मानवी समाज ज्यामुळे अस्तित्वात आला आहे किंबहुना
ही समस्त सृष्टी ज्यामुळे अस्तित्त्वात आली आहे आणि यापुढेही तिचं सातत्य टिकून
आहे आणि हे सारं ज्या एका प्रक्रियेमुळे शक्य झालं आहे त्या मूळ मानवी आदीम
प्रवृत्तीचा आपण या आणि यापुढच्या लेखांतून धांडोळा घेणार आहोत. ही प्रक्रिया आहे
प्रजोत्पादनाची ज्याला कारणीभूत असतो आपला लैंगिक व्यवहार. थोडक्यात सांगायचं तर
आपण सेक्सविषयी बोलणार आहोत. सेक्स हा शब्द उच्चारताच अंगावर झुरळ पडल्यासारखे
हावभाव अनेक जण करतात. काही संकोचतात, काही चिडतात, काही रागावतात, काही आनंदतात,
काही शहारतात, काही बहरतात पण आंतून असो वा बाहेरून या सेक्सकडे दूर्लक्ष मात्र
कोणीच करत नाही, करू शकत नाही. तर या सेक्सविषयी आणि त्याच्याशी संबंधीत अनेक
गोष्टींविषयी ज्यामुळे आपलं वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजनैतिक,
ऐतिहासिक, भौगोलिक जगणं ‘पछाडलेलं’ आहे त्या सेक्सविषयी आपण मतं मांडणार आहोत,
एकमेकांना सांगणार आहोत. पण हे सारं करण्याआधी सेक्स या शब्दाविषयीची भीती,
न्यूनगंड, लज्जा, संकोच, राग, समज, गैरसमज हे सारे सारे दूर व्हावेत आणि अगदी
सहजपणे त्याविषयी विचार करता यावा यासाठी तुम्ही एक कृती करायची आहे.
ही कृती म्हणजे एक प्रकारचा शाब्दीक वाचीक
व्यायाम असणार आहे. यातली पहिली कृती म्हणजे तुम्ही कागदावर किंवा संगणक वापरत
असाल तर नव्या वर्ड फाईलवर इंग्रजीतून किंवा मराठीतून सेक्स हा शब्द किमान हजार
वेळा लिहायचा आहे. मग आणखी हजारदा तो लिहायचा आहे. मग उघडपणे सेक्स सेक्स असा जप
किमान हजार वेळा तरी करायचा आहे. आधी मनात सेक्स सेक्स म्हणायचं मग उघडपणे पण
एकांतात त्याचा उच्चार करायचा. मग लोकांसमोर म्हणजे आपल्या मित्रांसमोर सेक्सचा
उच्चार करायचा. मग एखाद्या मोकळ्या एकांत जागी जाऊन सेक्स सेक्स असं खच्चून
ओरडायचं. त्यानंतर इतर कोणत्याही शब्दांच्या जोडीला मध्येच सेक्स शब्द घालून ते
शब्द म्हणत राहायचे. उदा. मेदूवडा, पॅटीस, जिलेबी, सेक्स, कांदापोहे, भाकर, डोसा,
सेक्स, चहा, पाणी, सेक्स, लसून, आंबे, मधमाशी, सेक्स असं किंवा सॉक्रेटीस, होमर,
सेक्स, हेलेन, कुंदेरा, सेक्स, जॉयसी, काईमुरा, सेक्स असं. शब्द कोणते निवडायचे ते
तुमचे तुम्ही ठरवा. पण त्यात सेक्स हा शब्द आलाच पाहिजे. आता यांतील किती गोष्टी
तुम्ही कराल याविषयी शंकाच आहे पण तुम्ही काहीतरी नक्कीच कराल हे मात्र नक्की.
आणखी काही नाही तर गंमत म्हणून तरी तुम्ही एकदा करून पहाल. त्यालाही हरकत नाही. ही
गंमतच आहे पण आपण या गंमतीला ओंगळवाणं रुप दिलं आहे. Sex is the most
original, natural, beautiful and very necessary thing of life but we human have
made it ugly, we have criminalized it and we have poisoned it! त्याचा परिणाम आपल्या सर्व आयुष्यावर
होतोय पण त्याकडे कोणाचंच लक्ष नाही. सेक्सविषयी आपल्यांत इतकं अज्ञान आहे की त्या
अज्ञानापायी आपण जीवनाच्या मौलिक ज्ञानापासून दूरावले जातोय याचंही कोणाला भान
उरलेलं नाही.
सेक्स या शब्दाचा इतका बाऊ करायची काय गरज आहे
जेव्हा आपल्या सर्वांना हे माहित आहे की त्यामुळेच आपलं अस्तित्व आहे. पण तरीही
कधी धर्माच्या नावाखाली तर कधी समाज, संस्कृती यांच्या नावाखाली सेक्सचा आणि
परिणामी लोकांचाही गळा घोटण्यात आलाय. एकेकाळी आपल्या इथं अत्यंत निरोगी अशी
कामसंस्कृती फुलली होती. काम हा भारतीय हिंदू परंपरेतील चार मुख्य धर्म, अर्थ, काम
व मोक्ष या पुरुषार्थांपैकी एक मानला गेला होता याचा आपल्याला विसर पडला आहे.
