योनीशुचिता विरुद्ध लिंगशुचिता

संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे ज्याचा अर्थ असा आहे की नेहमी प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. एखादी गोष्ट खरी असेल पण अप्रिय असेल तर ती लोकांना सांगू नये. माझा या वचनावर विश्वास नाही. सत्य विशेषतः ते जेव्हा अप्रिय असतं तेव्हा ते आधी बोलावं मग बाकीच्या प्रिय गोष्टी बोलाव्यात यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे रसिक पुरवणीच्या या माझ्या सदरात मी अप्रिय पण सत्य म्हणजे थोडक्यात लोकांना न आवडणा-या गोष्टींविषयी बोलणार आहे. यातील पहिला लेख आहे योनीशुचिता आणि लिंगशुचितेवरचा.
आपल्या महान भारतीय संस्कृतीत (म्हणजेच हिंदू संस्कृतीत असंही वाचू शकता) व्यक्तिच्या पावित्र्याला भलतंच महत्त्व आहे. हे पावित्र्य केवळ मनाचंच नसून शरीराचंही आहे. ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्त्री-पुरुष दोघांवरही टाकली गेली आहे. पण नेहमीप्रमाणेच पावित्र्याच्या बाबतीतही स्त्रीयांवर ही जबाबदारी जरा जास्त प्रमाणात टाकली गेली आहे. इतकी की तिला आपल्या योनीपावित्र्याची म्हणजे योनीशुचितेचेही जबाबदारी पेलावी लागते. ज्याची परीक्षा लग्नाच्या वेळी होते. नववधू ही कुमारीकाच हवी असा आपल्या भारतीय तरुणांचा (इथे मात्र जवळपास सर्वच धर्मातील तरुण असंही वाचू शकता) लाडीक हट्ट असतो. हा हट्ट पुरवण्यासाठी आपल्या समाजव्यवस्थेने मग वेगवेगळ्या वाटा शोधून काढल्या. मुलगी वयात आली रे आली की तिचं लग्न लावून द्यायचं. बालवधूविवाहाचं मूळ या योनीशुचितेच्या हट्टात असेल तर ते नवल नाही. काही ठिकाणी मुलगी मोठी झाल्यावर लग्न करतात म्हणून संभोगादरम्यान तिच्या योनीतून रक्तस्त्राव होणे हे तिच्या कौमार्याचं लक्षण मानलं जाऊ लागलं. त्यासाठी पांढ-या शुभ्र चादरीवर संभोग केला जाऊ लागला. चादर रक्ताळली तर बरं नाहीतर त्या पोरीची लगेच हकालपट्टी केली जाऊ लागली. तिच्या चारित्र्यावर जो बट्टा आयुष्यभरासाठी लागायचा तो वेगळाच.
पण आपल्या या महान भारतीय संस्कृतीत पुरुषांच्या कौमार्याची त्याच्या लिंगशुचितेची मात्र कोणतीच परीक्षा घेतली जात नाही. ते पुरुष आहेत हेच त्यांच्या पावित्र्याचं लक्षण मानलं जातं. निसर्गतः पुरुषांना प्रथम संभोगात रक्तस्त्राव होत नसल्यानं त्यांनी याचा चांगला फायदा उठवला नसता तर नवल. समंजस पुरुषांनीही कधी या लिंगशुचितेचा आग्रह धरला असं झालं नाही. मग स्त्रीयांनी त्याविषयी बोलणं तर दूरच राहीलं. पण आता काळ बदलला आहे. त्यामुळे निदान या गोष्टींविषयी चर्चा तरी होत आहे. पण तरीही पुरुष सुधारले किंवा स्त्रीया पुढारल्या असं मात्र दिसत नाही. स्त्रीचं पावित्र्य व चारित्र्य हे योनीशी निगडीत असतं असा समज आजही तितकाच दृढ आहे. त्याला स्त्रीयाही फारसा आक्षेप घेताना दिसत नाही. याचाच दुसरा विरोधाभास असा की काही स्त्रीया व पुरुष हे याच धर्तीवर पुरुषांच्या लिंगशुचितेचा आग्रह धरतात. यातही पुन्हा पुरुषांचं चारित्र्य हे त्याच्या लिंगाशी जोडण्यात येतं. हे दोन्ही आग्रह अत्यंत मूर्खपणाचे आहेत.
