सेक्ससंदर्भात ज्या काही गोष्टींचा विचार आपण केलाय त्यातली शेवटची
गोष्ट आज विचारात घ्यायची आहे. त्यानंतर आपण पुढच्या टप्प्यावरील विचार सुरू करणार
आहोत. सेक्सचा संकोच वाटण्याचा हा काळ आहे. पण त्यात एक दांभिकपणा आहे. दांभिकपणा
हा आहे की सेक्स सर्वांनाच हवा आहे पण त्याविषयी मोकळेपणानं मात्र कोणाला बोलायला
नको. पालक मुलांना त्याविषयी सांगत नाहीत. मुले-मुली एकमेकांशी त्याविषयी चर्चा
करू शकत नाहीत. शिक्षक विद्यार्थ्यांना त्याची माहिती देत नाहीत. याचा अर्थ हा
नाही की सेक्सविषयी कोणीच काही बोलत नाही. वर्तमानपत्रांतून, शाळांमधून, काही
चॅनेल्सवरून, रेडिओवरून, पुस्तकांमधून, मासिकांमधून, सोशल मीडियावरून आणि सामाजिक
संघटनांच्या द्वारे याविषयीची उपयुक्त माहिती दिली जाते. आणि त्याचा चांगला
उपयोगही झाला आहे, होत आहे. पण याचं स्वरुप अजूनही खासगीच आहे. ही माहिती खासगीच
राहते. त्यातला संकोच जात नाही. त्यामुळे अजूनही याविषयी मोकळेपणानं बोललं जात
नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे माहिती तर मिळते पण त्यानंतर जे प्रश्न मनात
उमटतात त्याविषयी फार कोणी बोलत नाहीत. दुसरं असं की माहिती आणि वस्तूस्थिती यात
खूप अंतर असतं. हे अंतर कमी करण्यासाठी थेट मोकळी चर्चा हाच एक मार्ग असतो. पण ते
क्वचितच होताना दिसतं.
याचे जे परिणाम असतात ते आपण सर्वांनीच कधी ना कधी भोगलेले असतात. विशेषतः उमलत्या वयात सेक्सची प्रचंड उर्जा अंगात सळसळत असताना त्याविषयी योग्य ती माहिती
न मिळाल्यानं भरकटण्याचा धोका जास्त असतो. आपल्या इथं हा धोका मोठ्या प्रमाणात
आहे. कारण हा विषयच आपल्याकडे वर्ज्य मानला जातो. ते काहीतरी भयानक पाप आहे असं
सातत्यानं आपल्या मनावर बिंबवलं जातं. त्यामुळे चुकीच्या मार्गांनी ही
सेक्सविषयीचं कुतुहल शमवण्याकडे आपला कल जातो. मुली स्वभावतः काहीशा संकोची
असल्यानं त्या फारशा यात लक्ष घालत नाही. ज्यामुळे नंतर त्यांना त्याचा त्रास
होतो. जेव्हा काही मुलं त्यांचा गैरफायदा घेतात. किंवा लग्नानंतर आपल्या नव-याला
योग्य तो लैंगिक प्रतिसाद कसा द्यावा हे न कळल्यानं त्यांचं वैवाहिक जीवन तनावाचं
बनतं. तर मुलं मोठ्या तथाकथित अनुभवी मुलांकडून चुकीची माहिती मिळवतात. कधी
मासिकांचा, पुस्तकांचा वापर करतात. इंटरनेटवर पॉर्न पाहतात. यांतून त्यांच्या
अपेक्षा कधी वाढतात तर कधी त्यांचं मुलींबद्दलचं मत विकृत बनतं. तर कधी
सेक्सबद्दलच त्यांना तिटकारा येण्याचीही शक्यता निर्माण होते. यामुळे नंतरच्या
काळात एकतर त्यांच्याकडून चुकीच्या गोष्टी घडतात. किंवा एकूणच स्त्रियांकडे बघण्याचा
त्यांचा दृष्टीकोन बदलतो किंवा विवाहानंतर त्यांचं लैंगिक जीवन चूकीच्या अपेक्षा
आपल्या पत्नीकडून ठेवल्यामुळे संकटात सापडतं. हे सारं टाळता येऊ शकतं. त्यासाठी
एकमेकांमध्ये मोकळा संवाद होणं गरजेचं आहे. आपण प्रयत्न करूयात की वेगवेगळ्या
गोष्टींच्या माध्यमातून याविषयी आपण बोलू.
Comments
Post a Comment