स्त्री-पुरुष यांच्यामध्ये कमालीची बंधनं आली आहेत, प्रचंड गैरसमज वाढले आहेत आणि
एकमेकांचा अनादर करण्याकडे किंवा दूर्लक्ष करण्याकडेच आपलं सारं लक्ष असतं. निरोगी
सेक्सच्या अभावी लाखो आयुष्यांची राखरांगोळी होत आहे. अत्यंत घृणास्पद अपराध घडले
जात आहेत. अगणिक विकृती घेऊन आपण सारे एका अनामिक भयानक भीतीखाली जगतो आहोत. त्यात
आता भर पडली आहे ती सध्या धार्मिक संस्कृती रक्षकांची. सेक्स म्हणजे जे जे काही
गलिच्छ आहे, अमंगल आहे, अपवित्र आहे, अक्षम्य आहे ते ते सारं सेक्स आहे अशी यांची
ठाम समजूत आहे. त्याचा अतिरेकापायी त्यांनी प्रेमालाही आता त्याच वर्गात आणून
सोडलं आहे. ती वेळ दूर नाही जेव्हा सेक्स प्रमाणेच प्रेम हा शब्द उच्चारण्यावरही
अलिखित बंदी घालण्यात येईल.
ही बंदी ज्यांना अमान्य आहे त्यांच्यासाठी हे लेख
आहेत. जे सुंदर आयुष्य जगण्याची मनीषा धरून आहेत त्यांच्यासाठी हे लिखाण आहे.
सेक्स म्हणजे घाण, सेक्स म्हणजे भीती, सेक्स म्हणजे चिंता, सेक्स म्हणजे लाज,
सेक्स म्हणजे वेळेचा अपव्यय (हो. असंही वाटणारे लोक आहेत या जगात!), सेक्स म्हणजे
फालतूपणा, सेक्स म्हणजे धर्मद्रोह, सेक्स म्हणजे अनादर, सेक्स म्हणजे
संस्कृती-विध्वंस, सेक्स म्हणजे अगतिकता, सेक्स म्हणजे मूर्खपणा, सेक्स म्हणजे
अविचार, असं आणि असं जे काही ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनीही हे लेख नक्की
वाचावेत. सेक्सविषयी बोलण्याआधी, काही सांगण्याआधी, सेक्स या शब्दाविषयीची भीती
मनातून काढून टाका. सेक्सविषयीचा संकोच दूर करा. जितक्या सहजतेने तुम्ही
राजकारणावर तावातावानं चर्चा करता, जितक्या उदारपणे तुम्ही अमेरिका-रशिया-चीनच्या
राष्ट्राध्यक्षांना जागतिक शांततेबाबत सल्ले देता, जितक्या आपलुकीनं तुम्ही
क्रिकेटविषयी बोलता, जितक्या प्रेमानं तुम्ही विठ्ठलाचा जयजयकार करता, जितक्या
मोकळेपणानं तुम्ही तुमच्या बॉसला आणि शेजा-याला शिव्या घालता, तितक्यात
स्वाभाविकतेनं सेक्सविषयी आपल्याला बोलायचं आहे. पुरुषांनीच नाही तर स्त्रीयांनीही
बोलायचं आहे. मुलींनी आणि मुलांनीही बोलायचं आहे. तरुणांनी आणि वृद्धांनीही
बोलायचं आहे. सेक्स हा केवळ आंबटपणे चघळण्याचा विषय नाही. भारतीय संस्कृतीत
त्याला एका पुरुषार्थ मानला जातो. तसाच तो आता स्त्रीर्थही मानला जायला हवा.
सेक्स या शब्दांमध्ये अनेक विषय आहेत. सेक्सविषयी
अनेक अंगानं सांगता येण्यासारखं आहे. आणि आपण त्या सर्वांचा जमेल तितका अभ्यास
करणार आहोत. हा अतिशय गंभीर विषय आहे याचं भान मात्र विसरू नका. त्यामुळे यावर
तुमच्याकडूनही उत्स्फूर्त, अभ्यासू, मोकळी प्रतिक्रिया अपेक्षित आहे. या डोळ्यांनी
वाचायचं आणि त्या डोळ्यांनी नजरेआड करायचं असं इथं करू नका. याची चेष्टा टर टिंगल
टवाळीही करू नका. ती सोपी असते. कठीण आहे ते याविषयी तोल जाऊ न देता सांगणं आणि
ऐकणंही. पण आपण सारेच आता प्रगल्भ आहोत असं गृहीत धरून या सेक्सच्या प्रांतात आपण
शिरणार आहोत. तेव्हा पुढचा लेख येईपर्यंत तुम्हाला दिलेला गृहपाठ न चूकता करा.
Comments
Post a Comment