दिवाळीच्या सर्व वाचकांना आभाळभर शुभेच्छा. दिवाळी हा प्रकाश उत्सव
आहे त्यामुळे तुमच्या मनातील कलहाचा, अविचाराचा, असमानतेचा अंधार दूर होवो आणि
समानतेचा, समंजसपणाचा प्रकाश अविरत वर्षत राहो ही शुभेच्छा. आज दिवाळीचा पहिला
दिवस आहे. धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाचा आजचा दिवस मानला जातो. कुबेराचा
म्हणजेच धन रक्षक यक्ष देवतेचाही हा दिवस मानला जातो. परंपरेनं हा दिवस कसा साजरा
केला जातो ते इथं सांगण्याचं काही कारण नाही. पण परंपरा या काळानुसार बदलायला
हव्यात आणि त्यांच्यात नव्यानं जीवंत अर्थ भरले जाऊन त्या मृतप्राय होऊ नये यासाठी
आपण कायम प्रयत्न करायला हवेत. धनत्रयोदशीच्या निमित्ताने या पारंपरिक दिवसाला नवा
अर्थ कसा देता येईल व नव्या अर्थानं हा दिवस कसा साजरा करता येईल याचा इथं विचार
करायचा आहे.
१-
या दिवसाच्या निमित्तानं आपण सारे स्त्रियांना
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी हवी ती सर्व मदत करण्याची शपथ घेऊयात.
२-
आपल्या मुलींना-बहिणींना वडिलोपार्जित संपत्तीत
समान वाटा मिळेल याची दक्षता घेऊया.
३-
आपल्या घराच्या भिंतीवर त्यांच्याही नावाची पाटी
असेल याची काळजी घेऊया.
४-
शेतीच्या सातबा-यावर पत्नीचंही नाव नोंदवलं जाईल
याकडे लक्ष देऊया.
५-
मुलीच्या शिक्षणासाठी व तिला स्वतंत्रपणे
सन्मानानं जगता यावं यासाठी तिच्या नावानं पैशांची बचत तिच्या जन्मापासूनच सुरू
करूयात.
हे जर झालं तर ख-या अर्थानं आपण धनत्रयोदशी साजरी केली असं म्हणता
येईल. आपण हे कराल असा विश्वास आहेच. सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक
शुभेच्छा.
Comments
Post a Comment