आपण सेक्सविषयी बोलायचं ठरवलं आहे.
सेक्स म्हटलं की आपल्या सर्वांपुढे एकच अर्थ असतो. तो कोणता ते सांगण्याची गरज
नाही. पण सेक्स (sex) या इंग्रजी शब्दाचा फक्त तोच एक अर्थ
नाही. सेक्स हा व्यापक अर्थानं वापरला जाणारा एक शब्द किंवा खरं तर अनेक अर्थांचा
व व्याख्यांचा एक सर्वसमावेशक असा समूह आहे. यातला अगदी आदीम अर्थ आहे लिंग.
कोणताही सजीव कोणत्या ना कोणत्या लिंगाखाली जन्माला येतो. आपल्याला प्रामुख्यानं
स्त्री आणि पुरुष या दोन लिंगांचा परिचय असतो. तो सार्वत्रिक आहे. पण याशिवाय
तृतियलिंगी असलेली माणसंही आहेत. काही ठिकाणी पुरुषाच्या देहात स्त्रीचं मन असतं
तर काही ठिकाणी स्त्री देहांत पुरुषाचं मन असतं. आपण तिथं त्यांच्या शारिरीक
लिंगापेक्षा त्यांच्या मानसिक लिंगालाच महत्त्व व मुख्य म्हणजे मान द्यायला हवा
आणि त्यांचा आदर करायला हवा. याविषयी नंतर ओघात आपण अधिक बोलणारच आहोत. मानवी जगात
सहसा लिंगांचा यापेक्षा जास्त गोंधळ उडत नाही. पण प्राणी जगात एक लिंगी,
द्वीलिंगी, बहुलिंगी आणि अलिंगी प्राणीही आढळून येतात. अर्थात इथे आपण फक्त
माणसांविषयी बोलणार आहोत कारण माणसांनाच सेक्सचा नको तितका त्रास होत असतो आणि
हव्यासही असतो. प्राणी काही त्यावर फार चर्चा करत नाहीत. तर आधी म्हटल्याप्रमाणे
सेक्स म्हणजे सेक्स ही कृती नव्हे तर ती एक सामाजिक परिभाषा आहे. त्यामुळे सेक्स
हा फक्त सेक्सपुरता मर्यादित नसतो. मानवी इतिहासात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे.
Comments
Post a Comment