आधी या तथाकथित योनीशुचितेबद्दल बोलूयात. ही योनीशुचिता ठरते ती योनीपटलाच्या अक्षत असण्यावर. मूळात प्रत्येक स्त्रीला योनीपटल असेलच असा नियम नाही. ते असलं तर संभोगक्रियेनेच ते फाटतं हा समजही चूकीचा आहे. व्यायाम करताना, सायकल चालवताना, लहान असताना योनीत बोटं घालण्याच्या सवयीमुळे किंवा चुकीच्या पद्धतीने सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्यामुळेही हा योनीभंग होऊ शकतो. त्यांतून दरवेळेस रक्तस्त्राव होईलच असंही नाही. पुरुषांच्या लिंगाबाबत असं काही होत नाही. कधीतरी त्यांनाही रक्तस्त्राव होतो पण तो हस्तमैथुन करताना अती केल्यामुळे होतो. एरव्ही त्यांच्या कौमार्याची खूण काही देता येत नाही. पुरुषांनी याचाच गैरफायदा उठवत स्त्रीयांकडून योनीशुचितेची मागणी केली. अन्यथा ती चारित्र्यवान नाही असा निर्वाळा दिला. या अपसमजापायी करोडो स्त्रीयांना आजवर जे दुःख भोगावं लागलं आहे किंवा नववधूंना प्रथम संभोगाच्या वेळ ज्या प्रचंड तणावाखाली वावरावं लागतं त्याची कल्पनाही करता येणं शक्य नाही.
पुरुष असे का वागतात असा प्रश्न साहजिकच पडतो. त्याचं कारण आहे त्यांना आपल्या स्त्रीचा आपल्या आधी इतर कोणी उपभोग घेतला आहे ही कल्पनाच सहन होत नाही. अशी कल्पना निर्माण होण्याची दोन कारणं आहेत. पहिली म्हणजे पुरुषांना आपली स्त्री आपली मालमत्ता वाटत असते जिचा अन्य कोणी उपभोग घेतलेला त्याला चालत नाही. त्याच्या इच्छेशिवाय. धर्मराज युधिष्ठीरानं याच मालकीहक्कातून द्रौपदीला पणावर लावलं होतं. दुसरं कारणं म्हणजे पुरुषांचा ठाम समज आहे की स्त्रीचं चारित्र्य हे फक्त तिच्या योनीतच लपलं आहे. ती अक्षत असेल तर ती उत्तम चारित्र्याची अन्यथा ती चवचाल आहे अशी त्याची खात्री होते. पुरुषांचा दांभिकपणा हा की ते स्त्रीयांना ज्या चारित्र्याची कसोटी लावतात तीच स्वतःला लावत नाहीत.
पुरुषांनी याचा गैरफायदा घेत आजवर स्त्रीयांवर आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. पण त्याची कारणं केवळ योनीशुचितेशी निगडीत नाहीत. ती आहे लैंगिकतेवरून चारित्र्याचा बरेवाईटपणा ठरवण्याची मानसिकतेशी. चारित्र्य हे केवळ तुम्ही लग्नाआधी संभोग केला आहे की नाही यावरच ठरतं असा समज आजही स्त्रीपुरुष दोघांमध्येही आहे. प्रेमप्रकरणात मुलांना इतरांनी वापरलेली प्रेयसी सहसा चालत नाही. लग्नात तर नाहीच नाही. मुलींनाही आपल्या प्रियकराची पूर्वीची लफडी म्हणजे त्यांचा विश्वासघात वाटतो. लग्नानंतर आपल्या नव-याची इतर प्रेमप्रकरणं होती ही गोष्ट देखिल त्यांना सहन होत नाही. मग त्याचे लैंगिक संबंध होते हे कळल्यावर तर त्यांचा थयथयाटच होतो. लग्नानंतरच्या प्रथम रात्री भावूक होत नवरा बायकोंनी आपल्या पूर्वीच्या प्रेमाची कबूली दिली रे दिली की त्यांच्या भावी संसाराला तिथेच आग लागल्याशिवाय राहत नाही. एकतर त्यांची तात्काळ भांडणं तरी होतात किंवा त्या गोष्टी त्यांच्या मनात साठून राहतात आणि त्यासाठी ते एकमेकांना कधीच माफ करत नाहीत.
