सेक्स आणि समाज यांचा कायमच अंतर्विरोध राहिला आहे. एक साधी गोष्ट आहे
की समाज हा सेक्समुळे जन्माला आला आहे, वाढला आहे. पण आपल्या या मूळ कारणालाच
विरोध करण्याची समाजाची मानसिकता असते. अर्थात हे सर्वकाळी नव्हतं. सेक्सचं आपल्या
जगण्यातलं स्थान माहित असल्यानं त्याला लोकांनी मान्यता दिली होती. समाजात
त्याविषयी संकोचाचं वातावरण नव्हतं. सेक्ससंबंधी गोष्टींना धार्मिक महत्त्व होतं.
त्याची आपल्याकडची महत्त्वाची उदाहरणं म्हणजे लिंगपूजा आणि योनीपुजा. लिंग म्हटलं
की शंकराची आठवण येते. हा मूळचा अनार्य अर्थात आपल्या मूळ भारतीय लोकांचा
शिश्नदेव. शिश्न म्हणजेच लिंग. शंकराची पिंडी ही लिंगाची प्रतिमा आहे. दुसरीकडे
आपल्याकडे मातृदेवतांची पुजा मोठ्या प्रमाणावर केली जायची. मातृदेवता म्हणजे
जननक्षम स्त्री.
या मूर्ती नग्न असायच्या आणि त्यांचे पाय फाकलेले असायचे आणि
त्यांतून त्यांची योनी स्पष्टपणे दाखवली गेलेली असायची. प्रजजनाविषयीचा आपल्या
पूर्वजांना असलेला आदर, त्याबद्दलचं एक अनामिक भय, आश्चर्य असे सर्व भाव या
मातृपुजनामागे होते. त्या काळी आपल्या इथं मातृसत्ता होती. स्त्रीच्या या माता
होण्याच्या सामर्थ्याविषयी पुरुषांना धाकयुक्त आदर होता. पण नंतर ही परिस्थिती
बदलत गेली. पुरुष सत्ता बळावली तसं मातृदेवतेऐवजी लिंगपूजेला महत्त्व येत गेलं.
मातृदेवता विस्मरणात गेल्या. स्त्रीचं समाजातलं स्थानही खाली जाऊ लागलं.
मातृसत्तेऐवजी पुरुषसत्ता रुढ झाली. प्रजननाचा कारक सेक्स याला दुय्यम स्थान
मिळालं आणि नंतर त्याविषयी बोलणंही बंद झालं. कारण सेक्स म्हटलं की स्त्रीच्या
प्रजनन सामर्थ्याचा उल्लेख अटळ असतो. पुरुषी समाजानं स्त्रीला नाकारताना सेक्सही
अशा पद्धतीनं उघडपणे नाकारला. आदिम जमातींमध्ये आजही सेक्स ही एक नैसर्गिक भावना
मानली जाते. तिथं त्यावर काही बंधनं नसतात. त्याच्याशी काही धार्मिक समजूती
जोडल्या गेल्या नसल्यानं त्याला अवास्तव महत्त्वही दिलं जात नाही. पण आपल्या
पुढारलेल्या समाजानं मात्र हा विषय निषिद्ध मानला आणि स्वतःचीच मोठी फसवणूक करून
घेतली. सेक्सचा उघड आणि संकोचविरहीत स्वीकार म्हणजे स्त्री-पुरुष दोघांचाही समान
पातळीवर स्वीकार करणं असतं. पुरुषप्रधान समाजात हे शक्य नसतं. स्त्रियांवर बंधनं
लादण्यात आल्यानंतर त्यांचं एका वस्तूत रुपांतर झाल्यानंतरच्या काळातच स्त्रीच्या
योनीवरही पुरुषांनी आपला अधिकार सिद्ध केला. त्याच्याशी आपल्या सामर्थ्याच्या व
प्रतिष्ठेच्या कल्पना जोडल्या आणि त्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली. समाजानं
स्त्रीला असं कायम जखडून ठेवलं. स्त्री आणि सेक्स या दोन गोष्टी एकमेकांशीच निगडीत
आहेत अशा भ्रमात वावरणा-या पुरुषप्रधान समाजानं सेक्स आणि स्त्री या दोघांनाही
सामाजिक रचनेत खालच्या पातळीवरचं स्थान दिलं. ज्यांतून बाहेर पडणं दोघांसाठीही
नंतर अशक्यप्राय स्थिती बनली.

Comments
Post a Comment