अकबर महान, वेडा महंमद, पहिला बाजीराव आणि स्त्री सुधारणा


अकबर महान, वेडा महंमद तुघलक आणि पेशवा पहिला बाजीराव यांचा कालखंड वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाचं भारताच्या इतिसाहात एक वेगळं स्थान आहे. नोटाबंदीच्या काळात अनेकांना तुघलकाची आठवण झाली होती. कारण यानेही दिल्लीतली आपली राजधानी एके दिवशी महाराष्ट्रात आणण्याचं ठरवलं होतं औरंगाबादच्या देवगिरी किल्ल्यात. त्यानं दुसरा निर्णय घेऊन सोन्याचांदीची नाणीच रद्द केली होती. त्याच्या या दोन्ही निर्णयामागे काही एक तर्क असला आणि तो चांगला असला तरीही तो अव्यावहारीक होता आणि त्यात घाई देखिल खूप झाल्यानं त्याचे दोन्ही निर्णय फसले. त्यामुळे लोकांनी त्याला वेड्यात काढलं. पण याच तुघलकानं स्त्रियांविषयी सहानुभूतीपूर्ण कायदे तयार केले होते. अकबर हा अकबर महान म्हणून ओळखला जातो. त्यानं दिनेइलाही हा नवीन धर्म स्थापन करून त्यांत सर्वांना प्रवेश दिला आणि हा धर्म कोणालाही जाचक ठरणार नाही अशी त्याचा मांडणी केली. पण त्याचा हा प्रयत्न तत्कालीन सनातनी हिंदू व मुसलमानांनी हाणून पाडला. अकबरानंही स्त्रियांसंदर्भात उदार कायदे केले होते. त्याला पुन्हा सनातनी हिंदू व मुसलमानांनी करडा विरोध केला. अन्यथा भारतीय स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यास फार मदत झाली असती. सनातनी समाजाचा हा फटका पेशवा पहिला बाजीराव यांनाही बसला. मस्तानीपासून त्यांना झालेल्या मुलाला इथल्या ब्राह्मणांनी कधीच मान्यता दिली नाही. त्याला अक्करमाशाच ठरवलं. त्याची मूंज करण्याचंही त्यांनी नाकारलं. सबब या दोघांचा मुलगी ब्राह्मण न ठरता मुसलमान ठरला. समाज किती निष्ठूर असतो आणि त्याच्यापुढे भल्या भल्यांनाही कशी माघार घ्यावी लागते याची ही तीन उदाहरणं आहेत. खालील उता-यावरून ते अधिक स्पष्ट होईल.
भारतात स्त्रीविषयक सहानूभूतीचा विचार प्रथम वेड्या महंमद तुघलकाने केला आणि नंतर अकबराने. सतीबंदीचा कायदा केला म्हणून लॉर्ड बेंटिंकचे नाव घेतले जाते. पण बेंटिंकपूर्वी पाचशे वर्षे वेड्या महंमद तुघलकाने हिंदू स्त्रियांना सती जाण्यापूर्वी सरकारी परवानगी घेण्याची अट घातली होती. कर्दनकाळ अल्लाउद्दीन खिलजीने देखिल वेश्यानी विवाह करावा यासाठी हुकूम काढले होते. अकबराने योजलेल्या आणि प्रयत्न केलेल्या सुधारणा फारच व्यापक आणि मूलगामी होत्या. त्याच्या कायद्याची संहिता म्हणजे ऐने-अकबरी ही भारतीय स्त्रियांच्या हक्काची पहिली सनद. अकबरप्रणित स्त्रीविषयक सुधारणांमध्ये पुढील कलमें आहेत.
१-       हिंदू स्त्रीस सती जाण्यास प्रतिबंध.
२-       हिंदू स्त्रीच्या पुनर्विवाहास मान्यता.
३-       बालविवाहास बंदी – विवाहापूर्वीच्या मुलीचे वय १४ आणि मुलाचे काम १६ असावे. या वयासंबंधी कोतवालाचा शिफारसवजा दाखला मिळवला पाहिजे.
४-       विषम विवाहास बंदी – वर आणि वधू यांच्या वयात १२ वर्षांपेक्षा अधिक अंतर असू नये.
५-       वेश्या व्यवसायावर प्रतिबंध – त्यासंबंधी परवाना पद्धती, वेश्यांची वेगळी वस्ती वगैरेसंबंधी खास नियम केले होते.
अकबराच्या या स्त्रीविषयक सुधारणांमुळे हिंदू व मुसलमान स्त्रियांना पूर्वी कधीही नव्हते एवढे हक्क प्रथमच मिळणार होते. परंतु हिंदू व मुस्लिम दोन्ही सनातन्यांनी अकबराविरूद्ध एकच गहजब केला. मस्तानीपुत्र समशेरबहादूर याची मुंज व्हावी असे (पहिल्या) बाजीरावास वाटले परंतु सनातनी ब्राह्मणांनी मान्यता दिली नाही. उलट बाजीरावाचा धिक्कार केला.” (धर्म, संत व स्त्री – डॉ. शारदा देशपांडे (देशमुख) – पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन)

हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच की आज तरी ही परिस्थिती बदलावी यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. कारण कोणत्या ना कोणत्या स्वरुपात स्त्रियांवरील हा अन्याय आजही सुरूच आहे हे विसरून चालणार नाही. इतिहासापासून आपण धडा घ्यायचा असतो तो हाच की झालेल्या चुका कधीच पुन्हा करायच्या नसतात. 

Comments