सेक्स म्हणजे सत्ता...

सेक्स या शब्दांचे अनेक अर्थ व व्याख्या आहेत. त्यांतली सर्वांत प्रबळ व्याख्या ऑस्कर वाईल्ड या अत्यंत प्रतिभावंत, काळाच्या पुढे असलेल्या लेखकानं मांडली आहे. तो म्हणतो की, “Everything in the world is about sex except sex. Sex is about power.”  सेक्सविषयी इतका स्पष्ट विचार दुसरा कोणताही नाही. सेक्स म्हणजे सत्ता. अनिर्बंध सत्ता. सेक्सचा उपयोग सत्तेसाठीच करण्यात आलेला आहे. पण या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजणार नाही जर तुम्ही सेक्सचा संकुचित अर्थ तेवढा मनात ठेवला असेल. मी आधी सांगितल्याप्रमाणे सेक्स हा समग्र मानवी जीवनालाच वेढून असतो. तो अर्थ लक्षात ठेवला तर वाईल्ड काय म्हणतो त्याचा अर्थ समजेल. मग लक्षात येईल की सेक्स म्हणजे सत्ता याचा अर्थ एका लिंगाच्या समुहानं दुस-या कमकुवत लिंगाच्या समुहावर केलेलं राज्य. याचा ढोबळ अर्थ म्हणजे पुरुषांनी स्त्रियांवर गाजवलेली सत्ता. पण एकेकाळी जगात स्त्रियांचंही वर्चस्व होतं हे विसरून चालणार नाही. आजही काही ठिकाणी ते आहेच. समाजात नसेल तरी वैयक्तिक पातळीवर, कुटुंबात ते दिसून येतं. सेक्स म्हणजे सत्ता याचा दुसरा अर्थ म्हणजे एका बलवान लिंगानं अन्य सर्वांवर गाजवलेलं अधिराज्य. मग यात पुरुषानं स्त्रियांवरच नाही तर पुरुषांवर गाजवलेला अधिकारही येतो. स्त्रियांनी पुरुषांवरच नाही तर स्त्रियांवर गाजवलेली सत्ताही याचाच भाग आहे. आपलं पौरुष्य किंवा आपलं स्त्रीत्व पणाला लावून जेव्हा कोणी इतरांपेक्षा वरचढ होऊ पाहतो तेव्हा सेक्स म्हणजे सत्ता याचं उदाहरण लागू होतं. याशिवाय लैंगिक अत्याचार जे घडतात त्यालाही ही सत्ताप्रवृत्तीच कारणीभूत असते. वाईल्ड म्हणतो तसं सारं जग सेक्सशी संबंधीत आहे फक्त सेक्स वगळून. कारण कधीकधी सेक्समध्ये सेक्स ही कृती केलीच जात नाही. तिथं असतो फक्त आपली सत्ता इतर कोणावर थोपवण्याचा आग्रह आणि हट्ट. तिथं मग सेक्स प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापरला जातो.
 

Comments