आपल्याकडे प्रेमात पडण्याची सा-यांना घाई लागलेली असते. प्रेम ही अतिशय सहज गोष्ट करून टाकली आहे आपण. त्याचा संबंध शरीराशी जोडून आपण आपलीच गोची करून टाकली आहे. त्यामुळे लैंगिक संबंध हे ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच ते करायचे असतात असा एक समज आपल्यांत आहे. पण आपल्याला लग्नही करायचं असतं आणि आपल्या इथे तर प्रेमविवाहांना कडाडून विरोध केला जातो. मग हे व्हायचं कसं? त्यामुळे ज्यांची लग्न होतात त्यांतील बहुसंख्य हे लैंगिकदृष्ट्या चारित्र्यवान व पवित्र नसतात. कारण लग्नाआधी त्यांनी शरीरसुखाचा अनुभव हा घेतलेलाच असतो. पण त्यामुळे ते पापी ठरतात का? ठरतात कारण आपली संस्कृती आपली परंपरा तसं सांगते म्हणून. आपण लैंगिक संबंधांना प्रेम संबंध समजतो म्हणून. पण मूळात या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
पुढारलेल्या विकसीत देशांमध्ये स्त्रीपुरुष एकत्र आले की लगेच प्रेमात पडत नाही. त्यांना एकमेकांचा सहवास आवडला तर ते आधी सोबत राहतात, शरीरसुखाचा अनुभव घेतात आणि त्यांनतर जर त्यांची मनंही जुळली तरच ते लग्नाचा निर्णय घेतात. ते एकमेकांच्या पूर्वीच्या संबंधांबाबत फारसे आग्रही नसतात. कारण ते चारित्र्याचं मोजमाप लैंगिकतेवरून नाही तर एकमेकांच्या स्वभावावरून करतात. याचा अर्थ मी मूक्त लैंगिक स्वातंत्र्याचं समर्थन करतोय असा नाही. मी जबाबदार लैंगिक स्वातंत्र्याचं समर्थन करतोय. जिथे आपल्या लैंगिक परिणामांसाठी स्त्री-पुरुष दोघेही जबाबदार असतील. आजकालच्या मुलींना व मुलांना सेक्सचे परिणाम काय होतात याची चांगली माहिती असते. वयात आलेल्या मुली कोणाच्या तरी प्रेमात पडतात आणि मग प्रेमासाठी किंवा लग्नाच्या आश्वासनाखातर त्याच्याशी शारिरीक संबंध ठेवतात. त्या गर्भवती झाल्या किंवा त्या मुलीनं लग्नाचा तगादा लावला तर त्यांचे प्रियकर पळ काढतात. किंवा त्या मुली त्याच्यावर बलात्काराचा आरोप करतात. तर कधी आत्महत्या करतात. कोणतीही जबाबदारी न घेता शारिरीक संबंध ठेवणा-या या मुली व मुलं यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायलाच हवी. सारं काही माहित असूनही जर ते खड्ड्यात पडत असतील तर त्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे.

प्रेम म्हणजे सेक्स नव्हे हे त्यांना समजायला हवं. कोणताही पुरुष विश्वासपात्र नसतो हेही. तो कितीही जवळचा असो, ओळखीतला असो त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःचा घात करणं होय. याचा अर्थ त्यांनी कोणत्याच पुरुषाशी नातं ठेवू नये असं नाही पण आंतून त्यांनी अखंड सावधानता बाळगायलाच हवी. ज्या मुली अज्ञान आहे त्यांच्याकडून चुक झालीच आणि दूर्दैवानं त्या गर्भवती राहिलाच तर त्या मुलींनी त्याची माहिती आपल्या पालकांना द्यायलाच पाहिजे आणि त्यांच्या पालकांनीही या गोष्टीचा फार मोठा इश्यू न करता तिची मदत करायला हवी. उगाच घराण्याची इज्जत वगैरचा डांगोरा पिटण्याची गरज नाही. ही फक्त एक शारिरीक घटना आहे त्या पलीकडे त्याला ज्यादा महत्त्व देण्याची गरज नाही. फक्त ते पुन्हा ही चूक करणार नाही याची काळजी त्यांना घ्यायला लावा आणि स्वतःही घ्या. योनिशुचिताच नव्हे तर लिंगशुचितेच्या जाळ्यांतूनही आपल्याला बाहेर पडावं लागणार आहे. एकमेकांची मनं जुळणं हे प्रेमाचं लक्षण आहे. एकमेकांचं शारिरीक आकर्षण असणं म्हणजे प्रेम नव्हे. जितक्या लवकर आपण या गोष्टी समजून घेऊ तितका त्याचा फायदा स्त्री-पुरुष दोघांनाही होईल. 

Comments