अलिकडच्या
काही काळांत महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून काही आंदोलनं स्त्री
संघटनांकडून करण्यात आली. महालक्ष्मी मंदिर, शनी मंदिर, हनुमान मंदिर, अय्यप्पा
स्वामी मंदिर, हाजी अली ट्रस्ट अशा काही मंदिरांच्या संबंधानं ही आंदोलनं करण्यात
आली. या ठिकाणी काही ना काही कारणांनी महिलांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत.
त्यांना शेकडो हजारो वर्षांची परंपरा आहे. आजवर कधी महिलांनाही त्याला विरोध केला
नव्हता. पण अलीकडे स्त्री समानतेच्या नावाखाली ‘पुरुषांना
जर या मंदिरात प्रवेश आहे तर आम्हाला का नको?’ असा युक्तिवाद करून
काही महिला संघटना याविरोधात न्यायालयात गेल्या, काहींनी मंदिरात आंदोलनं केली.
महाराष्ट्रात या मंदिर प्रवेशाला न्यायालयाचा पाठींबा मिळाला आणि कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, शनी शिंगणापूरचं
शनी मंदिर, मुंबईचं हाजी अली दरगाह अशा ठिकाणी महिलांना प्रवेश मिळाला. केरळ येथील
अय्यप्पा स्वामी किंवा शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशावरून मात्र आता सर्वोच्च
न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे.
ज्या
मंदिरात प्रवेश मिळाला तिथली आजची स्थिती काय आहे असं पाहिलं तर तिथं काही बदल
झालेला नाही. कारण काही आंदोलक महिलांनी पोलिसांची, न्यायालयाची मदत घेऊन मंदिरात
प्रवेश मिळवला खरा पण बहुसंख्य महिला मात्र त्यानंतरही पूर्वीच्याच प्रथांचं पालन
करत आहेत. उलट अशी प्रवेश बंदी कायम रहावी म्हणून काही महिलांनीच पुढाकार घेतला
आहे. म्हणजे जरी न्यायालयानं अधिकार दिला तरीही महिलांनीच तो अधिकार परंपरेच्या
दबावाखाली स्वतःहून नाकारला आहे हे वास्तव आहे.
बरं
मंदिर प्रवेशाची परवानगी मिळाली म्हणून महिलांच्या आयुष्यात काही मोठा क्रांतिकारक
बदल झाला असं काही आहे का? तर तसं नाही. त्यामुळे
त्यांचं जगणं सुधारणार आहे का? तर नाही. कारण मूळातच
मंदिरात प्रवेश मिळण्याचा आणि महिलांचं जगणं सुधारण्याचा काहीही संबंध नाही. केवळ
पुरुषांना प्रवेश म्हणून आम्हालाही प्रवेश हवाच या एका चूकीच्या समानतेच्या
कारणासाठी ही आंदोलनं झालीत आणि आताही होत आहेत.
मूळात
ज्या मंदिरात आपल्याला प्रवेश नाही, ज्या धार्मिक रुढींनी आपल्या जगण्याचा
सत्यानाश केला त्या मंदिरांची, देवांची महिलांना गरजच का वाटते हा मुख्य प्रश्न
आहे. महिलांनाच जर ही गुलामी हवी असेल किंवा ती गुलामी आहे असंही वाटत नसेल तर आधी
त्यांचं वैचारीक प्रबोधन करण्याची गरज आहे. मंदिरात पुरुषांच्या बरोबरीनं प्रवेश
मिळणं ही काही समानता नाही. या असल्या फुटकळ मंदिरात जाण्याची गरज महिलांना भासावी
ही खरी शरमेची बाब आहे. जो धर्म सातत्यानं महिलांना कमी लेखतो, त्यांना
रुढी-परंपरेच्या नावाखाली पुरुषांच्या गुलामीत ठेवतो अशा धर्माविरूद्ध बंड करून
त्याला आपल्या जगण्यातून हद्दपार करण्याऐवजी पुन्हा त्याच धर्माची जोखडं गळ्यावर
वाहून घेण्याची हौस महिलांना का वाटते यावर त्यांनीच विचार करण्याची गरज आहे. या
मंदिरात प्रवेश मिळून त्यांचं काही भलं होणार नाही. या मंदिरात प्रवेश नाही म्हणून
त्यांचं काही नुकसानही होणार नाही. पुरुषांना जर असल्या बालीश थोतांडात रमायचं
असेल तर तसा मूर्खपणा त्यांना करू द्या. महिलांनीही त्यांच्या मागून जाण्याचा
मूर्खपणा करण्याची काही गरज नाही.

Comments
Post a Comment