डॉ. राजलक्ष्मी या
बेंगळूरू येथे राहतात. त्या डेंटिस्ट आहेत. डेंटल सर्जरीचा अभ्यासक्रम त्यांनी
सुवर्ण पदक जिंकून पूर्ण केला. याशिवाय इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, योग,
गाणं, पोहोणं यांची त्यांना आवड आहे. त्या एका स्थानिक दंत महाविद्यालयात अर्धवेळ
शिकवण्याचं कामही करतात. त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे. ११ देश त्या फिरल्या आहेत.
राजलक्ष्मी यांनी हे जे काही केलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे पण म्हणूनच त्या
माझ्या हिरो आहेत असं नाही. हे सर्व त्यांनी केलं त्या कायम व्हिलचेअरवर असताना.
राजलक्ष्मी यांचा वयाच्या २१ व्या वर्षीच एक भीषण अपघात झाला होता. त्यांतून
त्यांचा जीव वाचला पण त्यांच्या पाठीचा मणका दुखावल्या गेल्यामुळे त्यांना
त्यानंतर व्हिलचेअरवर जगणं भाग पडलं. पण या बदललेल्या परिस्थितीचा त्यांनी धसका घेतला
नाही. उलट वर त्यांचं जे कर्तृत्व सांगितलेलं आहे ते सारं त्यांनी या अपघातानंतरच
अचिव्ह केलं. अपंगत्व हे केवळ शारिरीक नसतं तर ते मानसिकही असतं. हे मानसिक
अपंगत्व खूप भयानक असतं. धडधाकट शरीराची माणसंही त्यामुळे बेकार होऊन जातात. पण
राजलक्ष्मी यांनी मात्र स्वतःला अपघात होऊनही हे अपंगत्व येऊ दिलेलं नाही. हा
त्यांचा मोठेपणा आहे. म्हणून त्या माझ्या हिरो आहेत.
या अपघातानंतर
त्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. एक आव्हान आणि एक संधी म्हणून
त्यांनी या नव्या जगण्याकडे पाहिलं आणि त्यात यशही मिळवलं. त्यांनी एस. जे.
फाउंडेशन नावाची एक संस्था सुरू केली आहे ज्याच्या माध्यमातून त्या दिव्यांग
व्यक्तिंसाठी कार्य करत असतात. त्यांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या समान संधी
मिळाव्यात म्हणून त्या लढा देत आहेत. कारण स्वतः त्यांनी हे सारं भोगलेलं आहे.
डेंटल सर्जरीचा अभ्यासक्रम सुवर्ण पदक जिंकून पूर्ण केल्यानंतरही त्यांना नोकरी
नाकारण्यात आली होती हा अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला. ही वेळ इतरांवर येऊ
नये यासाठी ते जागरूक असतात.
त्यांचा आणखी एक
विशेष म्हणजे त्यांनी २०१४ सालची मिस व्हिलचेअर इंडिया स्पर्धा जिकंली होती. आता
जागतिक मिस व्हिलचेअर स्पर्धेत त्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. ही आपल्या
सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. आयुष्याचा जसा आहे तसा स्वीकार करून त्यातच
आपल्याला जास्तीतजास्त चांगलं कसं जगता येईल याचा वेगवेगळ्या अंगानं विचार करायला
हवा असं त्यांचं म्हणनं आहे. त्यांच्या या जिद्दीला, अभिमानी आयुष्याला सलाम!

Comments
Post a Comment