Skip to main content
२०१५ मध्ये सातारा जिल्ह्यातील संतोष महाडिक यांचा सीमेवर
दहशतवाद्यांशी लढताना मृत्यु झाला होता. त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी
आणल्यानंतर गावानं शोक व्यक्त केला. महाडिक यांच्या घरच्यांनाही दुःख अनावर झालं
होतं. पण या कठीण प्रसंगातही महाडिक यांच्या पत्नी स्वाती यांनी मात्र
धिरोदात्तपणे आपल्या पतीप्रमाणेच सैन्यात जायचा निर्धार प्रकट केला होता.
भावनेच्या भरात सामान्य लोक अनेकदा बरंच काही बोलून जातात आणि नंतर विसरतात. लोकही
त्यांना त्याबद्दल काही बोलत नाहीत. कारण लोकही तसेच वागत असतात. पण स्वाती या
काही सामान्य नव्हत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पतीच्या चितेवर जे वचन
घेतलं होतं ते वचन त्यांनी अथक मेहनतीनं आता पूर्ण केलं आहे.

वयाचा अडसर लष्करानं त्यांची इच्छाशक्ति पाहून दूर केला आणि
त्यांच्या लष्कर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. चेन्नई येथिल लष्करी अकादमीत
आपल्यापेक्षा दहा वर्षं लहान असलेल्या विद्यार्थ्यांसोबत खडतर प्रशिक्षण घेऊन त्या
आता लेफ्टनंट झाल्या आहेत. ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही की सामान्य बाबही नाही.
पूर्णपणे सांसारीक असलेली एक स्त्री, आपला पती वारल्यानंतर कोलमडून पडते पण स्वाती
त्याला अपवाद ठरल्या. त्यांनी जिद्दीनं त्याच सैन्यात प्रवेश घेण्याचा निर्णय
घेतला ज्या सैन्यात देशकार्यासाठी त्यांच्या पतीनं बलिदान दिलं. असा काही विचार
करणं हीच मोठी गोष्ट असते आणि त्याला प्रत्यक्षात आनणं हे तर कठीणच असतं. असंख्य
अडचणींचा सामना करून त्यांनी हे यश संपादन केलं आहे.
आपण नेहमी हिरोंच्या गप्पा मारत असतो. पण हिरो असण्यासाठी
तुम्ही चित्रपटांत काम करण्याची गरज नसते. त्यासाठी तुम्ही खूप मोठं असणंही गरजेचं
नसतं. तुमचा निर्धार आणि तो पूर्ण करण्यासाठी अविरत मेहनत घेण्याची तयार असली की
कोणत्याही क्षेत्रांत कोणालाही हिरो होण्याची संधी मिळू शकते. स्वाती महाडिक
यांच्यासारख्या सामान्य घरातील एका स्त्रीनं सारे विरोध झुगारून हे सिद्ध केलं
आहे. त्या आपल्या सर्वांच्या हिरो आहेत. सर्व महिलाच नव्हे तर पुरुषही त्यांच्या
या कर्तबगारीतून धडा घेतील अशी आशा आहे.
त्यांच्या या दृढ निश्चयाला लाख सलाम!
Comments
Post a Comment