सेक्स म्हणजे सामाजिक आरोग्याचा आलेख...

सेक्स ही सामाजिक परिभाषा आहे. त्याचवेळी त्याचा वैयक्तिक जीवनाशीही संबंध आहे. त्यामुळे सेक्सचा परिणाम हा जसा समाजावर होतो तसाच समाजाचाही परिणाम हा सेक्सवर होत असतो. सेक्स हा सामाजिक आरोग्याचा आलेख आहे असं गृहीत धरलं तर ही गोष्ट स्पष्ट होते. जर्मनीचे प्रख्यात विचारवंत आणि जगाला साम्यवाद देणारे क्रांतिकारी अर्थतज्ञ कार्ल मार्क्स यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, “Social progress can be measured by the social position of the female sex.” याचा अर्थ हा की कोणत्याही मानवी समाजाची प्रगती जर मोजायची असेल तर त्या समाजात स्त्री लिंगाचं स्थान कसं आहे, काय आहे, कुठे आहे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. काही अपवाद वगळता सर्व प्राणी जगतासाठी ही बाब लागू होते. अर्थात आपण इथे माणसांचा विचार करतोय म्हणून त्यांच्याविषयीच बोलूयात. तर मानवी समाजाची प्रगती ही त्या समाजात स्त्रीला काय व कसं स्थान आहे यावरून सहज कळून येतं. आता तुम्ही आपल्या आसपास एक नजर फिरवली तरीही ही गोष्ट स्पष्ट होईल की आपल्या भारतीय समाजात स्त्रीचं काय स्थान आहे? तिची स्थिती काय आहे? तर ती निश्चितच भूषणावह नाही. त्यामुळे आपला समाज खरंच प्रगत आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे सेक्स हा आपल्या सामाजिक आरोग्याचा आलेख असतो असं म्हटलं आहे. पण मी फक्त स्त्रियांचाच नाही तर पुरुषांचाही विचार करतो. कारण भारताचा विचार केला (आणि आपण भारताचाच विचार करणार आहोत) तर स्त्रियांइतकंच पुरुषांचंही स्थान हे काही फार भूषणावह आहे असं नाही. स्त्रिया जर शारिरीक गुलामगिरीत अडकलेल्या असतील तर पुरुष हे मानसिक गुलामगिरीत अडकले आहेत असं साधारणपणे म्हटलं तर ते चूकीचं ठरणार नाही. त्यामुळे या अंगानही आपल्याला सेक्सचा विचार करावा लागणार आहे.

Comments