एकदा
महाप्रजापती गौतमी आयुष्मान आनंदाला म्हणाली, “भन्ते आनन्द! भगवान बुध्दाकडे मी एक वर मागते. तो असा की, भिक्षू आणि भिक्षुणी
यांच्यातील उपसम्पदा व वय यांच्या जेष्ठतेनुसार परस्परांना अभिवादन, हात जोडणं,
परस्परांचा यथोचित सत्कार करणं ह्या गोष्टींना भगवान बुध्दानं परवानगी द्यावी.”
आनन्द
बुध्दाला गौतमीची इच्छा सांगतो.
बुध्द
म्हणतो, “आनन्द! स्त्रियांना कुणी अभिवादन करावं, त्यांचा सत्कार करावा या
गोष्टींना तथागत परवानगी देतील हे शक्य नाही. त्याला स्थानच नाही. इतर मतांचे
साधू, ज्यांचा धर्म अजून नीट सांगितला गेला नाही ते सुध्दा स्त्रियांना अभिवादन,
नमस्कार करायला परवानगी देत नाहीत, तिथं तथागत ही परवानगी कशी देतील?”
“भिक्षूंनो, स्त्रियांना
नमस्कार, अभिवादन करता नये. त्यांचा सत्कार करता नये. जो कोणी करेल तो दोषी ठरेल.”
-
विनयपिटक, चुल्लवग्ग – प्रातिमोक्ष – स्थापन स्कन्धक –
भिक्षुणी स्कन्धक
स्त्रोत
– बुध्द हसतो आहे – मंगला आठलेकर
विविध
धर्म आणि त्यांतील धर्म ग्रंथ आणि त्यांचे महापुरुष हे स्त्रियांविषयी काय विचार
करतात आणि त्याचा वर्तमान काळाशी काय संबंध आहे याचा शोध आपण या लेखांमधून घेणार
आहोत. याची गरज काय असा प्रश्न काहींना पडू शकतो. त्याचं उत्तर असं की
धर्मग्रंथांचा व महापुरुषांचा आपल्या सामाजिक व खासगी जीवनावर मोठा प्रभाव पडलेला
आहे. त्यामुळे स्त्रियांना जी बंधनं भोगावी लागली त्याची थोडीफार कल्पना सर्वांनाच
असेल. सध्याच्या आधुनिक काळात स्त्री स्वतंत्र होत आहे हे खरं असलं तरीही पुरुषच
नाही तर स्त्रियादेखील अजून या धार्मिक गुलामगिरीत अडकलेल्या आहेत. स्त्रीविरोधी
विचारांची जी एक परंपरा आपल्याकडे आहे त्यांतून त्यांची अद्याप सुटका झालेली नाही.
त्यामुळे याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. दुसरा मुद्दा हा की असं करून आपण
त्या धर्माचा किंवा महापुरुषाचा अपमान करत नाही का किंवा त्या जुन्या गोष्टी आता
कशाला उगाळायच्या? जुन्या गोष्टी का
उगाळायच्या त्याचं कारण आधीच सांगितलं आहे. आता धर्माचा किंवा महापुरुषाचा
अपमानाचा मुद्दा. तर धर्म हे माणसानं बनवलेले आहेत. त्यांची वेळोवेळी चिकित्सा
व्हायलाच हवी. महापुरुषांचे विचार हे त्यांच्या काळातील परिस्थितीला धरून असले
तरीही त्यांचा प्रभाव आजही कायम असल्यानं त्यांचे हे विचार योग्य आहे की अयोग्य
याची चिकित्सा करण्यांत चूक काहीच नाही. त्यामुळे त्यांच्या महानतेला बाध येण्याचं
काही कारण नाही. त्यांच्या काळातील सामाजिक परिस्थिती जाणून घेण्याचा हा एक
प्रयत्न आहे.
आता
वरील अवतरण हे बुध्दासंबंधीचं आहे. बौध्द धर्म हा एक क्रांतिकारी धर्म मानला जातो.
तत्कालीन वैदिक धर्माला बुध्दानं प्रखर विरोध केला आणि लोकांना पटेल असा एक मध्यम
मार्ग सांगणारा धर्म स्थापित केला. बुध्द हा करुणेचा महासागर म्हणून ओळखला जातो.
