषांनाच नव्हे तर स्त्रीयांनाही वाटतं. पुरुषांचं एकवेळ राहू देत पण स्त्रीयांनाही असं का वाटतं याचं मला कायम नवल वाटतं. त्यांनी जे दुःख भोगलं त्यांतून धडा घेऊन आपल्या मुलीला, सुनेला ते दुःख भोगावं लागू नये असं का वाटत नाही यांना? स्त्रिया या स्त्रियांच्या शत्रू असतात ते या कारणासाठी. कारण स्वतः एकदा त्रास भोगल्यानंतरही ती परंपरा मोडण्याऐवजी, आपल्या सूनांना अधिक छळण्यात सासू मंडळींना आसुरी आनंद होत असतो. परिस्थिती आता बदलत आहे. पण अजूनही ती अपवादात्मक परिस्थितीच आहे तो काही नियम नाही. मग गेल्या अडीच हजार वर्षांत समाजाची काय प्रगती झाली असा विचार आल्याशिवाय राहत नाही. हे सासाठीही सांगायचं कारण आपल्याइथं धर्माचं, महापुरुषांचं उदाहरण देऊन अशा अनिष्ट परंपरा उजळ माथ्यानं पाळल्या जातात. आपण हा मूर्खपणा आता थांबवायला हवा. 

Comments