Skip to main content
गौरी लंकेश आणि विचारहीन समाज
गौरी-गणपतीच्या विसर्जनापाठोपाठ कर्नाटक येथिल गौरी लंकेश
पत्रिकेच्या संपादक-पत्रकार गौरी लंकेश यांची थंड रक्तानं केलेली योजनाबद्ध हत्या
म्हणजे दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या मालिकेतलाच चौथा भाग आहे.
गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. तिचं विसर्जन म्हणजे बुद्धीचं विसर्जन. सध्या
आपल्या देशात अनेकांनी आपली बुद्धी विसर्जीत केली आहे. देव-धर्म-देश
यांच्याबद्दलच्या अतिरेकी प्रेमानं आणि फाजील अभिमानानं व्यावहारीकता, माणुसकी,
नागरीक कर्तव्ये, सुजाणता अशा अनेक गोष्टींना तिलांजली दिली आहे. जेव्हा विचारांचं
खंडन हत्येनं केलं जातं तेव्हा समाजाची अधोगती झाली आहे हे नक्की समजावं. आपल्या
देशात सध्या सगळीकडे ही अधोगती सुरू आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनं हे लज्जास्पद
वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

गौरी लंकेश या निर्भिड पत्रकार होत्या, डाव्या विचारांच्या
होत्या, नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या आग्रही होत्या, दलितांची
बाजू उचलून धरणा-या होत्या, त्या धर्मनिरपेक्ष होत्या, प्रखर बुद्धीवादी होत्या.
त्यांच्या हत्येसाठी यातलं कोणतंही एक कारण पुरेसं ठरू शकलं असतं. एक व्यक्ती
आपल्याला धोकादायक ठरते आहे हे लक्षात आल्यावर तिची हत्या करणं इतकाच या
हत्येमागचा उद्देश नाही. केवळ त्यांची हत्या करणारे लोक त्यांचे मारेकरी नाही
आहेत. संपूर्ण समाज त्यांच्या हत्येला तितकाच जबाबदार आहे जो अजूनही शांतपणे नेहमीचीच
एक घटना म्हणून या गोष्टीकडे बघतो आहे. समाज म्हणून इथल्या व्यक्तींना व्यक्तिगतरीत्या
कदाचित लंकेश माहितही नसतील पण त्यांची हत्या का झाली हे जाणून घेण्याची जर
त्यांना उत्सुकता नसेल, ते जाणून घेतल्यावर त्याचा निषेध करण्यासाठी त्यांचे हात
आणि आवाज उगारले जात नसतील तर मात्र अशा हत्या यापुढेही होतच राहतील. कारण अशा
हत्यांच्या वेळी शांत राहणं आणि त्याच्या विरोधात काहीही न करणं हे त्या हत्येचं
समर्थन करण्यासारखंच असतं. त्या दृष्टीनं इथला प्रत्येक सामान्य माणूस, प्रत्येक
समाज, या हत्यांसाठी त्या मारेक-यांइतकाच जबाबदार आहे.
लंकेश यांच्या जीवंत असण्यानं ज्यांना त्रास होत होता
त्यांनीच त्यांची हत्या केली यात शंका नाही. त्यांच्या हत्येनं ज्यांचे राजकीय
हेतू साध्य होणार आहेत तेच या हत्येमागे आहेत हे उघड आहे. फक्त ते कधीच उजेडात
येणार नाहीत. कारण ही प्रवृत्ती आहे जी लोकांच्या मनात खोलवर दडलेली असते. तिचा
उघडपणे कोणीच उल्लेख करणार नाहीत पण आपल्यालाच त्याचा सावधपणे अंदाज घेणं गरजेचं
झालं आहे. कोणी जर असं समजत असेल की एका हत्येनं असं काय होणार आहे किंवा लोक मरतच
असतात तर तो त्यांचा गैरसमज आहे. ही हत्या केवळ माणसाची नाही तर एका विचाराची आहे.
तो विचार जो लोकांना त्यांच्या जाणीवा जागृत ठेवण्यासाठी आवाज उठवत होता, माणसांना
त्यांच्या हक्काची माहिती व्हावी म्हणून लढत होता. अशी माणसं जेव्हा जातात तेव्हा
एक संपूर्ण चळवळ नाहीशी होत असते. यात त्या व्यक्तिपेक्षा समाजाचं नुकसान होत असतं.
कारण जेव्हा संपूर्ण समाजच गुलामगिरीत अडकला जातो तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी असा
कोणताही विचारवंत जीवंत नसतो.
गौरी लंकेश यांच्या हत्येनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की
आपल्या देशांत सध्या अराजक आहे. या अराजकाला देशभक्तिचं नाव दिलं जात आहे. या
अराजकाला धर्मभक्तिचं नाव दिलं जात आहे. त्यामुळे या विरोधात बोलू पाहणा-या
कोणालाही सहजपणे देशद्रोही आणि धर्मद्रोही असं नाव देऊन त्याला संपवण्याचा घाट
घातला जातो आणि मग एक दिवस कोणीतरी शांतपणे त्याची हत्या करून निघून जातो. ही
अचानक घटणारी गोष्ट नाही. त्यामागे एक नियोजन आहे. हे नियोजन जे कोणी करत असतील ते
कधीच पुढे येणार नाहीत पण त्यांच्यामुळे ज्यांना लाभ व्हायचा आहे तो होणारच आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करणं सोपं आहे. पण त्यांचा
लढा आपण आपल्या पातळीवर पुढे चालवणं अवघड आहे. आपल्यातील प्रत्येकाला ते करावं
लागणार आहे. तरंच या देशात विचारांची मुस्कटदाबी होणं बंद होईल. अन्यथा अशा हत्या
घडत राहतील आणि मग संपूर्ण समाज, देश हा एका मानसिक गुलामगिरीत आणि अनाकलनिय भयात
जखडला जाईल. विचार हे प्रत्येकालाच असतात. स्वाभिमान हा प्रत्येकालाच असतो. आणि
आपल्या विचारांसाठी, स्वाभिमानासाठी लढण्याची वेळ प्रत्येकावर येतच असते. आपण जर
इतरांना त्यांच्या लढ्यात मदत केली नाही तर मग आपल्या लढ्यांत आपण एकटेच राहू. हेच
या असत्य शक्तिंना हवं आहे. हे होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला आता शांत बसून चालणार
नाही. जमेल तिथं जमेल त्या प्रत्येक मार्गानं अशा अन्यायाचा, अत्याचाराचा, विरोध
करण्यासाठी आपण सज्ज व्हायलं हवं.
Comments
Post a Comment