सेक्स आणि भारतीय संस्कृती यांचा फार जवळून संबंध आहे. आज जरी भारतात
काही सनातली प्रवृत्ती सेक्स आणि संबंधीत गोष्टींना धर्महीन, संस्कृतीहीन, समाजहीन
मानत असल्या आणि त्यावरून इथं सांस्कृतिक पोलिसिंग जरी सुरू असलं तरीही भारत हा
पूर्वीपासून एक अत्यंत मोकळ्या वृत्तीचा देश राहिला आहे. सेक्स हा भारतीय
संस्कृतीचा एक अविभाज्य घटक होता. त्याला एक महत्त्वाचं स्थान होतं. कला, शिल्प,
लेखन, काव्य, नृत्य, अशा अनेक क्षेत्रांत सेक्सचा विषय गांभीर्यानं अभ्यासला
जायचा. भारतीयांच्या दृष्टीनं काम (सेक्स) आणि ऋंगार या दोन गोष्टी जगण्याचा
प्रमुख आधार होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांमध्ये सेक्सचा
समावेश होता. काम हे एक शास्त्र होतं आणि त्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथ
लिहिण्यात आले आहेत. तत्कालिन लोकांनी, ऋषीमुनींनी काम भावनेला झिडकारलं नव्हतं तर
त्याचा अत्यंत मोकळ्या वृत्तीनं स्वीकार केला होता. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही
याविषयी बोलण्याचा समान अधिकार होता. एक मोकळी पण स्वैराचार नसलेली जबाबदारीची
जाणीव असणारी काम संस्कृती या देशानं पाहिली आहे, अनुभवली आहे. कालिदासांसारख्या
अनेक नाटककारांनी त्यांच्या नाटकांमधून ऋंगाराची महती गायली आहे. खजुराहोसारख्या
शेकडो मंदिरांमधून कामाची दूर्लभ शिल्पं उभारली गेली आहेत. गाथा सप्तशती सारख्या
काव्यांमधून यावर अनेक काव्यं रचण्यात आली आहेत. कामाविषयी तत्कालीन भारतीय
समाजाला कधीच असूया नव्हती, घृणा नव्हती तर आदर होता आणि कामाचं जीवनातलं महत्त्व
त्यांना पटलेलं होतं. आज ज्या गोष्टींवर गोंधळ घातला जातो अशा अनेक काम संबंधित
गोष्टी त्या काळी समाजमान्य रिती होत्या. ही उदार कामसंस्कृती जपणारा भारत
काळाच्या ओघात अत्यंत कठोर बनत गेला. त्याचं आता जवळपास विकृतीत रुपांतर झालं आहे.
सेक्स हा शब्द देखिल आपल्याला आता उच्चारावसा वाटत नाही किंवा त्याची भिती वाटते
अशी आजची परिस्थिती आहे. त्याचे किती भयानक परिणाम आपल्या शेकडो पिढ्यांवर झाले
असतील याची कल्पना करना केवळ अशक्य आहे. आधी काय होतं यापेक्षा आज काय आहे यावर
आपल्याला विचार करायचा आहे. आजची भारतीय काम संस्कृती ही अनुदार, गैरसमजूतींनी
भरलेली आणि जबाबदारीची जाण नसलेली आहे. त्याचा फटका आपल्या सर्वांनाच बसत आहे. यात
सुधारणा करण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी आपण बोलणार आहोत.

Comments
Post a Comment