सेक्स ही मानवी जीवनाची एक परिभाषा
मानली जाऊ शकते इतका महत्त्वाचा हा घटक आहे. मानवी जन्मापासून तो मरेपर्यंतचा
संपूर्ण काळ सेक्सच्या अवती भवती फिरत असतो. आपल्या जन्माला सेक्स कारणीभूत आहे.
आपल्या वाढीला सेक्स कारणीभूत आहे. आपल्या महत्त्वाकांक्षांना सेक्समुळे प्रेरणा
मिळते. आपल्या प्रगतीला सेक्स प्रेरणा देतो. आपलं नाव, आपला वंश पुढे चालू राहावा
यासाठी सेक्स मदत करतो. मानवी समाजाची प्रत्येक कृती ही कमीजास्त प्रमाणात सेक्सशी
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेली असते. सेक्सची एक व्यापक व्याख्या केली तर
असं म्हणता येईल की जगण्याच्या प्रेरणा देणारी व त्यासाठी आपल्याकडून योग्य ती
कृती करवून घेणारी ही एक वैश्विक ऊर्जा आहे. सेक्स म्हणजे केवळ लिंग नसून तो एक
विचार आहे व प्रत्येक स्वतंत्र माणसाला तो असतो आणि त्यांतून तो आपलं आयुष्य
घडवण्याचा प्रयत्न करतो. सेक्स म्हणजे मी कोण आहे याचा शोध घेण्याचं एक साधनही
आहे. सेक्स म्हणजे माझ्या समाजाला, माझ्या वातावरणाला मी दिलेला एक प्रतिसाद असतो.
सेक्स म्हणजे मला पुढे काय व्हायचं आहे हे ठरवण्याचं एक माध्यम असतं. सेक्स म्हणजे
मी स्वतःच्या लिंगाचा कसा स्वीकार करतो आणि अन्य भिन्न लिंगी व्यक्तिंना कसा
प्रतिसाद देतो याचा जमा-खर्च असतो. सेक्स म्हणजे आपण सारे एकमेकांशी जगताना कसे
वागतो, एक व्यक्ति म्हणून कसे वागतो, एक समाज म्हणून कसे वागतो या सर्वांची एक
गोळाबेरीज असते. या सर्वांमध्ये जर काही गफलत झाली, गैरसमज झाले, तर त्याचे परिणाम
आपल्यासहीत इतर अनेकांना भोगावे लागतात. त्यामुळे सेक्सविषयी गांभीर्यानं
बोलण्याची, समंजसपणे बघण्याची गरज आहे.
Comments
Post a Comment