ही कसली स्त्री-मुक्ती?

समानतेच्या नावाखाली पुरुषांचे अधिकार आपल्यालाही मिळावेत म्हणून काही स्त्री संघटनांनी मंदिर प्रवेशासाठी लढा दिला. शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा यासाठीचं प्रकरण तर न्यायालयातही गेलं आणि न्यायालयानं शेवटी मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश आहे असा निकाल दिला. प्रत्यक्षात त्याचं पालन कितपत होईल हा कळीचा मुद्दा आहे कारण बहुतेक सारीच मंदिरं ही पुरुषांच्या ताब्यात आहेत, देवींची मंदिरंही, आणि तिथं आपल्या मर्जीनुसारच ते कारभार हाकत असतात आणि त्यापुढे सारे तथाकथित भाविक निर्बुद्धपणे डोकं वाकवतात. समानतेच्या नावाखाली पुण्यातील दगडू शेठ मंदिरात गणेशोत्सवाच्या काळात हजारो स्त्रिया एकत्र येऊन अथर्वशीर्षाचं पठण करतात. सोबतच ती-चा गणपती म्हणून नवं फॅड आता सुरू झालं आहे ज्याला बायकांचा प्रतिसाद लाभतो आहे. हे सारं स्त्री समानतेच्या दृष्टीनं घडतंय असंही बोंब ठोकून सांगितलं जातं.

मूळात प्रश्न असा आहे की जिथं स्त्रियांना आजवर प्रवेशबंदी होती, आजही आहे, तिथं जाण्याची इच्छा त्या धरतातच कशाला? असं करून आपण पुन्हा एकदा एका गुलामगिरीतच स्वतःला जखडून घेतोय हे त्यांच्या लक्षात कसं येत नाही? पुरुषांनी त्यांना या मंदिरांपासून दूर ठेवून त्यांच्यावर खरं तर नकळत खूप उपकार केले आहेत, कारण देवाधर्माच्या जोखडात त्यांच्यासारखं अडकून पडण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवत नाही. आणि आता तेच त्यासाठी आंदोलनं करत आहेत आणि ही समानता आहे असं सांगत आहेत हा विलक्षण हास्यास्पद प्रकार आहे. अथर्वशीर्षाच्या पठणासाठी हजारोंनी गोळा होणा-या स्त्रीयांमध्ये कोणत्या जातीच्या बायका जमा होतात याचाही एकदा विचार व्हायला हवा. ही एवढी ऊर्जा एखाद्या चांगल्या सामाजिक कामासाठी खर्च करण्याऐवजी मंत्रपठणात वाया घालवून त्यांचं काय भलं होणार आहे?


Image result for मंदिर प्रवेश स्त्रीया

स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांना ज्या सुविधा आहेत त्या त्या सर्व घेणे, आपल्याला जिथं बंदी आहे, तिथं जाण्याचा हट्ट धरणे असा काहीसा चुकीचा काढला जात आहे. पुरुषांचं अनुकरण करून स्त्रिया स्वतंत्र होणार नाहीत की त्यांची मुक्तीही. ती अखेर गुलामगिरीच ठरेल. पुरुषांच्याच चुकांचं घोडं पुढं दामटवण्यात काहीही शौर्य नाही. देवा-धर्माचा आधार घेऊनच या पुरुषांनी आजवर स्त्रियांचा वाट्टेल तसा छळ केला त्याच देवा-धर्माच्या जोखडात स्वतःहून आपली मान अडकवून घेण्याची हौस हा काही स्त्रीमुक्तीचा मार्ग असू शकत नाही. मंदिरात प्रवेश मिळाला म्हणून त्यांच्या आयुष्यातले अन्याय अत्याचार संपणार नाहीत. कारण ते व्यावहारीक आहेत आणि त्याला पुरुषच जबाबदार नाहीत तर स्त्रियाही जबाबदार आहेत ज्या अशा चुकीच्या समानतेसाठी लढे देत आहेत. स्वतःचं सत्व आणि बुद्धी गहाण ठेवून केले जाणारे हे समानतेचे लढे भारतीय स्त्रियांना प्रगतीपथावर नाहीतर अधोगतीलाच नेण्याची दाट शक्यता आहे. यांतून ते वेळीच सावध झाले नाहीत तर पुरुषही त्यांना अशा आंदोलनात पाठींबा देऊन पुन्हा एकदा स्वतःच्या टाचेखाली चिरडून टाकतील. केवळ शिक्षण आणि स्वतंत्र विचारसरणी हाच स्त्रीमुक्तीचा मार्ग असू शकतो, मंदिर प्रवेश नाही. 

Comments