मुलींनी भांडायचं
नसतं किंवा काय गं मुलांसारखं कशाला भांडताय, असली वाक्यं आपल्या आसपास तुम्ही
अनेकदा ऐकली असतील. मुलींना अगदी त्या लहान असल्यापासून, हे करू नको, ते करू नको,
हे तुला शोभत नाही, ते तुला जमणार नाही, ते मुलांचं काम आहे, तू मुलगी आहेस तुला करता
येणार नाही, अशी असंख्य वाक्यं ऐकवली जातात. त्यांना समर्थ बनवण्याऐवजी, त्यांना
काहीतरी बनण्याची प्रेरणा देण्याऐवजी सतत त्यांना त्या मुली आहेत त्यामुळे त्या
कमकुवत आहेत, मुलांपेक्षा कमी आहेत, अशक्त आहेत, अनेक गोष्टी करणं त्यांना जमणार
नाही अशी जाणीवच सारे करून देत असतात. संघर्ष करू नका हाच या सर्व बोलण्याचा अर्थ
असतो. संघर्ष मग तो कोणत्याही स्वरुपातला असा, तो करू नका, टाळा, मुकाटपणे मान
खाली घालून तिथून निघून जा, किंवा सहन करा पण उलट उत्तर देऊ नका, हेच शिकवलं जातं
मुलींना. मुलीही तेच ऐकत वाढतात आणि मग कायम इतरांवर अवलंबून राहतात. घरी भावावर,
वडीलांवर आणि मग बाहेर मित्रांवर, लग्न झाल्यानंतर नव-यावर. कारण त्यांना
सांगितलेलं असतं की मुली भांडत नाहीत. गर्ल्स डोन्ट फाईट.
भारतीय मुलींच्या या
मानसिकतेवर एक उत्तम जाहिरात बनवली आहे रीबॉक कंपनीनं. त्यात कंगना रनावत काम करत
आहे. कंगना ही सध्याच्या काळातील अत्यंत सशक्त स्त्रीवादी भूमिका मांडणारी व्यक्ति
आहे. अभिनेत्री असण्याशिवाय तिचं हे सशक्त स्त्रीचं रुप मला जास्त भावतं. त्यामुळे
या जाहिरातीसाठी ती अत्यंत चपखल व्यक्ति होती. ही जाहिरात आहे गर्ल्स डोन्ट
फाईट. होय, यातल्या डोन्ट या शब्दावर काट मारला आहे कारण आजची मुलगी फाईट करणारी
आहे. अनेक मुलींनी ते सिद्ध करून दाखवलं आहे. साईना नेहवाल, सानिया मिर्झा, दिपिका
पडुकोणे, कंगना रनावत, पी. व्ही. सिंधू, स्वाती महाडिक, साक्षी मलिक आणि अशा
असंख्य मुली आज हे सांगत आहेत की त्या पुरुषांपेक्षा कोणत्याही बाबतीत मागे नाहीत.
त्या मुली असतील पण त्या संघर्ष करणा-या आहेत. त्यांचं स्त्रीत्व कोणत्याही कसोटीवर
उणं पडत नाही. त्या फाईट करतात परिस्थितीशी आणि जिंकतात.
ही जाहिरात आहे एका
मुलीची. जी बॉक्सर आहे. सराव करून घरी परत असताना काही मुलं तिची कायम छेड काढतात
आणि दरवेळी ती मान खाली घालून निमुटपणे निघून जाते. कारण तिला लहानपणापासून
शिकवलेलं असतं, मुलांसमोर तोंड वर करायचं नाही, त्यांनी छेड काढली तर काही बोलायचं
नाही, निघून जायचं. बॉक्सर असूनही त्या मुलीच्या मनातली ही शिकवण तिला काहीही करू
देत नाही. कारण तिला सतत सांगितलेलं असतं, गर्ल्स डोन्ट फाईट. कंगना तिला सांगते
की मुली फाईट करू शकतात. आणि आजवर जर ती केली नसेल तर ती करण्याचं हेच एक कारण
आहे. गर्ल्स फाईट. ती बॉक्सर मुलगी पुढच्या वेळेस तिची छेड काढणा-यांचा
आत्मविश्वासानं सामना करते. ही जाहिरात खूप काही सांगून जाते आपल्या मुलींविषयी. आणि
आपल्या मुलांविषयीही. मुलींना जसं ती फाईट करायला सांगते तसंच ती मुलांनाही सांगते
की त्यांनी छेड काढण्याऐवजी जरा चांगल्या कामात आपली उर्जा खर्च करावी. मी या
जाहिरातीविषयी, त्यातल्या विषयाविषयी यापेक्षा जास्त काही सांगणार नाही. तुम्हीच
ती पहा आणि काय करायचं ते ठरवा.

Comments
Post a Comment