स्त्री आणि आपले महापुरुष

सेक्ससंबंधीच्या बोलण्यात आपण गेले काही दिवस अनेक गोष्टींचा विचार करतोय. वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून सेक्ससंबंधी काय भावना, विचार, मतं, लोकांची, समाजाची, धर्माची होती याचा आढावा आपण घेतला आहे. यात एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवते ती म्हणजे सर्वंच धर्मांनी पुरुषांना उच्च स्थान दिलंय आणि त्यांच्या ब्रह्मचर्याची अफाट स्तुती केली आहे. त्यामानानं सर्वांनी स्त्रियांना गौण स्थान दिलं, ती अध्यात्म मार्गातली मोक्षप्राप्तीच्या आड येणारी धोंड आहे असं एकमुखानं सांगितलं. सेक्स म्हणजे स्त्री आणि स्त्री म्हणजे सेक्स, पुरुषांचा त्याच्याशी काहीही संबंधच नाही अशी अत्यंत चूकीची धारणा या धर्मांनी आणि त्यांच्या महापुरुषांनी समाजात रुजवल्याचं दिसतं. स्त्रियांसंबंधी बोलताना, सेक्ससंबंधी बोलताना, स्त्रिया कशा चुकीच्या आहेत, पुरुष किती भोळे असतात, स्त्रिया कशा आपल्या लावण्यानं त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि पथभ्रष्ट करतात याची ढिगानं उदाहरणं सापडतील. हे असं का व्हावं याचा आपण विचार केला आहे का? पुरुष तसा विचार करणार नाहीतच पण निदान स्त्रियांनी तरी असा विचार केला आहे का? तर याचं उत्तर नाही असंच द्यावं लागतं. कारण त्यांच्यावरही परंपरेनं इतकं दडपण आणलं आहे की आपण पुरुषांच्या अधःपाताला कारणीभूत आहोत हे त्यांनी मान्यच करून टाकलं आहे.
त्यामुळेच कधी कोणाला असा प्रश्न पडत नाही की जगात फक्त महापुरुषच कसे जन्माला येतात? महास्त्रिया का जन्माला येत नाहीत? त्या आल्याच नाहीत असं नक्कीच नाही पण पुरुषांनी त्यांना कधी मान्यता दिली नाही. थोडा उदारपणा दाखवत त्यांनी काहींचा गौरव नक्कीच केला पण त्यांचं स्थान पुरुषांपेक्षा कधीही वरचं असणार नाही याचीही पक्की काळजी त्यांनी कायमच घेतली. एकही धर्म याला अपवाद नाही. अनेक महापुरुष याला अपवाद नाहीत.

धर्मामध्ये स्त्रियांचं स्थान काय आहे, महापुरुषांनी स्त्रियांबद्दल काय म्हटलं, सेक्ससंबंधी त्यांना काय वाटत होतं याचा विचार आपण या नंतरच्या काळात करणार आहोत. कोणी म्हणेल की याची काय गरज आहे आता. तर गरज यासाठी आहे की हे विचार आज पूर्ण समाजातच पाझरले आहेत आणि त्यांचा लोकांच्या मनावरचा पगडा आजही उतरलेला नाही. हे ज्यांच्यामुळे झालं त्या मूळ कारणांचा शोध घेऊन तेव्हाची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे आणि काय असायला हवी यासाठी या सर्वांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे कोणी लगेच बिथरून जाण्याचं काही कारण नाही की स्वतःच्या भावना दुखवून घेण्याचंही काही कारण नाही. धर्म शेवटी माणसांनीच निर्माण केले आहेत आणि सारे महापुरुष शेवटी माणसंच होती. त्यांच्याकडूनही चुका या घडू शकतातच. त्यामुळे त्यांच्या मोठेपणाला बाध येत नाही की त्यांचे न्यून दाखवले म्हणून त्यांचा अपमानही होत नाही. उलट त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याची एक संधी यांतून मिळत असते. आपण हे यापुढे सातत्यानं करत राहणार आहोत. 

Comments