त्यानं जातीधर्माला स्थान दिलं नाही. सर्वांना आपलसं केलं. त्याचा स्त्रियांनाही
विरोध नव्हता पण ज्यावेळी त्या दीक्षा घेऊन संघात येण्याची इच्छा धरू लागल्या
त्यावेळी मात्र त्याची कसोटी लागली. स्त्रियांसंबंधी त्याचे विचार तेव्हापासून
काहीसे रुक्ष होऊ लागले. कदाचित त्याला संघातील सन्यासाचं कष्टाचं जीवन
स्त्रियांना झेपेल की नाही अशी शंका असावी. कदाचित त्याला स्त्रियांमुळे भिक्षू
विचलीत होतील अशी भीति असावी. मोठ्या संख्येनं येणा-या स्त्रियांचा भार कसा वाहावा
ही चिंता देखील असू शकते. ही व्यावहारीक कारणं होती. शिवाय हे विसरायला नको की
बुध्द हा शेवटी एक पुरुष होता आणि त्याकाळच्या स्त्रिविरोधी वातावरणाचा
त्याच्यावरही प्रभाव पडलेला असणारच. त्यात सर्वस्वी त्याला दोष देण्यांत अर्थ
नाही. कारण आधी जरी त्यानं स्त्रियांना भिक्षुणी होण्यास विरोध केला असला तरीही
त्यानं नंतर ती परवानगी दिलीच हे विसरता कामा नये.
वरील
विधानाचा संदर्भ स्त्रिया भिक्षुणी झाल्यानंतरचा आहे. पुरुष भिक्षू कितीही लहान
असला तरी त्याला कोणत्याही वयाच्या भिक्षुणीनं नमस्कार केलाच पाहिजे. पण भिक्षुणी
कितीही मोठी असली तरीही तिला कोणत्याही भिक्षूनं नमस्कार करू नये असा हा नियम
होता. बुध्द यासाठी अन्य धर्मांचा आधार घेतो. याचा अर्थ तत्कालीन धर्मांत
स्त्रियांना त्यांच्या ज्ञानयोग्यतेनुसार किंवा वयानुसारही मान मिळत नव्हता हे
लक्षात येतं. पण बुध्दानं याचा आधार घ्यावा ही त्याच्यातील पुरुषाची अगतिकता आणि
अहंकार दोन्ही दर्शवते. एरव्ही जो परंपरा मानत नाही, स्वमार्ग अनुसरतो त्यानं
अन्यांच्या चुकीच्या गोष्टींचा आधार घ्यावा हे त्याच्याच एरव्हीच्या बंडखोर
वृत्तीला अशोभनीय आहे.
हे
झालं बुध्दाचं. पण आजही तिच परिस्थिती आहे का याचा विचार केला तरीही हे लक्षात
येईल की अजूनही तशी परिस्थिती आहेच. कोणत्याही धर्म संस्थेत स्त्री ही उच्च
स्थानावर गेली आहे असं दिसत नाही. हिंदू धर्मांत स्त्री शंकराचार्य झालेली नाही.
मुसलमान धर्मांत स्त्री मौलवी दिसत नाहीत. बाकी धर्मही याला अपवाद नाहीत. याचा
अर्थ आजही धार्मिक परंपरेतही स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त मान दिला जात नाही.
समाजातही तुम्ही पाहिलं तर आपल्या वरच्या स्थानावर असलेली स्त्री पुरुषांना सहन
होत नाही. उदा. कार्यालयात आपली बॉस स्त्री असलेली पुरुषांना आवडत नाही. राजकारणात
स्त्रियांना मुख्य पदं दिली जात नाहीत. स्त्री बॉसेसची कायम थट्टा मस्करी केली
जाते. कुटुंबातही कर्त्या पुरुषाला जितका मान-अधिकार मिळतो तितका कर्त्या स्त्रिला
मिळत नाही. तिला नव-याच्या हाताखालीच राहावं लागतं. त्याचा तथाकथित मान सांभाळावाच
लागतो. त्यामुळे वर सांगितलेला संदर्भ दूर्दैवानं आजही खराच आहे असं म्हणावं
लागतं.
Comments
Post a Comment