सौदी अरब, भारत आणि मुस्लिम महिला



सौदी अरब हा मध्य पूर्वेतील एक तेलश्रीमंत इस्लामिक देश आहे. इथं इस्लामचं काटेकोर पालन होतं. त्यामुळे इथं शरीया कायदाही आहे ज्यात अजूनही शेकडो वर्षं जुन्या शिक्षा ज्या आजच्या काळात अत्यंत रानटी व अमानवी समजल्या जातात त्या दिल्या जातात. इथं पुरुष सत्ताक पद्धती आहे. या सर्वांचा अर्थ हा की इथं मुस्लिम महिलांना फार काही स्वातंत्र्य नाही. ना आर्थिक, ना राजकीय, ना सामाजिक इत्यादी. पण अलिकडेच या देशानं इथल्या महिलांना चक्क कार चालवण्याचं स्वातंत्र्य देण्याचा उदारपणा केला. हे काही त्यांनी फार आनंदानं केलं नाही हे सांगायला नको. कारण स्त्रियांनी घरात राहावं आणि पुरुषांची सेवा करावी यातच त्यांच्या जगण्याचा अर्थ आहे असं इथल्या पुरुषांचं ठाम मत आहे. इथल्या महिला मग कोणकोणत्या अत्याचारांना तोंड देत असतील ते सांगायला नको. आपल्याला कार चालवायला मिळावी ही साधी इच्छाही पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रचंड लढा द्यावा लागला. अखेरीस त्यांना हा अधिकार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांना इतर स्वातंत्र्यही लाभावं यासाठी शुभेच्छा. त्यापलिकडे तसंही काही आपण त्यांच्यासाठी करू शकत नाही. आपण ज्यांच्यासाठी करू शकतो ते म्हणजे आपल्या भारतातील मुस्लिम महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना बळ देणं. जगातील मुस्लिम राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय मुस्लिम महिलांची परिस्थिती खूप उत्तम आहे असं मी म्हणणार नाही. पण ती एकदमच वाईट आहे असंही नाही. जी एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे भारतात असल्यामुळे त्यांची सद्यस्थिती सुधारण्याची संधी इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे यात मात्र शंका नाही. वर जरी म्हटलं की भारतीय मुस्लिम स्त्रियांची परिस्थिती फार चांगली नाही तरीही त्याचा अर्थ त्या खूप वाईट परिस्थितीत आहेत असं नाही. आपल्या देशातली घटना त्यांना जगण्याचे सर्व अधिकार देते. त्यात कोणताही भेदभाव केला जात नाही. पण, मुस्लिम धर्म आणि मुस्लिम पुरुषी वर्चस्व यांच्या कचाट्यात सापडल्यामुळे मुस्लिम महिलांना भारतासारख्या उदारमतवादी देशातही अनेक अडचणी नाईलाजानं सोसाव्या लागतात. सरकार मुस्लिम धर्मांत थेट हस्तक्षेप करू शकत नाही आणि अन्य धर्मही त्यांना शहाणपणाचे चार शब्द सांगण्याच्या मनःस्थितीत नाहीत कारण ते ऐकूण घेण्याची मुस्लिम समाजाची मनःस्थिती नाही. कारणं काहीही असोत पण भारतीय मुस्लिम महिला भारतातील अन्य धर्मीय महिलांच्या तुलनेत फार मागास आहेत यात शंका नाही. तलाकच्या निमित्तानं त्यांनी एक उत्तम लढा आता पुकारला आहे. त्यामुळे अन्य प्रश्नांनाही त्यांनी वाचा फोडावी आणि भारताच्या उदार परिस्थितीचा जास्तीतजास्त लाभ करून घ्यावा. यात आपण सर्वांनीच त्यांना मदत करायला हवी. पण मुस्लिम पुरुषांनी यात सर्वांत जास्त वाटा उचलण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की ते यात मागे राहणार नाहीत. तलाकच्या लढ्यात सहभागी महिलांना त्यांच्या भावांनी, वडिलांनी आणि मित्रांनी खूप मदत केली आहे. पण हे प्रमाण अत्यल्प आहे. त्यात मोठी वाढ व्हायला हवी. ती व्हावी अशी संधी आपल्या देशांत स्वातंत्र्यापासूनच उपलब्ध होती पण धर्म आणि पुरुषी वर्चस्वाच्या पिंज-यात मुस्लिम महिलांचं स्वातंत्र्य अडकलेलं असल्यानं त्यांना कायम संघर्ष करावा लागलेला आहे. म्हणजे एकीकडे मध्यपूर्वेतील देश आहेत जिथं स्वातंत्र्य नाही म्हणून मुस्लिम महिलांना संघर्ष करावा लागतोय तर भारतात सर्वांना समान स्वातंत्र्य दिलं असतानाही त्याचा लाभ मिळत नसल्यानं इथल्या मुस्लिम महिलांना संघर्ष करावा लागतोय. हे चित्र लवकर बदलावं यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. 

Comments